कलियुगात पृथ्वीवर सात्त्विकतेकडून तामसिकतेकडे झालेला संगीताचा प्रवास आणि त्यामुळे होत असलेला संगीतकलेचा र्हास !
१. ‘भजने आणि संतांचे अभंग यांतून देवाचे गुणगान केले गेल्याने मनात भक्तीभाव निर्माण होत असणे
‘पृथ्वीवर जसजसे रज-तम वाढत गेले, तसतसे ते रज-तम मानवाच्या देहात संक्रमित झाले. याचा परिणाम मानवावर लगेच झाल्याचे दिसले नाही; पण पुढच्या पिढ्यांतून त्यांचे परिणाम होतांना दिसू लागले. या रज-तमाचा संगीत कलेवरही पुष्कळ मोठा परिणाम झाला.
मी लहान असतांना, म्हणजे वर्ष १९८५ मध्ये ठिकठिकाणी मंदिरे आणि काही समारंभ या ठिकाणी भजने गायली जायची. या भजनांतून देवाचे गुणगान केले जायचे. त्यामुळे ‘संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आदी संत कसे होते ?’, हे सर्वांना समजायचे. संतांविषयी ऐकल्यामुळे ‘आपणही त्यांच्याप्रमाणे वागायला हवे’, असे विचार आपोआप सर्वांच्या मनात निर्माण व्हायचे.
२. सात्त्विक भक्तीगीतांकडून तामसिक चित्रपटगीते ऐकण्याकडे झालेला प्रवास
देवाचे अभंग, भक्तीगीते रचतांना त्यात देवाची स्तुती केलेली असते. ही गाणी मुळातच सात्त्विक होती, उदा. ‘सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ।।’ हा अभंग ऐकल्यावर श्री विठोबाचे स्मरण होते. कालांतराने भक्तीगीते ऐकणे न्यून झाले. वर्ष १९९० पासून कार्यक्रमात, तसेच अन्य ठिकाणी भाव आणि भक्ती गीते न लावता चित्रपटाची गाणी लावली जाऊ लागली.
३. तामसिक गाणी ऐकल्यास मन अशांत आणि बहिर्मुख होणे अन् भजने किंवा भक्तीगीते ऐकल्याने मनाला शांती मिळणे
वर्ष १९९० ते आताच्या काळातील काही गाणी ऐकली की, ‘संगीतावर अनिष्ट शक्तींनी आक्रमण केले आहे’, असे वाटते. याचे कारण म्हणजे ही गाणी ऐकल्यावर माणसाचे मन बहिर्मुख होते. खरेतर ‘संगीत’ हे मानवाच्या मनाला शांती देणारे एक साधन आहे. व्यक्तीने तामसिक गाणी ऐकली, तर तिचे मन अस्वस्थ होऊन तिला काही सुचेनासे होते. त्या वेळी व्यक्तीला ‘आपले मन शांत झाले आहे’, असे वाटत असले, तरी ते शांत होण्याऐवजी बहिर्मुख आणि अशांत झालेले असते. भजने किंवा भक्तीगीते ऐकली, तरच व्यक्तीची अस्वस्थता दूर होऊन तिच्या मनाला खरी शांती मिळू शकते !’
– कु. कल्याणी गांगण (वर्ष २०२२ ची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०२०)
• इथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |