साधकांनो, गुरुसेवेत आवड-नावड न जपता ‘शूद्र वर्णाच्या सेवा करण्याने जलद आध्यात्मिक उन्नती होते’, हे लक्षात घेऊन सर्व सेवा करण्याची सिद्धता ठेवा !
‘काही साधकांना ‘वक्ता’ म्हणून कार्यक्रमात विषय मांडणे, वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांत बोलणे इत्यादी सेवा करायला आवडतात. संगणकीय सेवा करणार्या काही जणांना स्वच्छता सेवा किंवा स्वयंपाकघराशी संबंधित सेवा कनिष्ठ वाटतात. त्यामुळे शूद्र वर्णाच्या या सेवा करायला ते टाळाटाळ करतात.
समर्थ रामदासस्वामींचे परम शिष्य कल्याणस्वामी यांनी शूद्र वर्णाच्या सेवा, म्हणजे गुरूंसाठी पाणी भरणे, त्यांचे पाय चेपणे आदी सेवा भावपूर्ण रीतीने करून समर्थ रामदासस्वामींची कृपा संपादन केली होती.
प.पू. डॉक्टरांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमातील स्वच्छता करणे, परिसर स्वच्छ करणे आदी शूद्र वर्णाच्या सेवाही मनापासून केल्या आणि आपल्या गुरूंचे मन जिंकले.
गुरुचरणी अर्पण केलेल्या प्रत्येक सेवेतून साधकाच्या सर्व देहांची शुद्धी होते. शूद्र वर्णाच्या सेवांमुळे अहं लवकर न्यून होण्यास साहाय्य होते. सेवेत आवड-नावड जपण्याविषयी साधकांच्या मनात वारंवार विचार येत असतील, तर त्यांनी उत्तरदायी साधकांशी बोलून यावर स्वयंसूचना द्याव्यात आणि कृतीच्या स्तरावरही पालट करावा !
साधकांनो, ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने आपल्या गुरूंच्या आश्रमातील शूद्र वर्णाच्या सेवाही आनंदाने करणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि श्री गुरूंनी आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेली कोणतीही संधी दवडू नका !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.११.२०२२)