लोकशाहीमध्ये कारवाईत विरोधाभास का ?
महाराष्ट्र विधानसभेच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’, असे विधान केल्याने त्यांना या अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आले. आमदार जयंत पाटील यांच्यावर कारवाई झाली, तशी कारवाई विविध व्यासपिठांवरून देवता, संत आदींचा अवमान करणार्यांवर का होत नाही ? नुकतेच ‘पठाण’ या चित्रपटातील एका गाण्यात भगव्या रंगातील तोकडे कपडे परिधान केलेली अभिनेत्री आणि अभिनेते शाहरूख खान यांचे ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित झाले. भगवा रंग हा हिंदु धर्म, साधू, संत, महंत यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. मग हे गाणे म्हणजे भगवी वस्त्रे परिधान केलेल्या साधू-संतांनाही ‘बेशरम’ म्हणण्यासारखेच नव्हे का ? मग जर राहुल नार्वेकर यांना ‘निर्लज्ज’ म्हटल्यामुळे त्यांचा अवमान होत असेल, तर वरील गाण्यातून साधू-संतांचा अवमान करणार्या या गाण्याशी संबंधित असणार्यांवर कारवाई व्हायला हवी, अन्यथा ‘लोकशाहीत साधू-संत आणि देव यांच्यापेक्षा व्यक्ती मोठ्या आहेत’, असे समजले जाईल, म्हणजेच जे जे चुकीचे आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे. योगायोगाने ‘निर्लज्ज’ आणि ‘बेशरम’ या शब्दांचा अर्थ समान आहे; पण व्यक्तीपरत्वे कारवाईत मोठा विरोधाभास आहे ! – एक वाचक