‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती
जळगाव, २२ डिसेंबर (वार्ता.) – सध्या सर्वत्रच्या हिंदूंवर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता शिवतीर्थ, कोर्ट चौक येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी २२ डिसेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री. मोहन तिवारी, योग वेदांत सेवा समितीचे श्री. अनिल चौधरी यांनीही संबोधित केले. सभेत प्रमुख वक्ता म्हणून ‘सुदर्शन वाहिनी’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
हिंदूंमध्ये जागृती करून दबावगट निर्माण करणे आवश्यक ! – अनिल चौधरी, योग वेदांत सेवा समिती, जळगाव
सध्या हिंदु धर्मजागृती करणे अतिशय आवश्यक आहे. हिंदूंमध्ये जागृती करून दबावगट निर्माण करणे आवश्यक आहे. योग वेदांत सेवा समितीचे जिल्ह्यातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने सभेला उपस्थित रहातील.
सभेसाठी १०० हून अधिक गावांमध्ये प्रसार ! – मोहन तिवारी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, हिंदु राष्ट्र सेना
विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या १०० हून अधिक गावांत बैठका घेण्यात आल्या आहेत. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, होर्डिंग, फलकलेखन, रिक्शा, उद्घोषणा, सामाजिक संकेतस्थळे यांद्वारे सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत.
वाहन फेरी !सभेनिमित्त २३ डिसेंबरला सकाळी १० वाजता नेहरू चौक, जळगाव येथून फेरीला प्रारंभ होईल. टॉवर चौक, चित्रा चौक, शिवतीर्थ, जिल्हाधिकारी कार्यालय, रिंगरोड, नूतन मराठा महाविद्यालय या मार्गाने जाऊन शिवतीर्थ मैदान येथे समारोप होईल. |