काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचे बोलणे ताळतंत्र सुटलेले आणि पोरकटपणाचे !
सलमान खुर्शीद हे काँग्रेसचे नेते आहेत. व्यवसायाने ते अधिवक्ता आहेत. त्यांना कायदा आणि न्यायशास्त्र यांचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची प्रभु श्रीरामांशी तुलना करतांना त्यांनी ज्या निकषावर तुलना केली, ते पहाता ‘यांच्यासारख्या कायदेतज्ञाने ताळतंत्र सोडला’, असे म्हणावे लागेल.
१. हिंदु धर्म हा ‘प्रत्येक जीवमात्रात ईश्वराचे वास्तव्य आहे’ यावर विश्वास ठेवणारा !
हिंदु धर्म हा सहिष्णू आणि सर्वांना सामावून घेणारा आहे. चराचरात, सृष्टीत आणि प्रत्येक जीवमात्रात ईश्वराचे वास्तव्य आहे, यावर विश्वास ठेवणारा आहे अन् तशी शिकवण देणारा आहे. असे असले, तरी कोणत्याही सर्वसामान्य माणसाला ईश्वरत्व बहाल करण्याचा अधिकार कुणालाही नाही.
२. सलमान खुर्शीद यांनी केलेली टीका वैचारिक विकृतीचे प्रदर्शन करणारी !
हिंदु संस्कृतीत अवतार परंपरा आहे. ईश्वर वेगवेगळ्या रूपात अवतार घेत असतो. त्यानुसार हिंदु संस्कृतीने असे दशावतार मानले आहेत. त्यामुळे त्या अवतारांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला ईश्वरत्व प्रदान करता येत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीची तुलना ईश्वराशी करता येत नाही, ही गोष्ट कायदे पंडित (सलमान खुर्शीद) विसरले. मानवनिर्मित कायद्याचा कितीही अभ्यास असला, तरी हिंदु संस्कृतीतील आध्यात्मिक नियमांचा अभ्यास आणि त्याचे ज्ञान असावे लागते. ते ज्ञान सलमान खुर्शीद यांना आहे, असे वाटत नाही. म्हणूनच त्यांनी केलेले विधान आणि त्यांनी केलेली तुलना ही ताळतंत्र सोडून केलेली आहे. सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना प्रभु श्रीरामांशी करून आपल्या वैचारिक विकृतीचे प्रदर्शन केले आहे. असे जर कुणाला वाटले, तर त्यांना राग येता कामा नये.
३. राहुल गांधींची प्रभु श्रीरामांशी तुलना करणे हा पोरकटपणा
प्रभु श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करतांना वेदही थकून गेले. राहुल गांधी यांच्यात प्रभु श्रीरामांमध्ये असलेल्या गुणांपैकी एकही गुण नाही. त्यामुळे त्यांची प्रभु श्रीरामांशी केलेली तुलना हा पोरकटपणा आहे, असेच म्हणावे लागेल. याचाच अर्थ ‘कुणाची कुणाबरोबर तुलना करायची असते, याचेही ज्ञान सलमान खुर्शीद यांना आहे’, असे म्हणण्याचे धाडस कोणत्याही सूज्ञ माणसाला होणार नाही.
४. प्रभु श्रीरामांशी तुलना म्हणजे नाल्यातील पाण्याची तुलना गंगेच्या पवित्र जलाशी करण्यासारखे !
त्यामुळे कुणाची कुणाशी तुलना होऊ शकत नाही, ते काही उदाहरणे देऊन आता या ठिकाणी सांगणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. गांडुळाची तुलना गरुडाशी करता येत नाही. डबक्याची तुलना अथांग सागराशी करता येत नाही. गतीरोधकाच्या (‘स्पीड ब्रेकर’च्या) उंचीची तुलना हिमालयाच्या सर्वोच्च शिखराशी करता येणार नाही. काजव्याची तुलना सूर्यनारायणाशी करता येणार नाही. नाल्यातील पाण्याची तुलना गंगेच्या पवित्र जलाशी करता येणार नाही. कथिलाची तुलना सुवर्णाशी करता येणार नाही. बांडगुळाची तुलना चंदनवृक्षाशी करता येत नाही. खेचराची (गाढवाची) तुलना इंद्राच्या ऐरावताशी करता येणार नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
५. हिंदु धर्म वैचारिक समतोल सांभाळण्याची शिकवण देणारा !
हिंदु धर्म हा सर्वांत श्रेष्ठ धर्म आहे. हा धर्म स्वतःचा वैचारिक समतोल सांभाळण्याची शिकवण देणारा धर्म आहे. ‘जगात केवळ आमचाच देव श्रेष्ठ, इतर देवीदेवतांची पूजा करणे आम्हाला मान्य नाही’, अशी शिकवण हिंदु धर्म देत नाही; पण त्यासह ‘अयोग्य माणसाशी तुम्ही जवळकीचा संबंध प्रस्थापित केला, तर तुमचा सर्वनाश होईल’, अशी सावधगिरीची चेतावणीही हिंदु धर्म आणि संस्कृती देतो. तसेच असत्य रेटून सांगण्यासाठी थोडा तरी सत्याचा अंश असावा लागतो. सलमान खुर्शीद यांनी हा भागही लक्षात घेतला नाही. उदाहरण म्हणजे खोटे नाणे वितरित करायचे झाल्यास ते नाणे खर्या नाण्यांमध्ये मिसळावे लागते, तरच ते जाते अन्यथा चोरी अथवा लबाडी पकडली जाते. आता तर ‘स्कॅनिंग मशीन’ (तपासणी यंत्र) आल्यामुळे हेही अशक्य होऊन बसले आहे.
६. ताळतंत्र सोडून बोलणे, हा सभ्य समाजात प्रमाद (अपराध) मानला जाणे
हिंदु धर्माची तात्त्विक बैठक अत्यंत उच्च पातळीवरची आहे. त्याचसह हे तत्त्वज्ञान आधुनिक भाषेत सांगायचे, तर ‘स्कॅनिंग मशीन’सारखे आहे. त्यामुळे पाखंडीपणा हा तात्काळ लक्षात येतो. वाणी आणि करणी यांच्यातील भेद सूर्यप्रकाशाच्या इतका स्पष्ट दिसत असतांना आपण काहीही बोललो, तरी ते खपून जाईल, असे समजण्याचे कारण नाही. ‘पोटात एक आणि ओठी वेगळेच’, याचा अनुभव आल्यानंतर पाखंडी लोकांच्या वक्तव्यामागचा हेतू कुणाही सर्वसामान्य माणसाच्या ध्यानात येतो. याचा विसर पडू न देता ताळतंत्र सोडून बोलणे, हा सभ्य समाजात प्रमाद मानला जातो एवढे लक्षात घ्यावे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (२८.१२.२०२२)