जानेवारी २०२३ मध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता; मात्र ३ मासांपर्यंतच प्रभाव राहील !
‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांचे भाकित
पुणे – ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीवरून जानेवारी २०२३ मध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता ‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे; मात्र ३ मासांपर्यंतच याचा प्रभाव राहील, असे त्यांनी सांगितले आहे. पूर्ण वर्षाचे पंचांग हे वर्षभरापूर्वीच प्रसिद्ध केले जाते.
ज्योतिषी मारटकर यांनी या भाकितांमध्ये म्हटले आहे की,
१. षष्ठातील राहू / हर्षलमुळे या काळात विचित्र आजार किंवा संसर्ग पसरण्याची शक्यता राहील.
२. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता अष्टमातील पौर्णिमेमुळे भूकंप / वादळे / अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमधून मोठी हानी होण्याची शक्यता वाटते.
३. केंद्रस्थानी मंगळ असल्यामुळे या काळात हवेतील उष्णतेमध्ये मोठी वाढ होईल, तसेच अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
४. सप्तमातील मंगळ परराष्ट्राशी संबंध बिघडवणारा असून सीमेवर युद्धजन्य स्थिती दर्शवतो. परदेशाशी होणारे करार अडचणीत येतील.
५. राजकीय व्यक्ती किंवा धार्मिक/सामाजिक क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो.
संपादकीय भूमिकाचीनमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकी शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ञ एरिक फेगल-डिंग यांनी चेतावणी दिली आहे की, पुढील ९० दिवसांत चीनच्या ६० टक्के लोकसंख्येला आणि जगातील १० टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होईल. यात जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू होण्याचीही शक्यता आहे. सिद्धेश्वर मारटकर यांनी यापूर्वीही अचूक भाकिते केलेली आहेत. भारतीय पंचांग हे भविष्याचे अचूक वेध घेणारे शास्त्र आहे. यावरून ज्योतिषशास्त्राची महानता लक्षात येते. |