मुक्ताईनगर (जळगाव) येथील गौण खनिज उत्खनानात ४०० कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप
एस्.आय.टी. द्वारे चौकशी होणार !
नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या ४४ हेक्टरच्या मुरमाच्या टेकडीचे अवैधरित्या उत्खनन करून त्यातील मुरुम मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी काम करणार्या ‘गावर कन्स्ट्रक्शन’ आस्थापनाला विकून कोट्यवधी रुपये कमवण्यात आले. यामुळे शासनाचा ४०० कोटी रुपयांचा महसूल बुडाला, असा गंभीर आरोप मुक्ताईनगर (जळगाव) येथील भाजपचे आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांनी केला. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी २६ डिसेंबर या दिवशी लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी विधानसभेत केली. या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी असल्याचे नमूद करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशीची घोषणा केली.
ही टेकडी बिनशेतीची होती, तसेच या भूमीवरील शैक्षणिक आरक्षणही होते. सौ. मंदाताई खडसे यांनी राजकीय वजन वापरून हे आरक्षण हटवून ही भूमी शेतीखाली आणली आणि शेततळ्यासाठी उत्खनन करण्यात आले, असा आरोप चंद्रकांत निंबा पाटील यांनी केला. सौ. मंदाताई खडसे या एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत. एकनाथ खडसे यांनी मागील वर्षी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची सार्वजनिकरित्या वाच्यता केली होती; मात्र या मुरुम उत्खननाच्या प्रकरणात एकनाथ खडसे हेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सौ. मंदाताई खडसे यांनी २ जानेवारीला ही भूमी शेतीखाली आणण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर आवश्यक त्या सर्व अनुमती प्राप्त करून १४ जानेवारी या दिवशी प्रत्यक्ष गौण खनिज काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला. या ठिकाणी १० सहस्र यार्ड भूमीच्या उत्खनानासाठी अनुमती असतांना प्रत्यक्ष ३३ सहस्र ४१ यार्ड भूमीचे उत्खनन करण्यात आले. याचे उपग्रहाद्वारे झालेले व्हिडिओ चित्रीकरण माझ्याकडे उपलब्ध आहे, असा आरोप चंद्रकांत निंबा पाटील यांनी केला. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यामध्ये केवळ १० सहस्र ब्रास गौण खनिजाचा स्वामीत्व कर शासनाला प्राप्त झाला. प्रत्यक्षात अनुमती दिलेल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक उत्खनन झाल्याचे म्हटले.