धर्मांतर रोखण्याचा एक मूलभूत उपाय : धर्मशिक्षण !
आजच्या घडीलाही शैक्षणिक संस्था, चर्च, रुग्णालये, अन्य सेवाभावी संस्था यांच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात छुपे धर्मांतर चालू आहे. जसे ते डोंगराळ आदिवासी भागांत आहे, तसे ते महानगरांतही आहे. जसे अगदी गरीब लोकांमध्ये आहे, तसेच एका अर्थाने आंग्लाळलेल्या अतीश्रीमंतांमध्येही ते वैचारिकदृष्ट्या झाले आहे. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र हे आहे की, धर्मांतर बलपूर्वक असो, फसवून केलेले असो अथवा अन्य धर्माच्या प्रथांचे आचरण असो (उदा. वाढदिवस साजरा करणे), एखाद्यात प्रखर धर्माभिमान असेल, तर त्याच्याकडून ते होण्याची शक्यता उणावते. ‘प्राण गेला तरी बेहत्तर; पण अखेरच्या श्वासापर्यंत मी धर्म सोडणार नाही’ एवढा धर्माभिमान हा धर्मशिक्षणाने आणि ते आचरणात आणून निर्माण झालेल्या आत्मबळानेच निर्माण होऊ शकतो.
१८ डिसेंबर २०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘धर्मशिक्षणाने धर्माचे महत्त्व लक्षात येणे आणि धर्माभिमान निर्माण होणे, धर्मशिक्षणाच्या संदर्भात आजची स्थिती अन् धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदूंमध्ये धर्माभिमान नसणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया. (उत्तरार्ध)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/637096.html
५. स्वातंत्र्यानंतर पहिले ६ केंद्रीय शिक्षणमंत्री हे इस्लामपंथीय ठेवून हिंदूंना धर्मशिक्षण न देणारे नेहरू आणि काँग्रेस !
स्वातंत्र्यानंतर खरेतर हिंदूंना त्यांचा धर्म आणि इतिहास यांविषयी अभिमान निर्माण होईल, असे राष्ट्र-धर्म शिक्षण देणारी गुरुकुलसारखी शिक्षणप्रणाली अस्तित्वात येणे अपेक्षित होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पक्के हिंदुद्वेष्टे असल्याने स्वातंत्र्यानंतर पहिले ६ केंद्रीय शिक्षणमंत्री हे इस्लामपंथीय ठेवले गेले. त्यामुळे काँग्रेस सरकारने हिंदूंना त्यांचे धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था कधी निर्माण करण्याचा साधा विचारही केला नाही. परिणामी हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण कधी मिळाले नाही आणि नंतरच्या ५-६ पिढ्यांना त्यांचा धर्म किती महान आहे ? हे समजण्याची संधीच उपलब्ध झाली नाही. स्वातंत्र्यानंतरच्या शालेय शिक्षणात केवळ ‘नेहरूंचे गुलाबाचे फूल’ आणि ‘गांधींची अहिंसा’ एवढेच काय ते मुलांच्या मनावर बिंबवले गेले.
५ अ. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नसणे; मात्र त्यांना धर्मच्युत होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होणे !
काँग्रेस सरकारने हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण केली नाही; मात्र दुसरीकडे इस्लाम पंथियांना त्यांच्या धर्मशिक्षणास अनुमती, चर्च आणि ख्रिस्ती धर्म यांच्या प्रसारास विदेशातून मोठे साहाय्य घेण्यास अनुमती, अशा गोष्टी बिनदिक्कतपणे चालू ठेवल्या. ‘हिंदूंचा धर्माभिमान त्यांच्या संस्कृतीस हीन लेखून तोडायचा आणि दुसरीकडे अन्य पंथियांचे महत्त्व वाढवायचे’, असे वातावरण निर्माण करण्यास काँग्रेसची शिक्षणविषयक आणि अन्य पंथियांच्या तुष्टीकरणाची धोरणे पोषक ठरली.
६. धर्मांतर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना प्रारंभ !
गेल्या ३० वर्षांमध्ये हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत आहे, हे प्रकर्षाने लक्षात येऊ लागले. तेव्हा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या परीने ते रोखण्यासाठी प्रयत्न चालू केले. ख्रिस्ती प्रामुख्याने आमिषे दाखवून धर्मांतर करत असल्यामुळे त्यांनीही हिंदूंच्या घराघरांत जाऊन संघभाव वाढवण्यास आरंभ केला. पूर्वाेत्तर भारतात गेली ४० हून अधिक वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटना धर्मांतर बंदीसाठी काम करत आहेत. त्याचा निश्चितच लाभ झाला असला, तरी अजूनही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्वत्र धर्मांतर किंवा त्याच्याशी संबंधित काही ना काही प्रकार प्रतिदिन उजेडात येत असतात.
७. धर्मांतर रोखण्याचे उपाय !
धर्मांतर करणार्यांना रोखण्यासाठी पैसेवाटप किंवा अन्य कितीही वेगवेगळे उपाय केले, तरी त्याला मर्यादा येऊ शकतात; परंतु धर्मांतर करण्यासाठी आलेल्यांना हिंदूंनी स्वतःहूनच विरोध केला, तर धर्मांतर करणारा पुढे त्याला फसवू किंवा भुलवू शकणार नाही. ‘आमिषे दाखवून उपयोग नाही’, हे धर्मांतर करू पहाणार्याच्या लक्षात येईल. ख्रिस्त्यांच्या आमिषांना न भुलण्याचे आत्मिक बळ हिंदूंना धर्माचरणातूनच (साधनेतून) मिळू शकते. धर्माचरणाने मनुष्याच्या आसक्ती न्यून होतात आणि नीतीमत्तेच्या संकल्पनांवर दृढनिश्चयी रहाण्याचे बळ त्याला प्राप्त झालेले असते. साधनेने प्राप्त झालेले संरक्षककवचाचे बळ बलपूर्वक धर्मांतरापासूनही त्याचे रक्षण करू शकते.
८. धर्मशिक्षण नसल्याने होत असलेली धर्मांतरे आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व !
काही उदाहरणांद्वारे धर्मशिक्षण नसल्याने होत असलेली धर्मांतरे लक्षात घेऊया. उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे सिंधी समाजातील ५ सहस्रांहून अधिक जणांचे धर्मांतर करण्यात आले. त्यामागे ‘विस्थापित झालेल्या या समाजाला स्थिरता नसल्याने धर्मसंस्कारांचा पाया नसणे’, हे धर्मांतराचे एक कारण प्रकर्षाने लक्षात येते. दळणवळणाच्या साधनांअभावी देशापासून लांब वाटणार्या पूर्वाेत्तर भारतातील ७ राज्ये ख्रिस्तीबहुल होण्यामागे प्रखर राष्ट्र-धर्म जाणिवांचा अभाव आहे. देशातील सर्व राज्यांतील आदिवासींच्या असाहाय्यतेचा आणि भोळेपणाचा लाभ ख्रिस्त्यांनी घेऊन त्यांचे धर्मांतर केले. यामागेही आदिवासींच्या धर्मज्ञानाचा अभाव हे कारण आहे. गोव्यासारख्या राज्यात जनता धार्मिक अधिक असली, तरीही ख्रिस्त्यांच्या क्रौर्यामुळे धर्मांतर झाले होते. केरळमध्ये उच्चशिक्षित असूनही धर्माचा प्रभाव तुलनेत न्यून असल्याने अधिक धर्मांतर झाले. कन्याकुमारीसारख्या ठिकाणी धर्माचे प्रायोगिक आचरण करण्यास जनता न्यून पडल्याने धर्मांतर वाढले आहे. महाराष्ट्रात अतिशय भाविक म्हणून ओळखला जाणारा आणि धर्माची मूलभूत तत्त्वे अंगी मुरलेला वारकरी समाज आहे. ‘कुणा वारकर्याचे धर्मांतर झाले’, असे कधी ऐकिवात येत नाही. यावरून धर्मशिक्षणाचे महत्त्व लक्षात येते. ‘भारतात ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या लक्षावधी मुली या त्यांच्यात धर्माभिमान नसल्यामुळे बळी पडल्या आहेत’, असे म्हटले, तर चूक ठरणार नाही. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच अन्य पंथियांना हिंदूंना फसवणे शक्य होते. सहज ‘आवडते’ म्हणून चर्चमध्ये जाणारे कित्येक युवक-युवती, नवरूढी (फॅशन) म्हणून गळ्यात ‘क्रॉस’ घालणारी तरुण पिढी, ही तर धर्माभिमानाच्या अभावाची ढळढळीत उदाहरणे आहेत.
९. सरकारचे नवे शैक्षणिक धोरण
गेल्या अनेक दशकांत हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था ना त्यांना घरातून उपलब्ध झाली, ना समाजातून कुठल्या संस्थेने उपलब्ध करून दिली, ना त्यांना शाळेतून ती उपलब्ध झाली. त्यामुळे ‘आता आलेले सरकारचे नवे शैक्षणिक धोरण मुलांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी धर्माभिमान निर्माण करण्यास यशस्वी ठरते का ?’, ते पहावे लागेल. मुसलमानांना धर्मशिक्षणासाठी मदरसे आहेत, ख्रिस्त्यांना कॉन्व्हेंट शाळा आहेत; मात्र हिंदूंनी शाळेत गीता शिकवण्याचा विषय काढला, तर त्यांना लगेच ‘मूलतत्त्ववादी, भगवेकरण करणार’ म्हणून हिणवले जाऊन त्यांच्यावर जोरदार टीका चालू होते. हा सर्व इतकी वर्षे धर्मशिक्षण दिले न गेल्याचा परिणाम आहे.
१०. कॉन्व्हेंट शाळांच्या माध्यमातून होणारे धर्मांतर !
हिंदूंचा आक्षेप असतो की, कॉन्व्हेंट शाळा अप्रत्यक्षरित्या हिंदु विद्यार्थ्यांच्या मनात हिंदु धर्माविषयी अनास्था निर्माण करतात. हे खरे आहेच ! ख्रिस्त्यांचा उद्देश ‘हिंदूंचे धर्मांतर करून स्वत:चा धर्म वाढवणे’ हा आहे, हे उघडच आहे; कारण ‘कॉन्व्हेंट’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘धर्मगुरु, धार्मिक बंधू, धार्मिक बहिणी, भिक्षू किंवा नन्स यांचा समुदाय किंवा समुदायाद्वारे वापरलेली इमारत’, असा आहे. त्यामुळे धर्मप्रसाराच्या उद्देशानेच या शाळांची निर्मिती झाली होती, हे उघड आहे.
१० अ. ‘कॉन्व्हेंट शाळेचा दर्जा चांगला आहे’, असे वाटून पालकांना ‘पाल्यांना त्या शाळांत प्रवेश घ्यावा’, असे वाटणे : काही हिंदूंना वाटते ‘कॉन्व्हेंट शाळेत शिक्षणाचा दर्जा किंवा स्तर अधिक चांगला आहे, यामुळे त्या शाळांत मुलांना घातले पाहिजे.’ येथे हे पहाणे आवश्यक आहे की, नक्की शिकवण्याचा दर्जा चांगला आहे कि केवळ आधुनिक साधनसाहित्य आणि शाळेची तथाकथित शिस्त यांमुळे तसे वाटत आहे. आधुनिक सुविधा आणि शिस्त या बदल्यात मुलांना लहानपणापासून ख्रिस्त्यांची प्रार्थना म्हणण्याची बळजोरी, ख्रिस्त्यांच्या अन्य पद्धती (उदा. केक कापणे, मेणबत्त्या विझवणे, सांताक्लॉज येणे, नाताळ साजरा करणे), हिंदु प्रथा-परंपरांचा तिरस्कार करणे, हिंदूंच्या सणांना सुट्टी नसणे, असे सगळे पदरात पाडून घ्यायचे असेल, तर दोन्हींची तुलना करता ‘कॉन्व्हेंट’ शाळेपेक्षा साधी मराठी माध्यमातील शाळा केव्हाही चांगली !
१० आ. हिंदु पालकांनी कॉन्व्हेंट शाळांचे दुष्परिणाम जाणून घेणे आवश्यक ! : पालकांनी कॉन्व्हेंट शाळांचे भयानक दुष्परिणाम लक्षात घेऊन मुलांना कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश देणे टाळले पाहिजे. कित्येक कॉन्व्हेंट शाळांतून लैंगिक अत्याचाराची प्रकरणे पुढे आली आहेत. काही विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे पाल्यांवर सुसंस्कार होणे, त्यांना योग्य ती संगत मिळणे, या दृष्टीने कॉन्व्हेंट शाळांत घालायचे का ? यावर पालक निर्णय घेऊ शकतात.
१० इ. ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा हेतू हा लपून रहात नसल्याने हिंदु पालकांनी सजग होणे आवश्यक ! : बहुतांश सर्व कॉन्व्हेंट शाळांमध्ये मुलींना मेंदी काढणे, बांगड्या घालणे, कुंकू लावणे, पैंजण घालणे, मुला-मुलींनी गंडा किंवा दोरा बांधणे, मुलांनी टिळा लावणे इत्यादी गोष्टी करण्यास सक्त बंदी आहे आणि चुकून जरी असे कुणी आढळले, तर त्यांना शिक्षाही केली जाते.
इतकेच काय राखी बांधून गेलेल्या विद्यार्थ्यांची राखीही काढली जाते. शिस्तीच्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांना धर्मपालनाला केलेला विरोध हा अत्यंत चुकीचा आहे, हे हिंदु पालक लक्षात घेत नाहीत; कारण त्यांना स्वतःलाच धर्माचरणाचे महत्त्व लक्षात आलेले नसते. त्यामुळे मुलांना ‘धर्माचरणाला विरोध होत आहे’, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
११. ख्रिस्ती संस्थांना विदेशातून पैसा येतो, हे लक्षात घ्या !
अनेक ख्रिस्ती संस्थांना विदेशातून पैसा येतो, तो हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या उद्देशानेच येतो, हे उघड झाले आहे. अशा संस्थांना विदेशातून निधी येण्यामध्ये सरकारने निर्बंधही घातले आहेत. अशाच प्रकारचा निधी ख्रिस्ती शाळांनाही छुप्या धर्मांतरासाठी पुरवला जात असणार, हे उघड आहे.
१२. हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आणि त्यांच्यात स्वधर्माविषयी अभिमान निर्माण होण्यासाठीचे काही उपाय !
अ. मुलांना घरी आणि शाळेत हिंदु धर्मानुसार आचरण करण्याचे शिक्षण देण्याची व्यवस्था करणे
आ. परधर्मीय आणि स्वधर्मीय हिंदु धर्मावर जे आक्षेप घेतात, त्यांचे सहज सोप्या भाषेत खंडण करणार्या पुस्तिकांचे पुष्कळ व्यापक प्रमाणात विनामूल्य वितरण करणे
इ. हिंदु धर्माची तत्त्वे आणि तत्त्वज्ञान यांतील परस्परविरोधी वाटणार्या मतांचा ताळमेळ बसवणार्या पुस्तिका बनवून त्यांचे वितरण करणे
ई. दूरचित्रवाहिन्यांवर हिंदु धर्माचे महत्त्व सांगणार्या माहितीचे प्रसारण करणे (इतर धर्मियांनी हे सातत्याने केले आहे.)
उ. हिंदूंचे सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव यांसारख्या अव्यवहार्य आणि भ्रामक संकल्पनांविषयी प्रबोधन करणे आणि हिंदु अन् अन्य पंथीय यांच्या आचरणातील भेद लक्षात आणून देणे
ऊ. अन्य पंथियांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे : अन्य पंथियांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणून तिच्यात वाढत चाललेल्या असंतुलनावर उपाय शोधणे आवश्यक आहे. लोकसंख्या अल्प करत जाण्याने आयातीवरील व्यय, बेरोजगारीसारख्या अनेक समस्याही सुटतील. केवळ आपल्या धर्माचे गोडवे गायल्याने आणि सनातन धर्म सर्वश्रेष्ठ म्हटल्याने काही होणार नाही. या देशातील अन्य पंथियांची लोकसंख्या वाढत गेली, तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांप्रमाणे इथलेही हिंदू संपवले जातील अन् गोडवे गायला तुम्ही उरणारच नाही.
ए. राज्यघटनेत दुरुस्ती करून देशाला हिंदु राष्ट्र घोषित करून अन्य धर्मियांची लोकसंख्या वाढू न देण्यासाठी कायदे करणे.
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल (१५.११.२०२२)
संपादकीय भूमिकाहिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणारी गुरुकुलासारखी शिक्षणप्रणाली अस्तित्वात येणे अपेक्षित ! |