‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त उपस्थित रहाणार्या जिज्ञासूंनी केलेले प्रयत्न, त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती !
‘वर्ष २०१९ च्या शेवटी आलेल्या कोरोना महामारीच्या कालावधीत जगभरात दळणवळण बंदी लागू झाली. अनेक ठिकाणी कौटुंबिक समस्यांमध्ये वाढ होऊन जीवन तणावपूर्ण झाले होते. ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.
सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये ‘साधना सत्संगा’तील जिज्ञासूंना जोडून ठेवण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी सत्संगसेवकांना सतत मार्गदर्शन करून साधना सत्संगाच्या सत्संगसेवकांना घडवतात. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन सत्संगसेवकांनी प्रयत्न केल्याने सत्संगसेवक आणि सत्संगातील जिज्ञासूही प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) प्रती उत्कट भाव अनुभवत आहेत. परात्पर गुरुदेवांचा संकल्प, सद्गुरु आणि संत यांचे आशीर्वाद यांमुळे साधना सत्संगाला उपस्थित रहाणार्या अनेक जिज्ञासूंनी त्यांच्या जीवनात आमूलाग्र पालट घडल्याचे अनुभवले.
पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथे चालू असलेल्या साधना सत्संगांच्या माध्यमातून जिज्ञासूंनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न, अनुभवलेले पालट आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. ‘ऑनलाईन सत्संगा’द्वारे विविध जिल्ह्यांतील जिज्ञासू जोडले जात असल्याने या लेखात मुंबई आणि जळगाव या जिल्ह्यांतील जिज्ञासूंच्याही अनुभूती समाविष्ट करण्यात आल्या आहेत.’ (२६.१२.२०२२ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.)
– सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), पुणे. (२९.८.२०२२) (भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/639514.html
२. मुंबई
२ अ. सौ. हेमा शेवाळे, विरार, मुंबई.
२ अ १. नामजपादी उपाय आणि सेवा करण्याचा प्रयत्न केल्यावर ग्लानी येण्याचे अन् चिडचिड होण्याचे प्रमाण उणावणे आणि त्यामुळे समष्टी सेवा करण्याची तळमळ वाढणे : ‘मला सतत ग्लानी येत असे. साधना सत्संगामध्ये साधनेचे महत्त्व कळल्यावर मी नामजपादी उपाय आणि अधिकाधिक वेळ सेवा करत आहे. सेवेला आरंभ केल्यानंतर मला ग्लानी येण्याचे आणि माझे चिडचिड होण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. त्यामुळे माझी समष्टी सेवा करण्याची तळमळ पुष्कळ वाढली. दत्तजयंतीच्या निमित्ताने मी विरारमध्ये ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी पुढाकार घेऊन ‘प्रदर्शनासाठी अनुमती घेणे, प्रदर्शन लावणे’ इत्यादी सेवा केल्या. आता मी प्रतिदिन घरातील सर्व कामे करून सेवा करते.’
३. सोलापूर
३ अ. अधिवक्त्या (सौ.) स्वाती मारडकर
३ अ १. साधना सत्संगामुळे स्वतःमध्ये सकारात्मक पालट झाले असल्याचे जाणवणे : ‘पूर्वजन्मीची पुण्याई असल्याने मला सनातन संस्थेचा सत्संग लाभत आहे. सनातनच्या सत्संगामुळे माझ्यामध्ये सकारात्मक पालट झाले आहेत. ‘श्री गुरु आपल्यामध्ये इतका पालट करू शकतात’, हे मला सनातनच्या सत्संगात आल्यावर कळले.
३ अ २. जेव्हा मला थकवा जाणवतो, तेव्हा मी स्वतःची मानस दृष्ट काढते. त्यानंतर मला पुष्कळ प्रसन्न वाटते.
३ अ ३. सनातनच्या सत्संगसेवकांचा आधार वाटणे : मला सनातन संस्था आणि तिचे सत्संगसेवक यांचा नेहमी आधार वाटतो. ‘आपले कुणीतरी आहे आणि आपल्याला साधना सांगून ते ती करून घेत आहेत’, यांसाठी मला कृतज्ञता वाटते.’
