सनबर्न आयोजकांना प्रति चौरस मीटर ५ सहस्र ४०० रुपये भाडे द्यावे लागणार !
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचा कोमुनिदादला भूमीचे भाडे वाढवण्याचा आदेश
पणजी – हणजूण कोमुनिदादच्या परिसरातील भूमी भाडेपट्टीवर देण्यासाठी ५ सहस्र ४०० रुपये प्रति चौरस मीटर शुल्क घ्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात वागातोर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक कार्यक्रमासाठी भूमीचे नवे वाढीव दर लागू होणार आहेत.
येत्या आठवड्यात वागातोर येथे आयोजित करण्यात येणार्या सनबर्न कार्यक्रमासाठी कोमुनिदादने ७७ लाख रुपये घेण्याचा ठराव संमत केला होता. त्यानंतर हा ठराव कोमुनिदादने प्रशासनाकडे पाठवला असता तो परत पाठवण्यात आला, तसेच प्रशासनाने कोमुनिदादच्या १५ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शुल्क आकारण्याची सूचना केली. याची नोंद घेऊन हणजूण कोमुनिदादने ४ सहस्र ५०० रुपये प्रति चौरसमीटर हा दर निश्चित केला. या संदर्भात उच्च न्यायालयात डॉ. फेंटन डिसोझा आणि ट्रेव्हर मास्करेन्हस यांनी खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यात राज्य सरकार, महसूल खात्याचे सचिव, कोमुनिदाद प्रशासक, हणजूण कोमुनिदाद, जॉन स्टीफन डिसोझा आणि स्पेसबामाऊंड वेब लॅब प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी राज्याचे अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी कोमुनिदाद प्रशासनाने गोवा मुद्रांक शुल्क नियम २००३ नुसार शुल्क घेण्याची सूचना केली असल्याची माहिती खंडपिठासमोर सादर केली आणि वरील नियमांचे संदर्भ सादर केले. याची नोंद घेऊन खंडपिठाने ५ सहस्र ४०० रुपये प्रति चौरस मीटर शुल्क आकारण्याचा आदेश जारी केला. त्याचप्रमाणे कोमुनिदाद परिसरात आयोजित केलेल्या अन्य ३ कार्यक्रमांच्या आयोजकांना याचिकेत प्रतिवादी करण्यासाठी अनुमती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारी २०२३ या दिवशी होणार आहे.