शालेय पोषण आहाराच्या पुरवठ्यामध्ये अयोग्य प्रकार चालू आहे का ?, याची पडताळणी करू ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
नागपूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – शालेय पोषण आहारामध्ये भारतीय अन्न महामंडळाचा (एफ्सीआयचा) ब्रँड असण्याची आवश्यकता असते. पोषण आहाराची वाहतूक करतांना त्यासंदर्भातील ‘ट्रेकिंग सिस्टीम’ चालू आहे. त्या माध्यमातून शालेय पोषण आहाराच्या पुरवठ्यामध्ये काही अयोग्य प्रकार चालू आहे का ? याची आम्ही पडताळणी करू, तसेच शालेय पोषण आहाराच्या पुरवठ्यामध्ये आणखी कोणत्या सुधारणा करता येतील, याचाही विचार करून त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिले.
विराधी पक्षनेते अजित पवार यांनी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याचे उत्तर देतांना केसरकर बोलत होते.
या वेळी अजित पवार म्हणाले, ‘‘शालेय पोषण आहाराच्या अन्न तपासणीची यंत्रणा अत्यंत कुचकामी आहे. त्यामुळे सक्षम तपासयंत्रणा शासनाने निर्माण करावी. राज्यात पोषण आहार पुरवठ्यामध्ये काही भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे साटेलोटे आहे. त्यातून हे गैरप्रकार होतात. या अपहार प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात यावी, तसेच या समितीच्या माध्यमातून हा अपहार थांबवण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासन करणार का ?’’
लक्षवेधीत मांडण्यात आलेली महत्त्वपूर्ण सूत्रे
१. अनेकवेळा ठेकेदारांकडून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणारे चांगल्या प्रतीचे धान्य खुल्या बाजारात विक्री करून त्याऐवजी भेसळयुक्त अन्नधान्य शाळांना पुरवण्यात येत आहे.
२. ठेकेदारांकडून शासनाने निश्चित केलेल्या धान्यांच्या दरांहून अधिक किंमतीत धान्य खरेदी केले जाते. यामध्ये शासनाच्या पैशांचा मोठ्या प्रमाणात अपहार केला जात आहे.