प्रेरणादायी वक्ते श्री. विवेक मेहेत्रे यांची देवद येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
पनवेल – ठाणे येथील प्रेरणादायी वक्ते (मोटिवेशनल स्पिकर), व्यंगचित्रकार आणि प्रकाशक श्री. विवेक मेहेत्रे यांनी नुकतीच सहकुटुंब देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला भेट दिली. आश्रम पाहून त्यांनी अभिप्राय व्यक्त करतांना सांगितले की, आश्रमातील चैतन्यमय वातावरण, कमालीची स्वच्छता, सात्त्विकता आणि साधकांची आत्मियता या गोष्टी सर्वांना कोठेही आत्मसात कराव्यात अशाच आहेत. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. वैशाली मेहेत्रे, मुलगी कु. मनोज्ञा मेहेत्रे आणि अन्य नातेवाईक उपस्थित होते. सौ. वैशाली मेहेत्रे आणि त्यांच्या आई यांनी आश्रम पाहून आश्रमात रहाण्यास येण्याची इच्छा व्यक्त केली. ‘आश्रमाच्या वास्तूच्या संदर्भात काही सुचवायचे आहे का ?’, असे श्री. विवेक मेहेत्रे यांना विचारल्यावर त्यांनी नम्रपणे काही पालट सुचवले.
श्री. विवेक मेहेत्रे यांची ओळख
श्री. विवेक मेहेत्रे हे अभियंता असून त्यांनी २० वर्षे पर्यावरण अभियंता म्हणून मुंबई महापालिकेत नोकरी केली. स्वेच्छानिवृत्ती घेऊन सध्या ते प्रेरणादायी वक्ते (मोटिवेशनल स्पिकर) म्हणून कार्यरत असून ते १६ वर्ग चालवतात, तसेच त्याच्या संदर्भात लेख लिहितात. ते राष्ट्रीय स्तरावर व्यंगचित्रकार म्हणूनही कार्यरत असून त्यांची व्यंगचित्रे वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होतात. वृत्तवाहिन्या आणि दूरदर्शनवर त्यांनी सूत्रसंचालन केले आहे. त्यांची स्वत:ची प्रकाशन संस्था असून वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये जाऊन ते त्या संदर्भात मार्गदर्शन करतात. (आस्थापनांना त्यांची माहिती पुस्तिका बनवण्यास मार्गदर्शन करतात.) त्यांचा वास्तू आणि ज्योतिष या शास्त्रांचा २५ वर्षांहून अधिक अभ्यास आहे.