बर्फाचे वादळ !
आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या ‘बाँब सायक्लॉन’चा (बर्फाच्या वादळाचा) बाह्य परिणाम (साईड इफेक्ट) म्हणून अमेरिकेत गेला १ आठवडा चालू असलेली भयंकर नैसर्गिक आपत्ती ही संपूर्ण जगालाच अंतर्मुख करणारी आहे. ‘सारी सुखे आणि व्यवस्था पायाजवळ आहेत’, असे मानल्या गेलेल्या जगातील सर्वांत श्रीमंत अन् जगावर अधिराज्य गाजवू पहाणार्या बलाढ्य अमेरिकेची स्थिती प्रथमच हतबल झालेली पहायला मिळत आहे. ‘मानव कितीही शक्तीमान (‘सुपर पॉवर’) झाला, तरी निसर्गाच्या शक्तीपुढे तो काहीच करू शकत नाही’, हे सार्या जगाला यातून पुन्हा एकदा शिकायला मिळत आहे. जपान आणि कॅनडा या देशांतही अशा प्रकारे बर्फवृष्टी होत आहे. जपानमध्ये यंदा ३ पट बर्फवृष्टी अधिक झाली आहे, तर उत्तर कॅनडात काही ठिकाणी उणे ५३ अंश सेल्सियस तापमान झाले आहे. इराणमध्येही मोठ्या प्रमाणात बर्फ पडत आहे, तर ऐन ख्रिसमसलाच फिलिपिन्स देशात आलेल्या प्रचंड पुराने ४४ सहस्र लोकांचे स्थलांतर करावे लागले.
बर्फाच्या वादळामुळे अमेरिकेतील ५० प्रांतांतील २० कोटी अमेरिकी नागरिकांना फटका बसला आहे. अमेरिकेतील ६० टक्के नागरिकांना आपत्काळापासून सावधान रहाण्याची सूचना मिळाली आहे. बर्फवृष्टी आणि प्रचंड वारे हे या वादळाचे स्वरूप आहे. १०० कि.मी. प्रतिघंटा वेगाने वारे वहात आहेत. बहुतांश ठिकाणी तापमान ० ते उणे २० अंशापर्यंत खाली गेल्याने आणि काही ठिकाणी उणे ४५ ते उणे ५० अंशापर्यंत तापमान खाली गेल्याने अतीथंडीमुळे रक्त गोठण्याची स्थिती ओढवू शकते, अशी स्थिती आहे. रस्ते, घरे, झाडे सर्वांवरच प्रचंड बर्फ जमा झाला आहे, तसेच रेल्वे, बस आणि विमान ही वाहतूक ठप्प झाल्याने आपत्कालीन सेवा पुरवणेही कठीण झाले आहे. आपत्कालीन सेवा पुरवणार्या गाड्याच रस्त्यात अडकून पडल्या आहेत. अमेरिकेत २३ डिसेंबरला १८ लाख, तर २४ डिसेंबरला ४ लाख घरांमध्ये वीज नव्हती. ‘वीज किंवा उष्णता उपलब्ध झाली नाही, तर त्या ठिकाणी मृत्यूंची संख्या किती वाढेल’, याची कल्पना करू शकत नाही. नागरिकांना आवश्यकतेविना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले गेले आहेत. तापमान न्यून झाल्यामुळे साध्या हवेत श्वास घेणे कठीण झाले आहे. २६ डिसेंबरपर्यंत ६० लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाबाहेरील बर्फ हालवण्यास प्राधान्य दिले जात आहे. अमेरिकेतील नागरिकांना साहाय्य करण्यासाठी तेथील ‘नॅशनल गार्ड’ना सिद्ध रहाण्याची सूचना मिळाल्याने ते त्यांच्या साहाय्याला आले आहेत. संपूर्ण न्यूयॉर्क गोठल्याप्रमाणे स्तब्ध झाले आहे. चक्रीवादळामुळे न्यूयॉर्क प्रदेशातील बफेलो शहराला अधिक फटका बसला असून तेथे ६ फुटांपर्यंत बर्फ साठला आहे. लहानमोठी सर्व वाहने बर्फात अडकल्याने त्यांना रस्त्यांवर सोडावे लागले आहेत. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरांनी याला ‘निसर्गाने पुकारलेले युद्ध’ म्हटले आहे. अमेरिकेचे रंगीबेरंगी न्यूयॉर्क बर्फवादळाने पुरते ‘कृष्ण-धवल’ झाले आहे. बहुतेकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे आणि ‘गाडीप्रमाणे बैठे घरही बर्फात लुप्त होते कि काय ?’ अशी भीती काहींच्या मनात निर्माण झाली असावी, अशा प्रकारचे तेथील बर्फाच्छादित घरांचे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत.
नैसर्गिक आपत्तींचे संकट
काही दिवसांत हे वादळ शमेलही; कदाचित् त्यामुळे झालेली शारीरिक, मानसिक, आर्थिक हानी पुढे काही दिवस आपल्यापुढे येत राहील. या घटनेतून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘आता या घडीला माझे जीवन सुरळीत चालू आहे’, असे या काळात जगातील कुठलीच व्यक्ती म्हणू शकत नाही. ‘येणार्या काळात जगात अधिकाधिक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती येतच रहाणार आहेत’, असे द्रष्टे आणि संत यांनी सांगून ठेवले आहे. त्याची प्रचीती जग घेत आहे. ही संकटे नास्तिकांना अंतर्मुख करणारी आणि आस्तिकांना त्यांची भक्ती अधिकाधिक वाढवून ईश्वराजवळ नेणारी ठरोत, हीच अपेक्षा !