३ आ. सौ. मीना राजमाने, सोलापूर
३ आ १. सत्संगसेवकांनी समजावून सांगितल्यावर यजमान साधना करू लागणे आणि त्यामुळे समाधान वाटून ‘अधिकाधिक वेळ सेवा करावी’, असे वाटणे : ‘सत्संगसेवक माझ्या यजमानांना सतत दूरभाष करून साधनेचे महत्त्व सांगून ‘देव कसे साहाय्य करतो ?’, हे सांगत असत. त्यामुळे यजमानांनी साधनेला आरंभ केला. त्यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेला आरंभ केल्यापासून मला फार समाधान वाटून आनंद मिळत आहे. गुरुदेवांमुळेच माझ्या अनेक अडचणी सुटल्या आहेत. त्यामुळे मला ‘अधिकाधिक वेळ सनातनचे अध्यात्मप्रसाराचे कार्य करावे’, असे वाटते. सध्या मी ‘जिज्ञासूंना संपर्क करणे आणि सनातनच्या ग्रंथांचे वितरण करणे’, या सेवा नियमित करण्याचा प्रयत्न करते.’
३ इ. श्री. राजेंद्र गुजर (वय ६५ वर्षे), सोलापूर
३ इ १. नामजपाचे महत्त्व कळल्यावर वहीत नामजप लिहिणे आणि सेवेला आरंभ करणे : ‘साधना सत्संगातून नामजपाचे महत्त्व कळल्यावर मी वहीत नामजप लिहिण्यास आरंभ केला. आतापर्यंत मी ७० वह्या भरून नामजप लिहिला आहे आणि सत्संगांतील सर्व विषय वहीमध्ये लिहून घेतले आहेत. मी सनातनचे ग्रंथ मोठ्या संख्येने खरेदी करून त्यांचे वितरणही केले आहे.
३ इ २. धनाच्या त्यागाचे महत्त्व समजल्यानंतर स्वतःची वाहने अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी अर्पण करणे : साधना सत्संगात धनाच्या त्यागाचे महत्त्व समजल्यानंतर मी माझे चारचाकी वाहन अर्पण करण्याचा निर्णय घेतला आणि माझी नवीन गाडी आल्यावर मी ती घरी न नेता अर्पण केली.’
३ ई. सौ. सुनीता कदम, अकलूज, जिल्हा सोलापूर.
१. ‘मी साधना सत्संगात सांगितल्याप्रमाणे तत्परतेने कृती करण्याचा प्रयत्न करते. आता मी नियमितपणे दिवसभर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करते.’
२. ‘केसांचा अंबाडा घालणे’, ही सात्त्विक केशरचना आहे’, असे सत्संगात सांगितले होते. त्यानंतर मी सलग ८ दिवस अंबाडा घातला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘अंबाडा घातल्याने केस न तुटता व्यवस्थित रहातात.’
४. जळगाव
४ अ. सौ. कल्पना भंगाळे, जळगाव
४ अ १. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या ‘ऑनलाईन’ सत्संगामध्ये सहभागी झाल्यापासून साधनेचे गांभीर्य आणि सेवेची तळमळ वाढणे : ‘मी मागील दीड वर्षापासून नियमितपणे साधना सत्संगात सहभागी होते आणि सत्संगात सांगितल्याप्रमाणे ‘नामजपादी उपाय करणे अन् स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे’, असे प्रयत्न नियमितपणे करते. मी सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु स्वाती खाडये) यांच्या‘ऑनलाईन’ सत्संगामध्ये सहभागी झाले होते. तेव्हापासून माझे साधनेचे गांभीर्य आणि सेवेची तळमळ वाढली आहे. ‘घरातील प्रसंगांवरही मी साधनेच्या दृष्टीकोनातून कसा विचार करायचा ?’, ते सत्संगात समजून घेतले.
४ अ २. भावाचे निधन झाल्यावर वहिनीला आधार देणे आणि घरात नामजप लावून ठेवणे : माझ्या भावाचे अकस्मात् निधन झाले. तेव्हा मी माझ्या वहिनीला आधार दिला. घरात नामजप लावून ठेवला. तेथे आलेल्या नातेवाइकांना मी साधना सांगितली. आता माझ्या २ बहिणी आणि वहिनी यांनी नामजप सत्संगात सहभागी व्हायला आरंभ केला आहे.
४ अ ३. मी सामाजिक माध्यमांतून ‘अध्यात्मप्रसार आणि ग्रंथांचे वितरण करणे’, या सेवा नियमितपणे करत आहे.’
(क्रमशः)
(सर्व सूत्रांचा दिनांक : ७.९.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |