अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रायगड जिल्ह्यातील महड येथील वरदविनायक मंदिरात गेल्यावर जाणवलेले सूत्र आणि आलेली अनुभूती
२८.१०.२०२२ या दिवशी आम्ही चौघे जण (मी, सद्गुरु स्वाती खाडये, सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार आणि त्यांचे पती श्री. अतुल पवार) रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून ३२ कि.मी. अंतरावर असणार्या आणि अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी जाणवलेले सूत्र आणि आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
१. संत आणि सनातन संस्था यांच्याप्रती भाव असणारे श्री. गौरव पोशेगुरुजी यांनी मंदिराचा परिसर दाखवून तेथील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे सांगणे
आम्ही मंदिरात गेल्यापासून तेथून निघेपर्यंत मंदिरातील श्री. गौरव पोशेगुरुजी आमच्या समवेत होते. आम्ही मंदिरात बसून १० – १५ मिनिटे नामजप केला. तेव्हाही ते आमच्या जवळ थांबले होते. आमचा नामजप झाल्यानंतर त्यांनी आम्हा प्रत्येकाच्या हातात गणपतीचा प्रसाद म्हणून श्रीफळ (नारळ) दिले. नंतर त्यांनी आम्हाला मंदिराचा परिसर दाखवला. त्यांनी आम्हाला मंदिराच्या मागील बाजूला असणारे दत्तमंदिर दाखवले आणि तेथील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे सांगितली. तेव्हा त्यांच्यातील संत आणि सनातन संस्था यांच्याप्रती असलेला भाव त्यांच्या चेहर्यावर दिसत होता. काही दिवसांपूर्वी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ तेथील गणपतीचे दर्शन घ्यायला आल्या होत्या. त्या वेळी पोशेगुरुजी यांची श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांना (गुरुजींना) आलेल्या अनुभूतीही त्यांनी आम्हाला सांगितल्या.
२. आम्हाला प्रसाद म्हणून मिळालेल्या नारळांतील खोबर्यापासून देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी प्रसाद बनवला होता. त्या प्रसादाकडे पाहून चैतन्य जाणवत होते आणि त्यातून पांढराशुभ्र प्रकाश येत होता.’
– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.११.२०२२)
खोपोली (जिल्हा रायगड) येथील प.पू. गगनगिरी महाराज यांच्या मठात गेल्यावर आलेल्या अनुभूती
१. प.पू. गगनगिरी महाराज यांच्या भक्तांनी ‘प.पू. गगनगिरी महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले एकच आहेत’, असे सांगणे
‘आम्ही चौघेजण (मी, सद्गुरु स्वाती खाडये, सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार आणि श्री. अतुल पवार) खोपोली (जिल्हा रायगड) येथील प.पू. गगनगिरी महाराज यांच्या मठात गेलो होतो. त्या वेळी प.पू. गगनगिरी महाराज यांच्या पालखीजवळ त्यांचे भक्त उभे होते. आम्ही त्यांना नमस्कार केला आणि ‘आम्ही देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातून आलो आहोत’, असे सांगितले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे आणि प.पू. गगनगिरी महाराज यांचे कार्य एकच आहे. प.पू. गगनगिरी महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले एकच आहेत.’’
२. मठाच्या जवळ असलेल्या शिवपिंडीचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती
अ. आम्ही थोडा वेळ मठाच्या बाजूला असणार्या शिवपिंडीजवळ बसून नामजप केला. त्या वेळी ‘आम्ही साक्षात् शिवालयामध्येच बसलो आहोत’, असे मला वाटत होते. तेव्हा मला शांत आणि स्थिर वाटले.
आ. शिवपिंडीवरील अभिषेकपात्रातून शिवपिंडीवर पडणारे पाणी पाहून आम्हाला जाणवले, ‘साक्षात् शिव जागृत झाला आहे आणि त्याच्या नेत्रांतून गंगा वहात आहे.’
इ. खरेतर ‘शिवाच्या जटेतून गंगा वहात असते; पण ‘त्याच्या नेत्रांतून पाणी वहाते’, असे दृश्य भगवंताने आम्हाला दाखवले. कलियुगातील जिवांकडून अपेक्षित अशी साधना होत नाही. ‘साधना करणारे जीव भगवान शिवाच्या समोर आल्यावर शिवाच्या नेत्रांतून पाणी आले’, असे मला वाटले. ‘ही शांतीची अनुभूती आहे’, असे मला जाणवले.
ई. शिवाच्या उजव्या नेत्रातून पाण्याची बारीक धार सतत वहात असल्याचे दिसत होते, म्हणजे ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी साधकांना भगवंताचा अखंड आशीर्वाद आहे’, असे मला जाणवले.
‘आम्हाला या अनुभूती आल्या’, याबद्दल आम्ही शिवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.११.२०२२)
|