‘सेक्युलॅरिझम’ (धर्मनिरपेक्षता) आणि पुरोगामित्व हीच खरी अंधश्रद्धा !
‘काही लोक बोलतात कि बरळतात, हे अनेकदा कळत नाही. आपण आधी काय बोललो आणि वागलो, याचे ज्यांना भान नसते, ते लोक जेव्हा सार्वजनिक जीवनात महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून समाजाला ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांचा कान वेळीच पकडणे आवश्यक असते. अन्यथा अशी माणसे धडधडीत खोटे किंवा बिनबुडाचे बोलत असतात आणि त्याचीच इतिहास म्हणून नोंद होत असते. अशा वेळी या खोटेपणाला उघडे पाडणे अगत्याचे असते. किंबहुना त्यालाच ‘खरी पत्रकारिता’ म्हणतात. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठल्या तरी एक ज्योतिषाकडे हात दाखवायला गेले’, अशी एक बातमी पसरली. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी अंधश्रद्ध संघटना ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आवाज उठवायला प्रारंभ केला. त्यांनी ‘महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांना मुख्यमंत्रीच एका ज्योतिषाकडे कसे जातात ?’, अशी आवई उठवत निषेध वगैरे केला. त्यानंतर त्वरित तथाकथित पुरोगामी, बुद्धीमंत आणि राजकीय नेते एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडले.
१. डॉ. लागू यांनी औषधी गोळीविषयी वैद्यकीय अंधश्रद्धा पसरवल्याने मेडिकल कौन्सिलने त्यांचा निषेध करणे
यापूर्वीही अनेकदा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतांना काही लोक यथेच्छ अंधश्रद्धा जपत राहिले आहेत. यांच्यातीलच एक महान अंधश्रद्धा निर्मूलनवादी म्हणवणारे बुद्धीवंत डॉ. श्रीराम लागू यांच्याविषयी मी एक प्रश्न जाहीरपणे डॉ. दाभोलकरांना विचारला होता; कारण ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ‘मुखिया’ (मुख्य) होते. अनेकदा त्यांच्या समवेत ‘देवाला रिटायर करा’, असे म्हणण्यासाठी सर्वांत मोठे नास्तिक डॉ. श्रीराम लागू यायचे. डॉ. श्रीराम लागू यांनी वैज्ञानिकच नव्हे, तर वैद्यकीय अंधश्रद्धा पसरवण्याचाही उघडपणे प्रयत्न केला. त्यासाठी भारताच्या ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने) त्यांचा निषेध केला होता.
डॉ. लागू कुठले तरी बाम किंवा वेदनाशामक गोळ्या यांचे विज्ञापन करायचे. ते ‘मी एक मॉडेल म्हणून काम करतो’, असे ते म्हणायचे. मग तुम्ही मॉडेल म्हणून अंधश्रद्धा पसरवता त्याचे काय ? ‘चित्रीकरण करतांना डोके दुखायला लागले की, अमुक गोळी घेतल्याने माझी डोकेदुखी थांबते !’ खरेतर ‘अशा गोळ्यांनी कुठलीही डोकेदुखी थांबत नाही. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या हे पूर्णत: खोटे आहे की, अमुक गोळीने डोकेदुखी थांबते. त्यामुळे हे विज्ञापन बंद करा. अन्यथा तुमची वैद्यकीय पदवी मागे घ्यावी लागेल’, अशी चेतावणी मेडिकल कौन्सिलने दिली होती. तेव्हा ‘मी विज्ञापन बंद करणार नाही. तो माझा धंदा आहे’, असे म्हणत डॉ. लागू यांनी मेडिकल कौन्सिलची चेतावणी धुडकावून लावली; पण धंदा चालू ठेवला होता.
२. ‘मुख्यमंत्री ज्योतिषाकडे गेले कि नाही ?’, याची निश्चिती न करता निषेध करणे ही अंधश्रद्धाच !
डॉ. लागू एवढी मोठी अंधश्रद्धा पसरवत असतांना दाभोलकरांनी कधी त्यांना विचारले नाही; कारण त्यांना गर्दी जमवायला एक ‘सेलिब्रिटी’ हवा होता. मग जो ज्योतिषी असतो, तोही पोटापाण्याचा धंदाच करत असतो. तुमचा मॉडेलिंग करणे, हा धंदा असला, तरी तुमचा चेहरा बघूनच ते विज्ञापन बघितले जाते. तेव्हा वैद्यकीय अंधश्रद्धा किंवा नक्षत्रांचे खडे, हिरे यांची अंधश्रद्धा पसरवायला डॉ. लागूच साहाय्य करत होते ना ? हे असले लोक जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात, तेव्हा अंधश्रद्धा संपत नसते. खोटे साधू आणि श्रीराम लागू किंवा दाभोलकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही सारखेच काम करत असून तेवढीच अंधश्रद्धा जपत असतात. त्यामुळे ‘एकनाथ शिंदे हे खरच भविष्यवेत्त्याकडे गेले का ?’, हेही कुणाला बघायची आवश्यकता वाटली नाही. हीच अंधश्रद्धा आहे. देव कुणी पाहिला कि नाही ?; पण देव आहे. ‘देवाच्या पाया पडा. त्यासाठी आम्हाला दक्षिणा द्या. ही ग्रह शांती करा’, हा जर भोंदूपणा असेल, तर एकनाथ शिंदे कुण्या ज्योतिषाकडे गेल्याची खात्री न करता त्यावर प्रतिक्रिया देणे, यात भेद तो काय ? जी गोष्ट घडलेलीच नाही, तिला हात जोडणे किंवा निषेध करणे या दोन्ही सारख्याच प्रतिक्रिया आहेत.
३. प्रसारमाध्यमांच्या बातम्या हीच मोठी अंधश्रद्धा होणे
मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे प्रवक्ते मंत्री केसरकर यांनी ‘ते कुठल्याही ज्योतिषाकडे हात दाखवायला गेले नव्हते’, असा खुलासा केला. महाराष्ट्रातील वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि पोर्टल्स (संकेतस्थळे) यांवरून विविध खोट्या बातम्या पसरवल्या जातात; कारण बातमी हीच एक अंधश्रद्धा होऊन बसली आहे. माध्यमांनी ‘दिशा सालियन प्रकरणी ‘सीबीआय’ची क्लिनचिट’ (निर्दाेषमुक्त) अशा बातम्या दिल्या. ही बातमीही अंधश्रद्धा आहे; कारण असे काहीही झालेले नाही. दिशा सालियनचे अन्वेषण ‘सीबीआय’कडेच नसेल, तर त्यांनी अपघाती मृत्यू म्हणून क्लिनचिट देणे, हा विषय कुठे येतो ? पण त्वरित सर्व धावत सुटले. मग कुठला तरी बाबा किंवा ग्रह पावतो, हात जोडणारे, हे जेवढे अंधश्रद्ध असतात, तेवढेच हे पुरोगामी अणि ‘सेक्युलर’ (निधर्मी) म्हणवणारे अंधश्रद्ध नसतात का ? शिंदे कुठे ज्योतिषाकडे गेले नसूनही त्यांचा निषेध केला जातो आणि तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार एका मागोमाग एक बाहेर पडून बोलतात.
आपल्याकडे ‘राईचा (मोहरीचा) पर्वत’ ही एक म्हण आहे; पण ती राईतरी खरी असली पाहिजे. जर दिशा सालियन प्रकरण हे कुणी ‘सीबीआय’कडे सोपवलेच नव्हते आणि त्यात ‘सीबीआयने क्लोजर (समाप्त) अहवाल दिला. सीबीआयच्या अधिकार्याने सांगितले’, ही खोटी बातमी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ किंवा ‘टाइम्स ग्रुप’वर येते आणि बघता बघता देशभरातील सर्व माध्यमांकडून उचलली जाते. त्याला अंधश्रद्धा म्हणायची नाही का ?
४. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी सत्यसाईबाबांचे पूजन केल्यावर शरद पवारांनी आक्षेप न घेणे; पण एकनाथ शिंदे यांनी ज्योतिषाला हात दाखवल्यावर टीका करणे
दिशा सालियनचे प्रकरण असो किंवा एकनाथ शिंदे यांनी भविष्यवेत्त्याला हात दाखवला असो, तेव्हा शरद पवारांपासून सुप्रिया सुळेही बाहेर आल्या. मला तर हे जादुटोण्याने दीर्घकाळ झोपी गेलेले असतात कि काय ? अशी शंका आली. मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते, ‘‘उद्धव ठाकरे यांच्यावर शरद पवार यांनी जादूटोणा केला. त्यामुळे ते भरकटले आहेत.’’ त्यांनी ‘जादूटोणा हा शब्द का वापरला ?’, म्हणून त्यांचाही निषेध चालू झाला.
शरद पवारांच्या हयातीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी काही वर्षांपूर्वी सत्यसाईबाबा येऊन गेले होते. हे त्यांना का आठवत नाही ? माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण अन् त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे सत्यसाईबाबांचे सत्शिष्य होते. ते शंकरराव आणि अशोक चव्हाण यांनी कधीच लपवले नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतांना त्यांनी सत्यसाईबाबांना होमहवन आणि शांती करण्यासाठी वर्षा बंगल्यावर बोलावले होते. त्या वेळी अशोक चव्हाण हे शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्याच पाठिंब्याने मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणार्या पवार मंडळींनी एकदा तरी अशोक चव्हाण यांना जाब विचारल्याचे आठवते का ? यापूर्वी ज्या ज्या वेळी अशा घटना महाराष्ट्रात घडल्या, तेव्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुप्तावस्थेत होते का ? म्हणजे त्यांना कुणीतरी संमोहित केलेले असणार. त्यांच्यासमोर ४ भुरटे पत्रकार बसले होते. त्यातील एकही पत्रकार पवार यांना हा प्रश्न विचारू शकले नाहीत, ‘सत्यसाईबाबा यांना अशोक चव्हाण यांनी ‘वर्षा’ या शासकीय बंगल्यावर आणले, तेव्हा तुम्ही गाढ झोपला होता का ?’; कारण मालकासमोर ‘हीज मास्टर व्हॉईस’ (त्याचा प्रमुख आवाज) पवार हे ‘मास्टर’ (प्रमुख) असतील, तर त्यांच्या समोर आपला ‘व्हॉईस’ (आवाज) बंद होतो. असे सर्व पत्रकार पत्रकार परिषदेत उपस्थित होते. ते शरद पवारांना उलट प्रश्न कसा विचारतील ?; पण एकनाथ शिंदे यांना मात्र तावातावाने प्रश्न विचारणार.
५. धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्व हीच अंधश्रद्धा !
तुम्ही केले की, तो देव असतो आणि आम्ही केले की, ती अंधश्रद्धा असते. सत्यसाईबाबा यांना ‘वर्षा’ निवासस्थानी आणले गेले. तेथे त्यांची यथासांग पूजन केले. तेव्हा या सर्व घटना तुम्हाला का आठवत नाहीत ? त्याच बंगल्यावर वास्तव्य करणार्या आजच्या मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारत असतांना १२ वर्षांपूर्वी त्याच निवासस्थानी काय काय घडले होते, ते तुम्हाला आठवत नाही का ? ‘आम्ही कधीच सत्यसाईबाबा यांना वर्षावर आणले नव्हते’, असे चव्हाण यांनी सांगावे. आपल्या सोयीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि पुरोगामी मंडळी नेहमी नावडत्या गोष्टी त्यांच्या स्मरणशक्तीतून पुसतात किंवा त्यांना परत सक्रीय करतात. म्हणून वाटते की, ही माणसे संमोहनातून किंवा जादूटोण्याने प्रभावित झालेले खडबडून जागे झाले आहेत का ? जे कुणी आज अंधश्रद्धा निर्मूलनवाले ओरडत आहेत, त्यांनी वर्षा बंगल्यावर सत्यसाईबाबा यांना आणले असतांना तेथे जाऊन निदर्शने का केली नव्हती ? एकजात सर्व पक्के ढोंगी आहेत. खेड्यापाड्यातील खरोखर अंधश्रद्ध आणि अंधभक्त जेवढा अनाडी नसेल, तेवढी यांची अंधभक्ती आहे; कारण ‘सेक्युलॅरिझम’ (धर्मनिरपेक्षता) हीच खरी अंधश्रद्धा झालेली आहे. पुरोगामित्व ही आता अंधश्रद्धा झालेली आहे. त्याचे सर्व अंधभक्त माध्यमांत चौफेर पसरलेले बघत असतो; म्हणून राईचा पर्वत करून ‘एकनाथ शिंदे यांनी हात दाखवला’, या बातम्या केल्या जातात आणि त्यावरून काहूर माजवले जाते.’
– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार
(साभार : ‘प्रतिपक्ष’ यू ट्यूब चॅनेल)