देवाच्या कृपेने साधकांना येत असलेल्या अनुभूतींविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिला जाणवलेली सूत्रे !
१. ‘अनुभूती येणे’, म्हणजे साक्षात् भगवंताला आपली आठवण येणे
‘गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आपल्याला अनुभूती येतात, म्हणजे नक्की काय घडते ? त्या वेळी सर्वांत श्रेष्ठ अशा निर्गुण स्थितीतून गुरुदेव आपल्याला सूक्ष्मातून भेटायला येतात. ते आपल्या समवेत असतात. त्यांचा कृपाकटाक्ष आपल्यावर असतो. साक्षात् भगवंताला त्या वेळी आपली आठवण येत असते; म्हणून तो आपल्याला भेटायला येतो.
२. दैवी कण आढळणे, दैवी शब्द ऐकू येणे, दैवी स्पर्श अनुभवणे, दैवी रूप दिसणे आणि दैवी गंध येणे, अशा अनुभूतींतून देव भेटत असणे
आपण भगवंताला पाहू शकत नाही; कारण आपल्यात तेवढे सामर्थ्य नाही आणि आपली तेवढी पात्रता नाही. भगवंत सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तीमान आहे. तो आपल्याला जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी भेटायला येत असतो. तो आपल्याला सगुणातून किंवा निर्गुणातून भेटायला येतो. दैवी कण दिसणे, दैवी शब्द (नाद) ऐकू येणे, दैवी स्पर्श जाणवणे, सूक्ष्मातून दैवी रूप दिसणे आणि दैवी गंध येणे, अशा अनुभूतींतून देव आपल्याला भेटतो.
३. स्वतःकडून चूक झाल्यास त्यासंदर्भात ठेवायचा दृष्टीकोन आणि त्यातही देवाची कृपा अनुभवणे
आपल्याला एखादी चांगली अनुभूती येते, देवाचे अस्तित्व जाणवू लागते, त्या वेळी आपले मन प्रसन्न होते. ‘देव मला भेटला. देव अनुभूती देण्याच्या माध्यमातून माझ्याजवळ आहे’, असे आपल्याला वाटते; मात्र ‘आपल्याकडून चुका घडल्यास त्या वेळीही ती देवाने दिलेली अनुभूती आहे’, असे आपल्याला वाटते का ? देवाने आपल्याला आपली चूक दाखवून दिल्याने आणि त्याविषयी मनात खंत निर्माण केल्याने आपल्याकडून पुढे होऊ शकणारी गंभीर चूक टाळली जाते. आपल्यापेक्षा देवालाच ‘आपली साधना व्हावी’, याची काळजी आणि तळमळ अधिक आहे; म्हणून तो आपल्याला चुका दाखवतो आणि आपले त्याच्याकडे जाण्याच्या दिशेने मार्गक्रमण करून घेतो. आपल्याला त्या चुकांमध्येही देव, म्हणजेच आपले गुरुदेव भेटणारच आहेत. ‘आपल्याकडून चुका झाल्या’, या विचारात न रहाता त्याविषयीची खंत मनात बाळगून आनंदाने प्रयत्न करत रहाणे, हीच देवाने दिलेली अनुभूती आहे.
४. ‘अनुभूती’ हा शब्द केवळ लिहिण्यासाठी नाही. आपले अंतर्मन देवाच्या अनुसंधानात असतांना (देवाशी एकरूप झाल्यावर) आपण प्रत्येक क्षणी देव आपल्यावर करत असलेली कृपा अनुभवत असतो.
५. प्रार्थना
आपण गुरुदेवांना संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना करूया, ‘गुरुदेवा, आता माझ्या चुकांमधूनही मला तुम्हाला पहाता येऊ दे. माझ्याकडून चुका होऊ नयेत, यासाठी आपणच माझ्याकडून प्रयत्न करून घ्या. ‘तुम्ही माझ्या समवेत असणारच आहात’, याची मला जाणीव असू दे. गुरुदेवा, मला तुम्हाला समवेत घेऊनच ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ प्रक्रिया कृतीत आणता येऊ दे. ‘प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास अनुभूती कशी होईल ?’, याकडे मला लक्ष देता येऊ दे.’ आपण सर्वांनी गुरुदेवांचा हात घट्ट पकडूया आणि त्यांच्या कृपेची अनुभूती घेऊया.’
– कु. अपाला अमित औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.५.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |