राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी राज्यशासन सकारात्मक ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र शासन
|
नागपूर, २३ डिसेंबर (वार्ता.) – धर्मांतरासाठी ख्रिस्ती मिशनर्यांना साहाय्य करणारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची पदावरून नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे. या प्रकरणी कडक धोरण अवलंबून या अधिकार्यांच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांद्वारे विभागीय चौकशीचा आदेश, तसेच त्यांच्या संपत्तीचीही भ्रष्टाचारविरोधी पथकाद्वारे चौकशी करण्याचा आदेश मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचेही या वेळी मंत्री देसाई यांनी सांगितले.
‘नगर जिल्ह्यातील राहुरी येथील श्रीमती मीरबाई हरेल या हिंदु महिलेच्या धर्मांतरासाठी ख्रिस्ती मिशनर्यांना पाठबळ दिल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची पदावरून उचलबांगडी करावी’, अशी मागणी भाजपचे आमदार राम सातपुते यांनी २३ डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर केली. भाजपचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी यापूर्वीही असलेल्या ठिकाणी धर्मांतरासाठी साहाय्य केल्याचा आरोप केला. यापूर्वी ते ज्या पदांवर होते, तेथेही त्यांनी असे प्रकार करून अवैध संपत्ती गोळा केली असल्याचा आरोप करत त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी श्री. गायकवाड यांनी केली. चौकशीत दोषी आढळल्यास दराडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
नगर येथे ठिकठिकाणी अनधिकृत चर्चची उभारणी ! – आमदार राम सातपुते
फासणाऱ्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या #PI दराडे ला तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात धर्मांतर विरोध कायदा आणणार का, असे प्रश्न उपस्थित केले. यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी त्या अधिकारी दराडे यांच्यावर 15 दिवसांत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, pic.twitter.com/zMTiU1pzP9
— Ram Satpute (@RamVSatpute) December 23, 2022
नगर येथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती पाण्यात बुडवून ख्रिस्ती मिशनरी हिंदूंच्या श्रद्धेचे भंजन करण्याचे काम करतात. या भागात धर्मांतराला पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहाय्य करत आहेत. ख्रिस्ती प्रचारकांना संरक्षण देऊन त्यांनी धर्मांतराची सुपारी घेतली आहे. नगर जिल्ह्यात मातंग समाज, बौद्ध, चांभार समाज यांचा अंत्यविधी होण्याच्या ठिकाणी अनधिकृतरित्या क्रॉस लावण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या चर्च उभारण्यात आले आहेत. यांविषयी पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्यास पैसे घेऊन ही प्रकरणे मिटवली जातात. प्रताप दराडे हे यापूर्वी ज्या ठिकाणी होते, तेथेही धर्मांतर करण्यासाठी साहाय्य करत होते.
धर्मांतर करणार्यांची माहिती पोलीस पाटलांनी वरिष्ठांना कळवावी ! – आमदार हरिभाऊ बागडे, भाजप
नगर येथे मातंग समाजाच्या गरिबीचा अपलाभ घेऊन त्यांना पैसे, धान्य यांचे आमीष दाखवून ख्रिस्ती मिशनरींकडून धर्मांतर केले जाते. अशा प्रकारे धर्मांतर करणार्यांची सूची सिद्ध करण्यात यावी, तसेच याविषयी संबंधित गावांतील पोलीस पाटलांनी याविषयीची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना कळवावी.
कारवाईसाठी कायद्यात सुधारणा आवश्यक ! – आमदार संजय केळकर, भाजप
ग्रामीण किंवा आदिवासी भागातच नव्हे, तर शहरी भागातही दुर्बल आणि गरीब वस्ती असलेल्या ठिकाणी धर्मांतराचे प्रकार दिवसाढवळ्या चालू आहेत. हे प्रकार आढळूनही कारवाईसाठी कायद्याच्या चौकटीत बसत नसल्यामुळे पोलीस कारवाई करण्यास कचरतात. याचा अनुभव मीही घेतला आहे. त्यामुळे कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.
गावपातळीवरील धर्मांतराचे प्रकार वरिष्ठांना कळवण्यासाठी पोलीस पाटलांना सूचना देणार ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र शासन
पंजाब राज्यातून आलेल्या कमल सिंह याने धर्मांतर करण्यासाठी मीराबाई हरेल यांच्यावर दबाव आणला. या प्रकरणी कमल सिंह यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र ५ मास झाले, तरी आरोपी सापडलेला नाही. त्याने अटकपूर्व जामीन मिळवला आहे. या प्रकरणात तक्रार झाल्यावर त्वरित कारवाई करणे आवश्यक होते. यामध्ये पोलिसांकडून दिरंगाई आणि हलगर्जीपणा झाल्याचे आढळून येत आहे.
धर्मांतर रोखण्यासाठी गावपातळीवर बीट अंमलदारांना सतर्क करू. अशा घटना होत असतील, तर त्याविषयी वरिष्ठांना कळवण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात येईल.
धर्मांतरविरोधी कायद्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती
राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यभर ठिकठिकाणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने आंदोलने करण्यात आली. २१ डिसेंबर या दिवशी नागपूर येथे यासाठी भव्य मोर्चाही काढण्यात आला. या वेळी उपस्थित आमदारांनी धर्मांतरविरोधी कायदा यावा, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. समितीच्या वतीने आमदार श्री. राम सातपुते यांसह अन्यही हिंदुत्वनिष्ठ आमदारांची भेट घेऊन त्यांना ‘धर्मांतराचे डावपेच’ आणि ‘लव्ह जिहाद’ हे हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ग्रंथ भेट देऊन याविषयी निवेदनही दिले होते. धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधी कायद्यांसाठी सभागृहात आवाज उठवण्याची विनंतीही समितीच्या वतीने या आमदारांना करण्यात आली होती. यासह समितीच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही धर्मांतरविरोधी कायदा करण्यात यावा, यासाठी निवेदन देण्यात आले आहे. ज्या लोकप्रतिनीधींनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला, तसेच त्यासाठी साहाय्य केले, त्या सर्वांचे समितीच्या वतीने आम्ही आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया श्री. सुनील घनवट यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.
Link : दैनिक सनातन प्रभात
धर्मांतरबंदी कायदा हवाच !https://sanatanprabhat.org/marathi/603546.html धर्मांतरबंदी कायदा करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार – शिवसेना आणि भाजप या पक्षांतील आमदारांचे आश्वासनhttps://www.hindujagruti.org/marathi/news/86518.html
|
विशेष प्रतिनिधी : श्री. अरविंद पानसरे, नागपूर