अमेरिकेसह जगातील १०४ लोकशाही देशांमधील नागरिकांना हवा शक्तीशाली नेता !

  • लोकांचा लोकशाहीविषयी भ्रमनिरास होत आहे !

  • अनेक देशांमध्ये लोकशाहीचा ५० टक्के र्‍हास !

स्टॉकहोम (स्विडन) – येथील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स’च्या (‘इंटरनॅशनल आयडीईए’च्या) वार्षिक अहवालात म्हटले आहे की, जगातील अमेरिकेसह १०४ देशांच्या राजकीय स्थितीच्या अभ्यासांती सिद्ध केलेल्या अहवालानुसार, लोकशाही देशांतील लोकांच्या मूल्यांमध्ये, विचारपद्धतीत पालट झाला आहे. तेथील लोकांना आता एक सशक्त नेता हवा आहे.

या अहवालात पुढे म्हटले आहे की,

१. ‘वर्ष २००९ मध्ये केवळ ३८ टक्के लोकांना अधिक शक्तीशाली नेता हवा होता. आता जगातील ७७ लोकशाही देशांमध्ये, अर्ध्याहून अधिक म्हणजे ५२ टक्के लोकांना देशाचे नियंत्रण एखाद्या शक्तीशाली नेत्याच्या हातात असावे’, असे वाटते.

२. दशकापूर्वी लोकशाहीच्या र्‍हासाचे प्रमाण १२ टक्के होते; परंतु आता ते ५० टक्के झाले आहे. या देशांमध्ये अमेरिका, ब्राझिल, फ्रान्स, ब्रिटन आणि भारत यांचा समावेश आहे. अफगाणिस्तान आणि बेलारूस यांसारख्या लोकशाही नसलेल्या देशांमध्ये शासकीय दडपशाही वाढली. लोकशाहीकडे सर्वाधिक ओढा असलेल्या अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या देशांतील जनता सध्या अन्नधान्याची टंचाई, महागाई, विजेच्या वाढत्या किमती आणि मंदीचा सामना करत आहे. लोकशाही नांदणार्‍या देशांतील अनेक समस्यांसाठी लोक केवळ सत्ताधार्‍यांनाच उत्तरदायी मानतात.

३. जगात झपाट्याने वाढत चाललेली विषमता, निवडणुकांवर विश्‍वास अल्प होणे ही लोकशाही दुर्बल होण्याची कारणे जगातील सर्व देशांमध्ये जवळपास सारखीच आहेत. या देशांमध्ये राजकीय ध्रुवीकरण झाले. त्यामुळे लोकांचा लोकशाही संस्थांवरील विश्‍वास अल्प झाला. निवडणुकांमध्ये अपप्रकार झाले. जिथे तसे झाले नाही तिथेही ‘प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या’, यावर लोकांचा विश्‍वास नाही. नागरिकांच्या समानतेच्या गप्पा मारणार्‍या लोकशाहीत विषमता झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे लोकांचा लोकशाहीविषयी भ्रमनिरास होत आहे.

४. यावर्षी निम्म्या जगामध्ये लोकशाही धोक्यात दिसली. रशियाच्या आक्रमणाने उद्ध्वस्त झालेले युक्रेन हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण ठरले. लढाई अजूनही चालू आहे. जग याकडे लोकशाही विरुद्ध हुकूमशाही म्हणून पहात आहे. ‘टाइम’ नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत युक्रेनचे राष्रट्रपती वोलोदिमिर झेलेंस्की यांनी जगाला चेतावणी दिली की, जर आमचा नाश झाला, तर तुमच्या आकाशात चमकणारी लोकशाहीही नाहीशी होईल.