आमदार मुक्ता टिळक यांना विधानसभेत श्रद्धांजली !
नागपूर, २३ डिसेंबर (वार्ता.) – पुणे येथील कसबापेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना दु:खद निधनाविषयी २३ डिसेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव सादर केला. त्यानंतर सभागृहातील सर्व सदस्यांनी उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
(सौजन्य : TV9 Marathi)
या वेळी मनोगत व्यक्त करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘श्रीमती मुक्ता टिळक या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या. गणेशोत्सवाच्या वेळी त्यांच्या घरी गेलो असतांना आजारी असूनही त्या स्थितीतही त्यांनी जनतेच्या हितासाठी त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे विनंती केली. प्रकृती ठीक नसतांनाही विधानसभेच्या निवडणुकीच्या विधीमंडळात येऊन त्यांनी मतदान केले. यातून त्यांची पक्षनिष्ठा दिसून येते.’’ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘मुक्ता टिळक यांच्यासारख्या निष्ठावान, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे केवळ भाजपचीच नव्हे, तर समाजाचीही हानी झाली आहे’, असे मनोगत व्यक्त केले. यानंतर शोकप्रस्ताव सादर करून सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.