‘सनबर्न’ नव्हे, तर ‘संस्कृतीबर्न’ फेस्टिव्हल !
पुणे येथे ३१ डिसेंबर या दिवशी तरुणाईला उद्ध्वस्त करणार्या समाजविघातक ‘सनबर्न फेस्टिव्हल’’चे आयोजन करण्यात आले आहे. अमली पदार्थांची सर्रास होणारी विक्री, मद्यपान आणि धूम्रपान यांचा मुक्त संचार, पाश्चात्त्य संगीताच्या तालावर डोलत विनाशाकडे जाणारी युवा पिढी, ही या ‘सनबर्न’ची वैशिष्ट्ये (?) म्हणावी लागतील. या ‘फेस्टिव्हल’ला अनेक वेळा विरोध करूनही राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून जनतेच्या रोषाच्या विरोधात जाऊन अनुमती दिली जाते. त्यामुळे शिक्षण आणि संस्कृती यांचे माहेरघर असलेले सांस्कृतिक पुणे अपकीर्त होत आहे, तसेच यातून देशाचे भवितव्य असणारी युवा पिढीही व्यसनाधीन होत आहे.
‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये अनेक अमली पदार्थ उपलब्ध करून दिले जातात. हे उपलब्ध करून देणारे सर्व दलाल हे बहुधा परप्रांतीय अथवा विदेशी नागरिक असल्याचे दिसते. देहली, उत्तरप्रदेश, कर्नाटक अशा वेगवेगळ्या प्रांतांतून आलेले हे हस्तक येथे अमली पदार्थ तस्करी करत आहेत. नेपाळी, नायजेरियन, इस्रायली, जपानी, पॅलेस्टिनी अशी वेगवेगळी विदेशी मंडळी देशाच्या युवा पिढीला बरबाद करण्यासाठी सक्रीय आहेत, हे अतिशय गंभीर आणि संतापजनक आहे. यामुळे गुन्ह्यांचेही प्रमाण वाढत आहे. मद्यबंदीचा आदेश झुगारणे, अनुमती न घेता कार्यक्रमाचे आयोजन आणि तिकिटविक्री करणे, शासनाचा महसूल बुडवणे, युवक-युवतींचे होणारे संशयास्पद मृत्यू, ध्वनीमर्यादांचे उल्लंघन आदी कारणांमुळे वादात अडकलेला हा कार्यक्रम ‘सनबर्न’ नसून ‘संस्कृतीबर्न’च आहे. त्यामुळे युवकांनो, वेळीच सावध व्हा आणि या मोहापासून स्वतःला दूर ठेवा, यातच सर्वांचे हित आहे !
देशाची भावी पिढीच व्यसनाच्या आहारी जात असेल, तर भारताला महाशक्ती करण्याचे उद्दिष्ट कधीतरी साध्य होऊ शकते का ? याचा गांभीर्याने विचार या निमित्ताने होणे आवश्यक आहे, तसेच युवकांनीही क्षणिक मोहापायी, नशेच्या आहारी जाऊन अशा निरर्थक महोत्सवांमध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये. सरकार स्वतःच्या लाभासाठी असे कार्यक्रम आयोजित करत आहे, हा उद्देश लक्षात घेऊन सूज्ञ नागरिकांनीच या निर्णयाच्या विरोधात संघटित होऊन वैध मार्गाने प्रयत्न करायला हवेत. तसेच प्रशासनाला भावी पिढी आणि देशहित यांसाठी असे संस्कृती नष्ट करणारे कार्यक्रम रहित करण्यास भाग पाडावे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे