प्रभु श्रीरामचंद्र आणि बिभीषण यांची प्रथम भेट
पौष शुक्ल चतुर्थी या तिथीला प्रभु श्रीरामचंद्र आणि बिभीषण यांची भेट झाली. त्या निमित्ताने…
‘पौष शुक्ल चतुर्थी या दिवशी लंकेचा राजा रावण याचा धाकटा भाऊ बिभीषण आणि प्रभु श्रीरामचंद्र यांची भेट झाली. लंकेला आग लावून मारुति परत गेल्यानंतर रावण ‘पुढे काय करावे ?’, या विचारात असतांना बिभीषणाने सुचवले, ‘‘श्रीराम धर्माने लढत आहेत. तेव्हा युद्धाग्नी पेटण्यापूर्वीच त्याची धर्मपत्नी (सीता) परत करावी’’; पण मदोन्मत्त झालेला रावण, कुंभकर्ण, इंद्रजित यांना हा सल्ला काय म्हणून पसंत पडावा ? शेवटी ‘बंधू, आपण धर्माचा मार्ग सोडून वागत आहात, नीतीचे आणि हिताचे बोलणे तुम्हाला रूचत नाही’, असे सांगून बिभीषण तडक रामाकडे येण्यास निघाला. उत्तम अलंकार घातलेला, गदा, खड्ग आदि आयुधे घेतलेला राक्षस पहाताच वानरसैन्यांत गडबड झाली; परंतु विभीषणाने समजावले, ‘‘वानरांनो, मरणार्याला जसे औषध रुचत नाही, तसेच माझा उपदेश रावणास पचला नाही. आज मी रामचंद्रास शरण आलो आहे.’’ ही वार्ता ऐकून सुग्रीव आदी वानरांचा बिभीषणावर विश्वास बसला नाही; पण प्रभु श्रीरामचंद्रांनी म्हटले, ‘‘सुग्रीवा, शरणागताला अभय द्यावे. त्याचा त्याग करू नकोस, मग तो बिभीषण असो वा रावण असो.’’ त्यानंतर बिभीषण पुढे झाला आणि त्याने श्रीरामाच्या चरणांवर डोके ठेवून ‘आत्मनिवेदन’ केले. त्याने रावणाच्या सामर्थ्याचेही खरे वर्णन केले आणि म्हटले, “लंकेवर आक्रमण करून राक्षसांचा नाश करण्यास मी तुम्हाला जिवापाड साहाय्य करीन.” यानंतर राम-बिभीषण यांनी एकमेकांना आलिंगन दिले. रामाज्ञेवरून लक्ष्मणाने समुद्राचे पाणी आणले. ते घेऊन प्रभु श्रीराम म्हणाले, ‘‘रावणाला इंद्रजितासह ठार करून तुला लंकेच्या राज्यावर बसवीन. हे पहा आताच राज्याभिषेक करतो.’’
तेव्हा सर्व वानरांनी ‘धन्य राजा रामचंद्र’ असे म्हणत प्रभु श्रीरामचंद्राचा जयघोष केला. या राज्याभिषेकानंतर राम, लक्ष्मण, सुग्रीव, बिभीषण, अंगद, हनुमान आदींनी ‘समुद्र कसा ओलांडावा ?’, याचा विचार करत त्या दृष्टीने सिद्धतेस प्रारंभ झाला.’
(साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’, लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)