‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त उपस्थित रहाणार्या पुणे येथील जिज्ञासूंनी केलेले प्रयत्न, त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती !
‘वर्ष २०१९ च्या शेवटी आलेल्या कोरोना महामारीच्या कालावधीत जगभरात दळणवळण बंदी लागू झाली. अनेक ठिकाणी कौटुंबिक समस्यांमध्ये वाढ होऊन जीवन तणावपूर्ण झाले होते. ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.
सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये‘साधना सत्संगा’तील जिज्ञासूंना जोडून ठेवण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी सत्संगसेवकांना सतत मार्गदर्शन करून साधना सत्संगाच्या सत्संगसेवकांना घडवतात. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन सत्संगसेवकांनी प्रयत्न केल्याने सत्संगसेवक आणि सत्संगातील जिज्ञासूही प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) प्रती उत्कट भाव अनुभवत आहेत. परात्पर गुरुदेवांचा संकल्प, सद्गुरु आणि संत यांचे आशीर्वाद यांमुळे साधना सत्संगाला उपस्थित रहाणार्या अनेक जिज्ञासूंनी त्यांच्या जीवनात आमूलाग्र पालट घडल्याचे अनुभवले. पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथे चालू असलेल्या साधना सत्संगांच्या माध्यमातून जिज्ञासूंनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न, अनुभवलेले पालट आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.’ – सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), पुणे. (२९.८.२०२२) |
(भाग १)
१. पुणे
१ अ. सौ. पूजा जाधव, पुणे
१ अ १. स्वभावदोष-निर्मूलनाचे प्रयत्न केल्याने मनावरील ताण न्यून होणे : ‘मी साधना सत्संगात सहभागी होऊ लागल्यापासून माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी चांगले प्रयत्न झाले. त्यामुळे विविध कारणांमुळे माझ्या मनावर येणारा ताण न्यून झाला.
१ अ २. आईचे निधन झाल्यावरही साधिका स्थिर असणे आणि आईने निधनापूर्वी साधिकेला ‘सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असल्याने मला तुझी काळजी वाटत नाही’, असे सांगणे : १५.१.२०२२ या दिवशी माझ्या आईचे निधन झाले; मात्र त्याही परिस्थितीत मी स्थिर हाते. आईचे निधन झाल्यानंतरही मी साधना चालू ठेवली. माझ्या आईच्या निधनानंतर सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांनी मला दूरभाष केल्यावर मी त्यांना माझ्या आईने सांगितलेले वाक्य सांगितले. आई मला म्हणाली होती, ‘‘आता तू सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेस आणि सत्संगामुळे तुझ्यात पुष्कळ पालट झाला आहे. पूजा, मला आता तुझी काळजी वाटत नाही.’’
१ आ. सौ. कीर्ती महाजन, कोथरूड, पुणे.
१ आ १. बहीण रुग्णाईत झाल्यावर ‘साधनेचे प्रयत्न कसे करू ?’, असे सत्संगसेवकांना विचारणे : ‘मी आणि सौ. सोनाली अंबुलकर, आम्ही दोघी सख्ख्या बहिणी असून साधना सत्संगात सहभागी होत असतो. आम्ही दोघीही नियमितपणे व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी प्रयत्न करतो. काही दिवसांपूर्वी सौ. सोनालीताई रुग्णाईत झाली. घरातील कामे आणि बहिणीची सेवा यांमुळे धावपळ होऊन मला सारणी लिखाणासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. मी सत्संगसेवकांना भ्रमणभाष करून ‘साधनेचे प्रयत्न कसे करू ?’, असे विचारले.
१ आ २. ‘बहीण ही एक साधिका आहे’, असा भाव ठेवल्याने तिची सेवा मनापासून करता येणे : सत्संगसेवकांनी सांगितल्याप्रमाणे मी भाव ठेवून सोनालीताईची सर्व सेवा केली. सोनालीताई माझी बहीण असली, तरी ‘ती एक साधिका आहे’, असा भाव मी ठेवला. मी अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करून तिच्यासाठी स्वयंपाक करत असल्याने मला ताईला द्यावयाच्या जेवणातील पदार्थांत नाविन्य ठेवता आले. रुग्णाईत असतांना रुग्णाला जेवण्याची इच्छा होत नाही; मात्र सोनालीताई डबा येण्याची वाट पहायची. या कालावधीत मला ‘इतरांना समजून घेऊन कसे वागायचे ?’, हे शिकायला मिळाले.
१ आ ३. रुग्णालयातही साधनेचे केलेले प्रयत्न : मी रुग्णालयात सोनालीताईला कापूर, दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि विभूती दिली. ताईनेही भाव ठेवून आध्यात्मिक स्तरावरील सर्व उपाय केले. आम्ही दोघींनीही या कठीण प्रसंगात ‘खोलीत नामजप लावणे, गुरुस्मरण करणे, नामजपादी उपाय करणे’, असे प्रयत्न केले.’
१ इ. सौ. सोनाली अंबुलकर, सिंहगड रस्ता, पुणे.
१ इ १. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने शस्त्रकर्म टळले’, असे जाणवणे : ‘या आधी माझे ४ वेळा शस्त्रकर्म झाले आहे. या वेळी ‘आता पुन्हा शस्त्रकर्म होईल का ?’, असे मला वाटत होते; मात्र ‘केवळ गुरुकृपेने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने) शस्त्रकर्म टळले’, असे मला वाटले. त्यामुळे मला मनातून प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१ इ २. ‘गुरुदेवांच्या कृपेने रुग्णालयातील परिचारिकांनी मला पुष्कळ प्रेमाने साहाय्य केले. त्यांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांनीच माझ्यावर कृपा केली’, असा माझा भाव आहे.’
१ ई. सौ. सुवर्णा देवकर, रविवार पेठ, पुणे.
१ ई १. स्वयंसूचना देऊन नामजप केल्यावर मनातील नकारात्मक विचार न्यून होणे : ‘माझ्या घरी पुष्कळ अडचणी होत्या. त्यामुळे माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. शेवटी मी सत्संगसेवकांना भेटायला त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्याकडून नामजप कोणता करायचा आणि नकारात्मक विचारांवर स्वयंसूचना कोणती द्यायची, हे समजून घेतले. स्वयंसूचना देऊन नामजप केल्यावर माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून झाले.
१ ई २. यजमान रुग्णाईत असतांना प्रार्थना आणि नामजप केल्यामुळे स्थिर रहाता येणे : माझे यजमान पुष्कळ रुग्णाईत होते. तेव्हा मी नामजप आणि प्रार्थना करून त्या प्रसंगात स्थिर रहाण्यासाठी प्रयत्न केला.
१ ई ३.साधना सत्संगातून मिळणारे चैतन्य, ज्ञान आणि सात्त्विकता यांमुळे मला कठीण प्रसंगांना सामोरे जाता आले’, असे मला वाटते.’
१ उ. सौ. अमिता केंकरे, गावठाण, पुणे.
१ उ १. साधना सत्संगात सांगितलेल्या साधनेच्या दृष्टीकोनांमुळे स्वभावदोषांवर मात करता येऊन मनावरचा ताण न्यून होणे : ‘मी नियमितपणे साधना सत्संगात सहभागी होते. माझ्या घरी अनेक अडचणी असल्यामुळे घरात सतत तणावाचे वातावरण असते. मला साधना सत्संगामध्ये ‘प्रारब्ध म्हणजे काय ? नामजपाने प्रारब्ध कसे सुसह्य होते ? परिस्थिती स्वीकारून स्थिर कसे रहायचे ?’, हे शिकायला मिळाले. सत्संगात सांगितलेल्या साधनेच्या दृष्टीकोनांमुळे मला ‘भीती वाटणे किंवा परिस्थितीला सामोरे जाता न येणे’, या स्वभावदोषांवर मात करता आली आणि मनावर येणार्या ताणामुळे होणारा त्रास न्यून झाला.
१ उ २. प्रयत्नपूर्वक मनातल्या मनात नामजप केल्यावर अधिक स्थिरता अनुभवता येणे : माझा पोळ्या वितरण करण्याचा व्यवसाय आहे. पोळ्यांच्या व्यवसायातील व्यस्ततेमुळे माझा नामजप होत नव्हता. मी सत्संगसेवकांशी बोलून प्रयत्नपूर्वक मनातल्या मनात नामजप करायला आरंभ केला. त्यामुळे आता मला पूर्वीपेक्षा अधिक स्थिरता अनुभवता येत आहे.
१ उ ३. आता माझे यजमान आणि मुले यांनीही सत्संग ऐकण्यास आरंभ केला आहे.’
१ ऊ. सौ. संध्या उचाळे, बारामती, जिल्हा पुणे.
१ ऊ १. ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप केल्याने मुलगा आणि बहीण यांचा त्रास न्यून होऊन त्यांना चांगली झोप लागणे : ‘साधना सत्संगात सहभागी होण्यास आरंभ केल्यानंतर मी ‘माझ्या नातेवाइकांना साधना सांगणे, अर्पण गोळा करणे, नामसत्संग घेणे’, अशा सेवा अधिक वेळ करू लागले. साधनेला आरंभ केल्यामुळे माझ्या कुटुंबियांमध्ये अनेक पालट झाले. पूर्वी माझा मुलगा कु. सिद्धांत (वय १३ वर्षे) रात्री झोपेत घाबरून उठत असे. ‘त्याला हा त्रास पूर्वजांमुळे होत आहे’, हे लक्षात आल्यावर मी मुलाकडून ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करून घेण्यास आरंभ केला. आता मुलगाही प्रतिदिन नामसत्संगात सहभागी होऊ लागल्यामुळे त्याला होणारा त्रास दूर झाला. माझ्या बहिणीला निद्रानाशाचा त्रास होता. तिने ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू केल्यावर तिला आता शांत झोप लागत आहे.
१ ऊ २. देवावरील श्रद्धा वाढल्याने सकारात्मकता आणि आनंद यांत वाढ होणे : साधना सत्संगात सहभागी होण्यापूर्वी मला छोट्या छोट्या गोष्टींचाही ताण येत असे; मात्र आता ‘देव समवेत असल्यामुळे सर्व चांगलेच होणार’, ही श्रद्धा वाढली आहे. आता माझ्या मनावर कोणत्याही गोष्टीचा ताण नाही. माझ्यातील सकारात्मकता आणि आनंद यांत वाढ झाली आहे.’
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/639887.html
(सर्व सूत्रांचा दिनांक : ७.९.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |