आपले स्वास्थ्य आणि मन:शांती उत्तम ठेवण्यासाठी सप्तधेनू परिक्रमा ! – साध्वी प्रतिभा पावनेश्वरी
‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’चा तृतीय दिवस !
भोसरी (पुणे) – येथील ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’च्या तृतीय दिवशीही ‘सुरभी महायज्ञ’ सकाळपासून चालू होता, तसेच ‘सप्तधेनू परिक्रमा आणि त्याचे लाभ’ याविषयीची माहिती साध्वी प्रतिभा पावनेश्वरी यांनी दिली. आपले स्वास्थ्य, मन:शांती उत्तम ठेवण्यासाठी याचा लाभ होऊ शकतो. पंचगव्य चिकित्सक अशोक मोरे यांनी पंचगव्य चिकित्सेविषयी मार्गदर्शन केले. पंचगव्याविषयी अधिक प्रसार आणि जागृती होण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी माजी नगरसेविका अनुराधा गोफणे आणि देविदास गोफणे यांनीही या महोत्सवास सहकार्य केले. भाजपच्या कोथरूड महिला मोर्चाच्या सरचिटणीस सुरेखा जगताप, चिटणीस अमरजा पटवर्धन, तसेच अनेक जिज्ञासू यांनी महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रदर्शनास भेटी दिल्या.
सप्तधेनू परिक्रमा
सर्वसामान्य व्यक्तीमध्ये ३० टक्के ऊर्जा असते. या वेळी सप्तधेनू परिक्रमा करण्यापूर्वी आणि नंतरची सकारात्मक ऊर्जा यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे पडताळण्यात आली. परिक्रमेनंतर व्यक्तीमधील सकारात्मक ऊर्जा ७० ते ९५ टक्के इतकी वाढलेली दिसली.
यज्ञामुळे वायूमंडल शुद्ध होते ! – ज्योती मुंडर्गी, आयुर्वेदाचार्य
आयुर्वेदाचार्य ज्योती मुंडर्गी यांनी सांगितले की, यज्ञ संस्कृती ही पुरातन संस्कृती आहे. यज्ञामुळे वायूमंडल शुद्ध होते. यज्ञामुळे विकार, व्याधी बर्या होतात. त्यामध्ये देशी गायीचे तूप हवनासाठी वापरले जाते. त्यामुळे गोहत्या थांबवून देशी गायींचे रक्षण होणे आवश्यक आहे. गायींचे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्वही आहे. भाकड गायींचाही उपयोग होऊ शकतो. देशी गायींच्या सानिध्यात, तसेच गोमुत्राचा वापर करून कर्करोगासारख्या व्याधींवरही उपचार होऊ शकतात. मानसिक स्वास्थ्य सुधारते. या वेळी त्यांनी सनातनच्या ग्रंथांचे कौतुक करतांना सनातनचे ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण असतात, असे सांगितले.