धाराशिव नगरपरिषदेच्या अंतर्गत ‘बायोमायनिंग’च्या कामामध्ये अपव्यवहार करणार्या दोषींवर कठोर कारवाई करणार ! – मंत्री उदय सामंत
विधान परिषद प्रश्नोत्तरे…
नागपूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील धाराशिव नगरपरिषदेच्या अंतर्गत बायोमायनिंगच्या कामामध्ये अपव्यहार करणार्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी २८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या वेळी केली. या वेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, या प्रकरणी अपव्यवहार केल्याचे निदर्शनास आल्यास धाराशिव नगपालिकेच्या मुख्याधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सभागृहात दिली. सदस्य सुरेश धस यांनी हा प्रश्न विचारला होता.
सुरेश धस म्हणाले की, १३ सप्टेंबर २०२० या दिवशी ‘सेव्ह एनव्हारमेंट मॅनेजमेंट, पुणे’ या आस्थापनाला धाराशिव नगरपालिका अंतर्गत सर्वे क्रमांक ३४८ येथील अस्तित्वात असलेल्या कचरा डेपोच्या ठिकाणी बायोमायनिंग काम करण्यासाठी ४६ लाख ५५ सहस्र ७३ रुपये अदा करण्यात आले आहे; मात्र या आस्थापनाने पैसे घेऊन बनावट पद्धतीने काम केले आहे. हे आस्थापन व्यवस्थित काम करते कि नाही, हे पहाण्याचे दायित्व नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांचे होते. त्यांनी ते पाहिले नाही. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा.