पुणे शहरात चालू वर्षी अमली पदार्थांच्या विक्रीत वाढ !
पुणे – चालू वर्षामध्ये पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने तस्करांवर कारवाई करत त्यांच्याकडून ६ कोटी ६९ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये गांजा आणि मेफेड्रोनची (एम्.डी.) सर्वाधिक तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षामध्ये १५ डिसेंबरपर्यंत ‘अमली पदार्थविरोधी पथक १’ने एकूण ६५ गुन्हे नोंद केले असून ८९ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ कोटी २३ लाख ९३ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. कोकेन तस्करीचे ३ गुन्हे असून त्यात ६ आरोपींना अटक करत त्यांच्याकडून २ कोटी ५४ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. ‘अमली पदार्थविरोधी पथक २’ने ४७ गुन्हे नोंद करत ७० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ४५ लाख १२ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
इतर अमली पदार्थांमध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश असून त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय, हे लक्षात आल्यानंतर गांजा विक्रीमध्ये वाढ झाली आहे. वर्ष २०२१ मध्ये गांजा विक्री करणार्यांवर ५६ गुन्हे नोंद करून ८३ जणांना अटक केली आहे, तर चालू वर्षात ६४ गुन्हे नोंद करत ७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
संपादकीय दृष्टिकोनसांस्कृतिक वारसा असणार्या पुण्यासारख्या शहरात अमली पदार्थांच्या विक्रीत वाढ होणे, हे संस्कृती नष्ट होत चालल्याचे द्योतक. तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यापासून थांबवण्यासाठी अमली पदार्थांची तस्करी करणार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |