विदर्भातील शेती आणि फळपीक यांसाठी ३ सहस्र १०३ कोटी रुपयांची हानीभरपाई वितरित !
विधान परिषद लक्षवेधी…
विदर्भातील अतीवृष्टीग्रस्त शेतकर्यांना ७५० कोटींचे साहाय्य !
नागपूर, २३ डिसेंबर (वार्ता.) – विदर्भातील सतत पडणार्या पावसामुळे बाधित शेतकर्यांना राज्यशासनाने प्रथमच ७५० कोटी रुपयांचे साहाय्य दिले आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली. विदर्भातील अतीवृष्टीबाधित संत्रा उत्पादक शेतकर्यांना हानीभरपाई देण्याविषयी सदस्य अमोल मिटकरी यांनी ही लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, अनिकेत तटकरे, डॉ. रणजित पाटील आणि प्रवीण लटके यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.
Winter Session 2022 | विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५० कोटींची मदत – उदय सामंत #AGRICULTURENEWS #FARMERS #MAHARASHTRA #UDAYSAMANT #VIDARBHAFARMERS #उदयसामंत #महाराष्ट्र #विदर्भशेतकरी #शेतकरी #शेतीबातम्या https://t.co/mJKY20ts1Hhttps://t.co/mJKY20ts1H
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 22, 2022
मंत्री सामंत म्हणाले की, अमरावती विभागात संत्री फळपिकाची ‘कोळशी’ या रोगामुळे हानी झाली आहे. तथापि नागपूर जिल्ह्यात संत्री पिकावर २ सहस्र ८८२ हेक्टर आणि मोसंबी पिकावर २७० हेक्टर क्षेत्र अशा एकूण ३ सहस्र १५२ हेक्टर क्षेत्रावर ‘कोळशी’ रोगाचा संसर्ग आढळला आहे. हा संसर्ग हानी पातळीच्या खाली आहे. ‘हॉर्टसॅप’ योजनेंतर्गत कीड सर्वेक्षण आणि कीड नियंत्रक यांच्याद्वारे सर्वेक्षण आणि जनजागृती केली. या सर्वेक्षणामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील. विदर्भातील शेती आणि फळपिक यांच्या बाधित क्षेत्रासाठी ३ सहस्र १०३ कोटी रुपयांची हानीभरपाई राज्यशासनाकडून वितरित करण्यात आली आहे.
पीक विम्याविषयी उपप्रश्नाला उत्तर देतांना मंत्री सामंत म्हणाले की, अमरावती येथे एकूण शेतकर्यांची संख्या ९ सहस्र २७६ असून क्षेत्र ९ सहस्र २५७ हेक्टर आहे. देय रक्कम ही १ सहस्र ८६१.३४ लाख रुपये आहे. त्यापैकी ४ सहस्र ६९७ शेतकर्यांना १ सहस्र ८५१.३१ कोटी रुपये पीक विम्याचा लाभ मिळाला आहे.