सातारा जिल्हा रुग्णालयात २ गटांमध्ये तुंबळ हाणामारी !
सातारा, २७ डिसेंबर (वार्ता.) – येथील जिल्हा रुग्णालयात २५ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता २ गटांत तुंबळ हाणामारी झाली. २७ क्रमांकाच्या खोलीत उपचार घेणार्या २ रुग्णांना बाहेर ओढून मारहाण करण्यात आली. या हाणामारीत ५-६ जण गंभीर घायाळ झाले आहेत. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख हे काही घंट्यांपूर्वीच जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेचा आढाव घेऊन गेले होते. त्यांची पाठ फिरताच ही मोठी हाणामारी झाल्यामुळे गावगुंडांना सातारा पोलीसदलाचा धाक राहिला आहे कि नाही ? असा प्रश्न सामान्य सातारावासियांना पडला आहे.
गोसावी समाजाच्या २ कुटुंबांमध्ये घरगुती कारणावरून हाणामारी झाली. त्यामधील २ जणांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दोन्ही कुटुंबांतील सदस्य पुन्हा जिल्हा रुग्णालय परिसरात जमले आणि वाद घालू लागले. याचे पर्यावसान हाणामारीत झाले. गर्दीतीलच काहींनी रुग्णालयात भरती रुग्णांना खोलीतून बाहेर ओढत आणून रुग्णालयाच्या आवारातच मारहाण केली. या हाणामारीमुळे रुग्णालय व्यवस्थापनाचीही भीतीने गाळण उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी आले आणि जमावाला पांगवले. यामुळे पुढचा अनर्थ टळला.