हिंदूंचे रक्षण करणारे स्वामी श्रद्धानंद !
२३ डिसेंबर २०२२ या दिवशी स्वामी श्रद्धानंद यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन !
‘२३ डिसेंबर १९२६ या दिवशी (मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी या तिथीला) सुप्रसिद्ध ‘गुरुकुल विश्वविद्यालया’चे संस्थापक आणि हिंदु समाजाच्या उपेक्षित भागाकडे लक्ष वेधणारे थोर व्यक्तीमत्त्व स्वामी श्रद्धानंद यांची अमानुषपणे हत्या झाली.
स्वामींचा जन्म २२ फेब्रुवारी १८५६ या दिवशी पंजाबमधील तळवण या गावी झाला. यांचे मूळे नाव मुनशीराम असे होते. प्रथम ते नास्तिक होते; परंतु पुढे दयानंद सरस्वती यांच्या व्याख्यानांचा परिणाम यांच्यावर होऊन हे पक्के आर्यसमाजी बनले. लाहोर येथे वकिली चालू केल्यावर यांनी हिंदूंच्या उपेक्षित भागाकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला. त्यांचे ‘सद्धर्मप्रचारक’ नावाचे साप्ताहिक प्रथम उर्दू लिपीत निघत असे; पण पुढे ते देवनागरी लिपीत निघू लागले. त्यांनी ‘स्त्रीशिक्षणावर’ एक लेखमाला लिहिली आणि जालंधर येथे वर्ष १८९० मध्ये कन्या शाळा चालू केली. ‘विधवा विवाह’ आणि ‘अनाथांचे रक्षण’ या प्रश्नांसंबंधीही त्यांनी लोकांना प्रत्यक्ष कार्याची दिशा दाखवली. पुढे त्यांनी प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाचा पुरस्कार केला आणि त्यासाठी पैसे जमवू लागले. वर्ष १९०२ मध्ये हरिद्वारजवळ गंगा नदीच्या किनार्यावर झोपड्या बांधून यांनी गुरुकुलाच्या कार्यास आरंभही केला.
पुढे या गुरुकुलाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याला विश्वविद्यालयाचे स्वरूप आले. त्यानंतर वर्ष १९१७ मध्ये त्यांनी संन्यास घेतला. ‘रौलट ॲक्ट’विरोधी झालेल्या चळवळीत त्यांनी बरेच कार्य केले. देहलीत पोलिसांनी जमावावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्यास आरंभ केला. तेव्हा स्वामी श्रद्धानंद निधड्या छातीने पुढे झाले आणि त्यांच्यावर निशाणा धरणार्या पोलिसांना म्हणाले, ‘‘मी हा श्रद्धानंद, चालव गोळी.’’ अर्थातच पोलीस नरम पडले. केरळच्या मलबारातील मोपल्यांनी हिंदूंना बाटवण्यास आरंभ केला. त्या वेळी स्वामीजी तेथे धावत गेले आणि त्यांनी अनाथांचे रक्षण केले. शेवटी देहली येथे ते आजारांतून बरे होत असतांना मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी या तिथीच्या दिवशी अब्दुल रशीद नावाच्या एका मुसलमानाने रुग्णशय्येवर पडलेल्या स्वामी श्रद्धानंद यांची गोळी घालून हत्या केली. स्वामी श्रद्धानंद यांच्या हत्येमुळे संपूर्ण हिंदुस्थानला मोठा धक्का बसला.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)