टाचेच्या ‘हाडाची घनता मोजण्याची चाचणी (बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट)’ निदानाच्या दृष्टीने उपयोगाची नसणे
१. टाचेच्या ‘हाडाची घनता मोजण्याची चाचणी (बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट)’ आणि तिचे निष्कर्ष
‘गेल्या मासात सनातनच्या एका आश्रमामध्ये एका शिबिराच्या अंतर्गत हाडांची घनता मोजण्याची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये रुग्णाला एका यंत्रामध्ये आपला पाय ठेवायचा असतो. यंत्रामध्ये पाय ठेवल्यावर हे यंत्र विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने टाचेच्या हाडाची घनता मोजते. यातून अंकांमध्ये जो निष्कर्ष येतो, त्याला ‘टी-स्कोर’ असे म्हणतात. ‘टी-स्कोर’ उणे (मायनस) एकपर्यंत असेल, तर घनता सर्वसाधारण (नॉर्मल) समजली जाते. ‘टी-स्कोर’ उणे १.१ ते उणे २.५ असेल, तर ‘हाडे दुर्बल झाली आहेत’, असा निष्कर्ष काढला जातो. याला ‘ऑस्टिओपीनिया’ म्हणतात. ‘टी-स्कोर’ उणे २.६ आणि त्याच्या पुढे असेल, तर हाडे ठिसूळ झाली आहेत’, असा निष्कर्ष काढला जातो. याला ‘ऑस्टिओपोरोसिस’ म्हणतात.
२. चाचणीत अनपेक्षित निष्कर्ष आल्याचा अनुभव येणे
जेव्हा या शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या रुग्णांचे ‘टी-स्कोर’ पाहिले, तेव्हा असे आढळले की, ज्या रुग्णांची हाडे ठिसूळ असल्याचे निश्चित होते, त्यांपैकी काहींचा ‘टी-स्कोर’ चांगला (नॉर्मल) होता आणि जे रुग्ण धडधाकट होते, त्यांपैकी काहींचा ‘टी-स्कोर’ ‘ऑस्टिओपीनिया’ या गटात मोडणारा होता. असे अनपेक्षित निष्कर्ष आल्याने आधुनिक वैद्यकशास्त्रातील अस्थीरोग तज्ञांना यासंदर्भात विचारल्यावर त्यांनी पुढील सूत्र सांगितले.
३. आधुनिक वैद्यकशास्त्रातील अस्थीरोग तज्ञांनी दिलेली माहिती
टाचेच्या हाडाची घनता मोजून जे ‘टी-स्कोर’ काढले जातात, त्यांमध्ये निष्कर्ष चुकीचे असण्याचे प्रमाण जास्त असते. त्यांतील कोणते योग्य आणि अयोग्य हे समजणे कठीण असते. त्यामुळे त्यांचा निदानाच्या दृष्टीने उपयोग होत नाही. हाडांची घनता मोजण्यासाठी क्ष-किरणांच्या साहाय्याने ‘डेक्सा स्कॅन’ (Dual-energy X-ray Absorptiometry) नावाची चाचणी केली जाते. त्यामध्ये निश्चित घनता समजते; परंतु ही चाचणी वैद्यकशास्त्रातील तज्ञांनी सांगितली, तरच करायची असते.
४. हाडांची घनता मोजण्याच्या चाचणीवर विसंबून रहाण्यापेक्षा सर्वांनीच प्रतिदिन अंगावर ऊन घेणे आणि व्यायाम करणे आवश्यक
यावरून ‘समाजामध्ये टाचेच्या ‘हाडाची घनता मोजण्याची शिबिरे (बोन मिनरल डेन्सिटी कॅम्प)’ आयोजित केली जातात, ती रुग्णाच्या दृष्टीने काही उपयोगाची नसतात’, असे लक्षात आले. त्यामुळे ज्यांची ही चाचणी झाली असेल आणि ज्यांचा ‘टी-स्कोर’ उणे १.१ पेक्षा न्यून असेल, त्यांनी ‘माझी हाडे दुर्बल किंवा ठिसूळ झाली असतील’, अशी भीती मनात बाळगू नये. त्याऐवजी हाडांचे आरोग्य चांगले रहावे आणि हाडे ठिसूळ होऊ नयेत, यासाठी प्रत्येकाने दिवसभरातून न्यूनतम १५ मिनिटे अंगावर ऊन घ्यावे, तसेच नियमित व्यायाम करावा.’
– आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०२२)