श्रीक्षेत्र महांकाली, गुप्तेश्वर आणि अंजनेश्वर मंदिरे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरीत करा ! – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी
केंद्रीय पुरातत्व विभागाकडून महाराष्ट्रातील प्राचीन संरक्षित मंदिरांच्या जीर्णाेद्धाराला आडकाठी !
नागपूर २७ डिसेंबर (वार्ता.) – केंद्रीय पुरातत्व विभागाकडे असलेली श्रीक्षेत्र महांकाली मंदिर, श्रीक्षेत्र गुप्तेश्वर मंदिर आणि श्रीक्षेत्र अंजनेश्वर मंदिर जीर्णाेद्धारासाठी राज्य पुरातत्व विभागाकडे हस्तांतरीत करावीत, अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. केंद्रीय पुरातत्व विभागाकडून महाराष्ट्रातील प्राचीन संरक्षित मंदिरांच्या जीर्णाेद्धाराला आडकाठी होत असल्यामुळे ही मागणी त्यांनी केल्याचे सांगितले.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील धारासूर गावातील श्रीक्षेत्र गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णाेद्धारासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित करण्यात आली. त्या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी गुप्तेश्वर मंदिराच्या जतन आणि दुरुस्ती यांसाठी २१ कोटी २ लाख ७० सहस्र ७४६ रुपयांचे अंदाजपत्रक सिद्ध केले आहे. या रकमेला मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीची मान्यता घेण्यात येत आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या विरोधात लढण्यासाठी जेथील संतमहंतानी योगदान दिले, अशा परभणी जिल्ह्यातील राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज, रंगनाथ महाराज सोनपेठकर, मारुती महाराज दस्तापुलकर या तीनही संतांची जन्मस्थाने विकसित करण्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी या वेळी परभणी येथील भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली.
यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देशातील सांस्कृतिक वारशांमध्ये आम्ही पहिल्या १० मध्ये आहोत. महाराष्ट्रात सांस्कृतिक वारशांची संख्या अमर्यादित आहे; मात्र निधी मर्यादित आहे. त्यामुळे त्याचा समतोल साधावा लागेल. सांस्कृतिक वारशांचे जतन करण्यासाठी पुढील ३ वर्षांत १ सहस्र कोटी रुपयांहून अधिक निधी दिली जाईल. जिल्हा वार्षिक नियोजनमधूनही ३ टक्के निधी गड-किल्ले, संरक्षित स्मारके यांच्या जतन आणि संवर्धन यांसाठी देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
________________________________________________
केंद्रीय पुरातत्व विभाग काम करून देत नाही !
केंद्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्रातील संरक्षित स्मारकांचे केंद्रीय पुरातत्व विभाग स्वत: काम करत नाही आणि आम्हालाही एक इंचही पुढे जाऊ देत नाही. याविषयी केंद्रीय मंत्र्यांची भेटही घेणार आहोत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
_______________________________
मार्कंडेश्वर मंदिरासाठी ९१ कोटी निधी मान्य !
या वेळी भाजपचे आमदार देवराव होळी म्हणाले की, गडचिरोली येथील मार्कंडेश्वर या प्राचीन मंदिराच्या जीर्णाेद्धारासाठी रोजगार हमी योजनेतून १०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ७ वर्षे झाले तरी हा निधी प्राप्त झालेला नाही. ‘हा निधी प्राप्त व्हावा’, अशी मागणी त्यांनी या वेळी सभागृहात केली.
यावर सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दक्षिण काशी’ अशी ओळख असलेल्या मार्कडेंश्वर मंदिराची ९१ कोटी रुपयांच्या निधीला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली असल्याचे सांगितले.