साधना केल्यानेच निरंतर आनंदाची प्राप्ती होते ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘अधिवक्ता साधना शिबिरा’ला प्रारंभ !
रामनाथी (गोवा) – आरंभी आपण कार्यकर्ता असतो; परंतु साधना करून साधक आणि नंतर संत पदापर्यंत पोचण्यासाठी साधना करणे आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन करणे महत्त्वाचे आहे. केवळ कार्य केल्याने संतपद गाठता येत नाही. साधना करून चांगला साधक बनण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. लौकिक आणि पारमार्थिक उन्नतीसाठी साधना करणे आवश्यक आहे. साधना केल्यानेच निरंतर आनंदाची प्राप्ती होते. साधना मनुष्यजन्मातच करता येऊ शकते, असे मार्गदर्शन संभाजीनगर येथील पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी केले. या शिबिरात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगाणा येथील अधिवक्ते सहभागी झाले आहेत.
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २५ डिसेंबरपासून ३ दिवसांचे ‘अधिवक्ता साधना शिबिरा’ला प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. शिबिराच्या आरंभी सनातनचे पुरोहित श्री. ईशान जोशी यांनी शंखनाद केला, तसेच पुरोहित श्री. ईशान जोशी आणि श्री. सिद्धेश करंदीकर यांनी श्लोकपठण केले. प्रारंभी संभाजीनगर येथील पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, बेंगळुरू येथील अधिवक्ता अमृतेश एन्.पी. आणि बुलढाणा (महाराष्ट्र) येथील अधिवक्ता उदय आपटे यांनी दीपप्रज्वलन केले.
पू. (अधिवक्ता) कुलकर्णी पुढे म्हणाले, ‘‘सनातनचा आश्रम ही पवित्र भूमी आहे. स्वतःतील स्वभावदोष घालवून अनेक जण संतपदापर्यंत पोचले आहेत. शिबिराचे ३ दिवस आश्रामतील चैतन्य ग्रहण करून साधना करूया.’’