‘पठाण’ चित्रपट आणि त्याचे प्रदर्शन यांवर बंदी घाला !
समस्त हिंदुत्ववादी संघटनांची तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी !
नंदुरबार, २२ डिसेंबर (वार्ता.) – समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा, अभिनेते शाहरूख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्यात यावा, हा चित्रपट चित्रपटगृहांमधून प्रदर्शित करण्यावरही बंदी घालण्यात यावी, तसेच या चित्रपटाच्या वादावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील तहसीलदार श्री. गिरीश वखारे यांना समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्याने हिंदु धर्म आणि देवता यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘पठाण’ चित्रपटातील एका गाण्यात अभिनेत्रीला भगव्या रंगाच्या तोकड्या पोशाखात दाखवले आहे. यातून हिंदूंसाठी पवित्र अशा भगव्याचा अपमान झाला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोचवण्याचा हा उद्दामपणे केलेला प्रयत्न आहे. तरी प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी सर्वश्री अमन जोहरी, किरण ठाकरे, रोहित सूर्यवंशी, चिंटू जोहरी, किशोर कुंभार, आकाश भोई, मयूर साठे, मयूर ढोले, गोलू भोई, नितीन कुंभार, मयूर सोनवणे, नीरज भोई, तुषार जोहरी, विक्की भोई, कल्पेश जोहरी, गणेश जोहरी, सचिन भोई आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.