रामनाथी आश्रमातील वास्तव्यात अकलूज येथील साधिका श्रीमती आशा गोडसे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
रामनाथी आश्रमातील वास्तव्यात अकलूज येथील साधिका श्रीमती आशा गोडसे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६१ वर्षे) यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. शिकायला मिळालेली सूत्रे
१अ. महाप्रसादाच्या संदर्भातील सूत्रे
१अ१. आश्रमातील महाप्रसादात साधकांचे पथ्य सांभाळले जाणे आणि ‘साधकांना महाप्रसादातून आवश्यक ती सर्व जीवनसत्त्वे मिळायला हवीत’, याची काळजी घेतली जाणे : १.१.२०२१ ते ९.६.२०२१ या कालावधीमध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होते. ‘आश्रमातील प्रत्येक सेवेचे नियोजन देवानेच केले आहे’, असे मला वाटले. एवढ्या साधकांचा महाप्रसाद सकाळी ११ वाजेपर्यंत सिद्ध असतो. रुग्णाईत साधकांचे पथ्याचे जेवण वेगळे बनवलेले असते. महाप्रसाद घेतांना माझी भावजागृती झाली. ‘प्रसाद सिद्ध करणारे साधक पुष्कळ कष्ट घेऊन भावपूर्ण प्रसाद बनवतात’, हे पाहून मन तृप्त होते. यात धान्य अर्पण देणारे आणि ते निवडणारे साधक यांचेही योगदान असते. आश्रमात ‘साधकांना महाप्रसादातून आवश्यक ती सर्व जीवनसत्त्वे मिळायला हवीत’, याची काळजी घेतली जाते.
१ अ २. फळाची एक फोड खाल्ली, तरी मन तृप्त होणे : वैशिष्ट्य म्हणजे आश्रमात साधकांसाठी त्या-त्या ऋतूत मिळणारी फळेसुद्धा ठेवलेली असतात. पटलावर फळांच्या फोडी करून ठेवलेल्या असतात. ‘साधकांनी किती फोडी घ्यायच्या ?’, याची पाटीही लावलेली असते. फळाची एक फोड खाल्ली, तरी मन तृप्त होते. घरी असे होत नाही. गुरुदेवांनी सांगितलेच आहे, ‘आपत्काळात काही नाही मिळाले आणि साधकांनी फुलाचा सुगंध घेतला, तरी साधक तृप्त होतील.’
१ अ ३. होळीच्या सणाला साधकांसाठी पुरणपोळ्या बनवतांना प्रत्येकाच्या चेहर्यावर सेवेचा आनंद दिसणे : आश्रमात होळीच्या सणाला सर्व साधकांसाठी पुरणपोळ्या बनवल्या होत्या. साधकांना घरी जाता येत नाही. तेव्हा त्यांना घराची आठवण येऊन ‘त्यांच्या साधनेवर परिणाम होऊ नये’, याची काळजी घेतली जाते. सर्व साधक भावपूर्ण पुरणपोळ्या बनवत होते. प्रत्येकाच्या चेहर्यावर सेवेचा आनंद दिसत होता.
१ अ ३ अ. पू. रेखा काणकोणकर यांच्या रूपात श्री अन्नपूर्णामाताच असल्याचे जाणवणे : साधक पुरणपोळ्यांचा प्रसाद घेत असतांना पू. रेखाताई (पू. रेखा काणकोणकर) ‘पटलावर सर्व ठेवले आहे ना, कुठे काही न्यून नाही ना’, हे थोड्या थोड्या वेळाने येऊन पहात होत्या. तेव्हा ‘प्रत्यक्ष श्री अन्नपूर्णामाताच हे बघत आहे आणि सर्व साधक वैकुंठलोकात आहेत’, याची क्षणाक्षणाला जाणीव होत होती.
१ आ. रुग्णाईत साधकांची काळजी घेणे
आश्रमातील आधुनिक वैद्य असलेले साधक प्रत्यक्ष ‘धन्वन्तरि देवता’ आहेत. ते रुग्णाईत साधकांची प्रेमाने काळजी घेतात. त्यांच्यातील भावामुळे त्यांच्यामध्ये देवतेचे दर्शन होते.
१ इ. साधकांच्या प्रत्येक कृतीत सेवाभाव, देवाचे अस्तित्व आणि साधकांची तळमळ अनुभवायला मिळते.
१ ई. आश्रमातील कार्यपद्धत कृतीत आणतांना भावजागृती होते. ‘कार्यपद्धत म्हणजे गुरुआज्ञापालनच आहे.’
१ उ. प्रत्येक साधक फलकावर लावलेल्या चुका वाचतो. तेव्हा ‘साधकांच्या माध्यमातून देवच चुका वाचत आहे’, असा अनुभव येतो.
२. अनुभूती
२ अ. ‘आश्रमात पाऊल ठेवताच भावजागृती होऊन थंड अश्रू येऊ लागले. या आपत्काळात आश्रमात यायला मिळाले, ही केवळ गुरुकृपाच आहे.
२ आ. ध्यानमंदिरात देवतांचे अस्तित्व जाणवणे : ध्यानमंदिरात गेल्यावर ‘सर्व देवीदेवता या भूवैकुंठात (रामनाथी आश्रमात) आहेत’, असे मला अनुभवायला मिळाले. मला परात्पर गुरु डॉक्टर गरुडावर बसलेले दिसले. माझा नामजप भावपूर्ण होत होता.
२ इ. आश्रम पहातांना साधकांच्या प्रत्येक कृतीतून देवाचे अस्तित्व जाणवून ‘सर्व साधकांमध्ये देवतांचे रूप आहे’, हे अनुभवायला येत होते.
२ ई. साधिकांकडे पाहून ‘कलियुगातील गोपींचे हसणे-बोलणे कसे होते ?’, याची अनुभूती येणे : एकदा धान्याशी संबंधित सेवा करतांना २ साधिका एकमेकींशी सेवेसंदर्भात बोलत होत्या. बोलतांना त्या हसल्या. तेव्हा त्यांच्या हसण्यानेच माझी भावजागृती झाली. तेव्हा ‘कलियुगातील गोपींचे हसणे-बोलणे कसे असते ?’ याची मी अनुभूती घेतली.
२ उ. ‘सौ. सुप्रिया माथूर बोलतांना त्यांच्याकडून सर्व साधकांकडे निळा प्रकाश परावर्तित होत आहे’, असे दिसणे : सौ. सुप्रिया माथूर या साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना ‘प्रत्यक्ष गुरुदेवच बोलत आहेत’, असे वाटते. त्या बोलत असतांना त्यांच्याकडून सर्व साधकांकडे निळा प्रकाश परावर्तित होत आहे’, असे दिसले. त्यांच्या प्रत्येक शब्दातून पुष्कळ प्रेमभाव जाणवतो, ‘जणू त्यांच्या जिभेवर सरस्वतीमाताच आहे’, असे वाटते.
२ ऊ. मंत्रपठण करतांना आलेल्या अनुभूती
२ ऊ १. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : आश्रमात नवग्रह मंत्रांचे पठण करतांना ‘मी विष्णुलोकात बसले आहे. विष्णुस्वरूपप.पू. गुरुदेव शेषशय्येवर आहेत. प्रत्येक मंत्र कमलपुष्प बनून त्यांच्या चरणांवर अर्पण होत आहे. गुरुदेवांना नवग्रह आणि देवता यांचे चैतन्य मिळत आहे अन् सगळीकडे निळा प्रकाश पसरला आहे’, असे मला जाणवले.
२ ऊ २. रुग्णाईत असतांना सेवा करता येण्यासाठी गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर मंत्रपठणाची सेवा मिळणे आणि ती भावपूर्ण होणे : एकदा मी रुग्णाईत होते. तेव्हा ‘आता मला काहीच सेवा करता येणार नाही’, असे वाटून मी गुरुदेवांना प्रार्थना केली. ‘गुरुदेवा, मला सेवा करायची आहे.’ तेव्हा माझा भाव जागृत झाला. तेवढ्यात एका काकूंचा भ्रमणभाष आला. त्यांनी ‘मंत्रपठणाची सेवा करू शकता का ?’, असे मला विचारले. तेव्हा ‘गुरुदेवांनीच सेवेचे नियोजन केले’, असे वाटून मला आनंद झाला आणि माझ्याकडून मंत्रपठणाची सेवा भावपूर्ण झाली.
२ ऊ ३. श्रीरामरक्षास्तोत्र पठण करत असतांना गुरुदेवांचे श्रीरामाच्या रूपात अस्तित्व जाणवणे : मी श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करत असतांना, ‘विष्णुस्वरूप गुरुदेव श्रीरामाच्या रूपात समोर आहेत. तेच श्रीरामरक्षास्तोत्र म्हणवून घेत आहेत’, असे मला वाटले. मला आश्रम आणि साधक यांच्याभोवती सप्तरंगी कवच दिसत होते. मला सर्व साधक आश्रमात एकत्र बसून सहजतेने श्रीरामरक्षास्तोत्र म्हणत असल्याचे जाणवले आणि मला पुष्कळ उत्साह वाटू लागला.’
– श्रीमती आशा गोडसे (आध्यात्मिक पातळी ६१, वय ६१ वर्षे), अकलूज, जिल्हा सोलापूर. (१०.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |