‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोणत्या शिकवणीमुळे आध्यात्मिक प्रगती झाली’, या संदर्भात अनुभूती घेणारे इचलकरंजी येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सदाशिव दादोबा जाधव (वय ८९ वर्षे) आणि सौ. रजनी सदाशिव जाधव (वय ७८ वर्षे) !
‘३.४.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘गुरुकृपायोगानुसार ६० टक्के आणि ७० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होऊन साधक संतत्वाकडे वाटचाल करत आहेत. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोणत्या शिकवणीमुळे आध्यात्मिक प्रगती झाली ?’, यासंदर्भात लिखाण पाठवा !’, अशी साधकांसाठी सूचना प्रसिद्ध झाली होती. ती वाचल्यावर आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यापासून आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सेवेचा आढावा दिल्यावर त्यांनी साधकाच्या संगणकीय सेवेबद्दल आनंद व्यक्त करणे : १६.११.१९९७ या दिवशी इचलकरंजी येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सार्वजनिक प्रवचन झाले. आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांनी प्रवचनाच्या समारोपाच्या वेळी इचलकरंजी येथे चालू असलेल्या सत्संगाचे ठिकाण सांगितले. दुसर्या दिवशी कबनूर (इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर) येथे एका साधिकेच्या घरी सत्संग झाला. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांशी ओळख करून दिल्यावर साधकांनी त्यांना सेवेचा आढावा दिला. मीसुद्धा मी करत असलेली ग्रंथ सेवा, अर्पणाच्या हिशोबाची सेवा आणि सत्संगांचे आयोजन इत्यादींचा आढावा दिला. मला परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘तुम्ही संगणकीय सेवा करता हे ऐकून मला आनंद वाटला.’’
१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोलणे ऐकल्यावर पत्नीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येणे : त्या सत्संगात ‘माझ्या पत्नीने संपूर्ण घरच साधकांकडे सोपवले आहे’, हे ऐकून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘हे विश्वची माझे घर याची प्रचीती आली.’’ त्या वेळी माझ्या पत्नीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. त्या वेळी ‘तिची आंतरिक साधना चांगली चालू असून गुरूंप्रती पुष्कळ भाव आणि श्रद्धा आहे’, असे मला जाणवले.
१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग मिळणे : २१.१.२००१ या दिवशी फोंडा, गोवा येथे सर्वधर्मसत्संग होता. २.४.२००४ या दिवशी भिमापूर वाडी येथे आणि २.११.२००४ या दिवशी कोल्हापूर येथे ‘एल्.आय.सी’ वसाहतीत सत्संग, तसेच संतमेळा सत्संग झाला. या सर्व ठिकाणी परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) सत्संगाचा लाभ आम्हा उभयतांना मिळाला.
१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी कलियुगात परमात्म्याला आपलेसे करून घेण्यासाठी ‘नामस्मरण’, हे सोपे साधन देणे : इचलकरंजी येथे परात्पर गुरु कालीदास देशपांडेकाका, सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, वैद्या (कु.) माया पाटील, श्री. पुरुषोत्तम रेपाळकाका आदींच्या सत्संगाचा सर्व साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर आमच्या समवेत आहेत’, याची आम्हाला प्रचीती आली. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी कलियुगात परमात्म्याला आपलेसे करून घेण्यासाठी ‘नामस्मरण’, हे सोपे साधन दिले आहे’, हे लक्षात येऊन मला कृतज्ञता वाटली.
२. अनुभूती
२ अ. अमरनाथ यात्रेच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे आणि त्यांनी सूक्ष्मातून ‘शिवलिंगाचे दर्शन घ्या’, असे सांगितल्यावर आपोआप सद्गुरूंची आरती म्हटली जाणे : २९.७.२००४ या दिवशी आम्ही अमरनाथ यात्रेला गेलो होतो. त्या दिवशी श्रावणी सोमवार होता. अमरनाथ येथील शिवलिंग असलेली गुहा अंदाजे १०० फूट आत होती. आमच्या समवेत आलेले यात्रेकरू चालून दमल्यामुळे गुहेबाहेरच थांबले. तेथे गेल्यावर माझा उत्साह वाढला होता. पत्नीही माझ्यासह हळूहळू येऊ लागली. शिवलिंगाच्या जवळ पोचल्यावर तिथे आम्हाला सूक्ष्मातून पांढर्या शुभ्र वस्त्रांत परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. त्यांनी ‘तुम्हीही आला आहात का ?’, असे म्हटल्याचे आम्हाला जाणवले. त्यांनी आम्हाला ‘शिवलिंगाचे दर्शन घ्या’, असे म्हटल्यावर आम्हाला सद्गुरूंची ‘ज्योत से ज्योत जगावो’, ही आरती आठवली आणि आम्ही ती मोठ्याने म्हणू लागलो. आम्ही बर्फाच्या शिवलिंगास फुले वाहिली. साष्टांग नमस्कार केला आणि ‘ॐ नमः शिवाय ।’, असे म्हणत मागे फिरून पाहिल्यावर परात्पर गुरु डॉक्टर दिसेनासे झाले.
२ आ. रात्रभर धो धो पावसात भिजूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कशाचीही भीती न वाटणे : आम्ही रात्री निवासाच्या तंबूत परत आलो. पाऊस धो धो पडत होता. आमच्या अंगावरचे कपडे भिजले होते. त्यामुळे आम्ही गारठून गेलो होतो. तेथील उपाहारगृहातील कामगाराने आम्हाला तेथील शेगडीजवळ बसून शेकायला सांगितले आणि चहा दिला. तेव्हा आम्हाला कशाचीच भीती वाटली नाही. त्या वेळीही परात्पर गुरु डॉक्टर आमच्या जवळ असल्याची आम्हाला जाणीव झाली आणि त्यांच्या अनंत कृपेमुळे आम्ही दोघांनी गुरुतत्त्व अन् गुरुकृपेचा वर्षाव अनुभवला.
दुसर्या दिवशी आम्ही वैष्णोदेवीला डोलीतून (पर्वतावर चढण्यासाठी बनवलेली आसंदी. यात बांबू घालून चार माणसे व्यक्तीला उचलून नेतात.) गेलो. रात्रभर धो धो पाऊस पडत होता. विजेच्या कडकडाटात आम्ही अक्षरशः रात्रभर डोलीत बसून होतो.
अजूनही वरील दोन्ही दृश्ये आमच्या डोळ्यांसमोरून जात नाहीत. प्रतिवर्षी अमरनाथ यात्रा चालू झाल्यावर आम्ही केलेल्या यात्रेची आठवण येते. ‘आम्हाला चैतन्य आणि सात्त्विक वातावरण अनुभवण्यास मिळाले’, याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
‘परात्पर गुरु डॉक्टर, आता माझ्या शारीरिक यातना एकदम न्यून झाल्या आहेत. वयाच्या मानाने जमेल, तेवढी सेवा करतो. ‘अशीच सेवा होऊ दे’, हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
– श्री. सदाशिव दादोबा जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८९ वर्षे) आणि सौ. रजनी सदाशिव जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे), इचलकरंजी (१६.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |