सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घरी येण्यापूर्वी आणि आल्यानंतर कोल्हापूर येथील सौ. पूजा सातपुते यांना आलेल्या अनुभूती अन् जाणवलेले पालट
१. अनुभूती
१ अ. सद्गुरु स्वातीताई घरी येण्यापूर्वी निसर्ग, झाडे, पशू-पक्षी यांनाही आनंद झाल्याचे जाणवणे : ‘सद्गुरु ताई घरी येणार’, हे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मला ‘काय करू आणि काय नको’, असे झाले होते. पारिजातकाचे कोमेजलेले झाड टवटवीत झाले होते. पक्षी झाडावर मंजूळ आवाजात बोलत होते.
१ आ. सद्गुरु स्वातीताई येण्यापूर्वी दोन वेळा घरात पुष्कळ सुगंध येत होता.
१ इ. सद्गुरु ताई देवी असल्याचे जाणवून त्यांचे चैतन्य घरात पसरणे आणि मन निर्विचार होणे : ‘सद्गुरु ताई देवी असून त्यांनी लाल रंगाची साडी परिधान केली आहे. झपाझप पावले टाकत देवी दाराजवळ येऊन उभी राहिल्यावर ‘आजूबाजूची सर्व त्रासदायक शक्ती नष्ट होत आहे’, असे मला दिसले. देवीने उजवा पाय घरात ठेवल्यावर घरात पिवळा प्रकाश पसरलेला दिसला. ‘देवीसमोर मी पुष्कळ छोटी आहे’, असे मला जाणवले. देवीचे तेज मला सहन होत नव्हते. मी पूर्ण निर्विचार झाले होते.
१ ई. देहभान हरपणे : सद्गुरु ताई आल्यानंतर माझे देहभान पूर्णपणे हरपले होते. मला भूकही लागली नाही. त्यानंतर मला निर्विचार झाल्यासारखे वाटू लागले. त्या वेळी ‘पती अन् मुले काय बोलतात ?’, याकडे माझे लक्ष नव्हते.
१ उ. सद्गुरु स्वातीताई घरी येऊन गेल्यानंतर स्वयंपाकघरातील लादी मऊ अन् गुळगुळीत झाल्याचे जाणवले.
२. पितृपक्षातील श्राद्ध-विधी करण्यातील सर्व अडथळे दूर होऊन विधी चांगला होणे
पितृपक्षामध्ये घरी श्राद्धविधी चालू असतांना ‘अनेक पूर्वजांचे लिंगदेह घराबाहेर येऊन थांबले आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. विधी झाल्यानंतर बाहेर पान ठेवल्यावर ‘पूर्वजांचे लिंगदेह तृप्त होऊन हसत हसत वर जात आहेत’, असे दिसले. सद्गुरु स्वातीताई घरी आल्यामुळेच श्राद्धविधी करण्यातील सर्व अडथळे दूर झाले. त्यामुळेच आम्ही विधी व्यवस्थित करू शकलो.
३. झालेले पालट
३ अ. सद्गुरु स्वातीताईंच्या मार्गदर्शनानंतर यजमानांकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यांच्याविषयी मनात येणार्या प्रतिक्रिया न्यून होणे : पूर्वी मला कोणतीही गोष्ट स्वीकारता यायची नाही. ‘समोरचा कसा चुकतो आणि माझेच कसे योग्य आहे ?’, हे पटवून देण्यात मी माझा वेळ घालवत असे. माझ्या मनात यजमानांविषयी पुष्कळ प्रतिक्रिया येत असत. ‘त्यांना कोणतेही काम कितीही वेळा सांगितले, तरी ते ऐकत नाहीत. ते कोणतीही कृती वेळेवर करत नाहीत. त्यांना काहीही सांगितले, तरी ते स्वीकारत नाहीत’, असे विचार आणि प्रतिक्रिया मला येत होत्या. सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन झाल्यापासून मी त्यांच्यातील गुण पहायला शिकले. आता त्यांनी काहीही सांगितले, तरी मी ते ऐकण्याचा प्रयत्न करते. मला त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांचे प्रमाण न्यून झाले आहे. मला आता त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटते.
३ आ. मुलांकडून असणार्या अपेक्षा आणि त्यांच्याविषयी वाटणारी काळजी यांमुळे येणारी चक्कर अल्प होणे : पूर्वी मला मुलांकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या आणि व्यवसायाची पुष्कळ काळजी वाटायची. या विचारांनी मला अधून-मधून चक्कर यायची. माझे नाडी परीक्षण केल्यावर वैद्यांनी सांगितले, ‘‘या पुष्कळ विचार करतात आणि त्याचा ताण यांच्या मेंदूपर्यंत पोचला आहे. कधी काय होईल, ते सांगता येत नाही.’’ आता मला मुलांची काळजी वाटत नाही आणि चक्कर येणेही बंद झाले आहे.
३ इ. संधीवातामुळे नकारात्मक विचार वाढणे आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न अन् नामजपादी उपाय करू लागल्यावर शारीरिक त्रास न्यून होणे : मध्यंतरी माझे सांधे अन् कंबर दुखायला लागली; म्हणून तपासणी केली. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला संधीवात झाला असून ५ मणके आणि चकत्या झिजल्या आहेत. तुम्ही वर्षभर संधीवाताच्या गोळ्या घ्या.’’ त्यांनी मला पूर्ण विश्रांती घेण्याचा समुपदेश (सल्ला) दिला. संधीवात पूर्ण बरा होत नसल्याने आधुनिक वैद्यांनी मला एक वर्षानंतर पुन्हा तपासणी करण्यास सांगितले. हे ऐकल्यावर माझ्या मनात स्वतःविषयी पुष्कळ नकारात्मक विचार येऊ लागले. नंतर सद्गुरु स्वातीताईंनी सांगितलेले व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न आणि नामजपादी उपाय चालू केल्यानंतर माझी संधीवाताची गोळी बंद झाली. आता मला पुष्कळ चांगले वाटते.
३ ई. नातेवाइकांप्रती असलेला पूर्वग्रह न्यून होऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटू लागणे : पूर्वी माझ्या मनात सासूबाईंविषयी पुष्कळ प्रतिक्रिया होत्या. आता मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटू लागली आहे. ‘देवाने माझ्या प्रारब्धातील देवाण-घेवाण हिशोब त्यांच्या माध्यमातून फेडून घेतला’, असे मला वाटत आहे. माझ्या मनात नणंदेविषयीही पुष्कळ प्रतिक्रिया होत्या; पण आता मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटत आहे. ताईंनीच (नणंदेनेच) आम्हाला सनातन संस्थेत आणले. त्यांच्यामुळेच माझे पती साधनेत आले आणि त्यांच्यामुळेच परात्पर गुरुमाऊली मला भेटली. त्यामुळे मला नणंदेच्या प्रतीही कृतज्ञता वाटते.
‘हे गुरुदेवा, ‘सद्गुरु स्वातीताई आल्यामुळे माझ्या अल्प बुद्धीला एवढे तरी कळले’, या विचारामुळे मला पुष्कळ आनंद मिळाला. सर्व सूत्रे कृतीत आणली, तर केवढा आनंद मिळेल. ‘देवा, तूच हे सर्व लिहून घेतलेस; म्हणून तुझ्या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. पूजा सातपुते, कोल्हापूर (वर्ष २०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |