आपण यंत्रांसाठी कि यंत्र आपल्यासाठी ?
महाराष्ट्रातील जकेकूरवाडी गावामध्ये (जिल्हा धाराशिव) प्रतिदिन सायंकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत भ्रमणभाष (मोबाईल) आणि दूरचित्रवाणीसंच पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय गावचे सरपंच अमर सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गावातील मुलांच्या अभ्यासावर भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी संच यांचा होणारा अयोग्य परिणाम लक्षात घेऊन हा स्तुत्य निर्णय घेण्यात आला. असा प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन; पण सर्वांसाठी उपयुक्त निर्णय घेणार्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
आज विज्ञान, तंत्रज्ञान अतिशय पुढे गेले आहे. यंत्रांच्या माध्यमातून आपले जीवन एका अर्थी सुकर झाले आहे. यामुळे आपला पुष्कळ वेळ वाचत आहे. जगभरातील व्यक्तींशी सहज संपर्क साधता येत आहे. कोणतीही माहिती काही क्षणात आपण मिळवू शकतो, जगभरात घडत असलेल्या घटनांचे आपण घरबसल्या साक्षीदार होतो. आणखीही अनेक लाभ आहेत. असे असले, तरी या भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी संच यांमुळे मात्र घरातील व्यक्तींपासून दुरावलो. भ्रमणभाषच्या अतिरेकी वापरामुळे आपल्याला अमूल्य लाभलेल्या सुंदर शरिराला विविध आजारांनी घेरले. यामध्ये मानदुखी, डोळ्यांचे आजार, मेंदूची विचार करण्याची अल्प होत चाललेली क्षमता, तोंडी बेरीज-वजाबाकी करता न येणे इत्यादी. महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांच्या कोवळ्या शरिरावर याचा गंभीर परिणाम होत आहे. लहान मुलांना मैदानी खेळ, आपल्या भोवताली असलेल्या जगापेक्षा भ्रमणभाषमधील काल्पनिक जग खरे वाटू लागत आहे आणि यातूनच मानसिक समस्यांना निमंत्रण दिले जात आहे, तसेच शांत झोप न लागण्यापासून ते अपुर्या झोपेमुळे वाढणार्या अन्य शारीरिक समस्या जडल्या आहेत. ही स्थिती अजून ढासळू नये, असे वाटत असेल, तर ‘आपल्या सोयीसाठी यंत्र असून आपण यंत्रांसाठी नाही’, हा विचार मनावर बिंबवणे आवश्यक आहे.
यंत्र म्हटले की, लाभ आणि हानी आलीच. कोणत्याही गोष्टीचा अतीवापर झाल्यास त्यापासून हानी ही आहेच. तसे मानवनिर्मित यंत्रालाही लाभ आणि हानी आहेच. ईश्वरनिर्मित शरीररूपी यंत्र अमूल्य आहे. भगवंताच्या कृपेने मिळालेले हे शरीर आपल्याला विनामूल्यच मिळाले आहे; परंतु त्याचा योग्य प्रकारे वापर न केल्यास होणारी हानी कधीही भरून न येणारी आहे. त्यामुळे अन्य यंत्रांपेक्षा भगवंताने दिलेले शरीररूपी यंत्राचे महत्त्व जाणून त्याचा सांभाळ योग्य पद्धतीनेच करायला हवा.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी