भारतीय संस्कृतीची मूलाधार : गोमाता !
पांजरपोळ (पुणे) येथे चालू असलेल्या ‘कामधेनू महोत्सव अर्थात् विश्व गो परिषद २०२२’च्या निमित्ताने…
१. पावित्र्याचा संगम असलेल्या गोमातेला हिंदु संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून अत्यंत पूजनीय स्थान असणे
‘गोमाता प्राचीन काळापासूनच भारतीय धर्म आणि संस्कृती सभ्यतेची मूलाधार आहे. भारतीय संस्कृतीने प्राचीन काळापासूनच गोभक्ती आणि गोपालन यांना आपल्या जीवनातील सर्वाेत्कृष्ट कर्तव्य समजले आहे. वेद-शास्त्र, स्मृति, पुराण आणि इतिहास गोमातेच्या उत्तम महिमांनी ओतप्रोत भरलेले आहेत. स्वतः वेद गायीला नमन करतात.
रूपायाघ्नये ते नमः ।
– अथर्ववेद, काण्ड १०, सूक्त १०, खण्ड १
अर्थ : हे अवध्या गोमाते, तुझ्या स्वरूपाला प्रणाम आहे.
ऋग्वेदात म्हटले आहे की, ज्या ठिकाणी गाय सुखाने निवास करते, तेथील धूळही पवित्र होऊन जाते आणि ते ठिकाण तीर्थक्षेत्र होते. आमच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व संस्कारांमध्ये पंचगव्य आणि पंचामृत यांचे स्थान अनिवार्य असते. गोदान केल्याविना आमचे कोणतेही धार्मिक कृत्य पूर्ण होत नाही. गोमाता तिच्या उत्पत्तीच्या वेळेपासूनच भारतासाठी पूजनीय राहिली आहे. तिचे दर्शन, पूजन, सेवा सुश्रूषा इत्यादी करणे आस्तिक लोक पुण्य समजतात. व्रत, जप, उपवास सर्वांमध्ये गोमाता आणि गायीपासून मिळालेले पदार्थ अतिशय महत्त्वाचे समजले जातात. गायीचे दूध अमृततुल्य असते, जे शरीर आणि मस्तिष्क यांना पुष्ट (चांगले) करते. गोमूत्र गंगाजलासमान पवित्र मानले जाते आणि गायीच्या शेणात तर साक्षात् लक्ष्मी वास करते. शास्त्रांनुसार पंचगव्य (गो-दूध, गो-दही, गोघृत (तूप), गोमूत्र आणि गोमय (शेण) यांचे सेवन केल्यामुळे आपले अंग-प्रत्यंग, मांस, मज्जा, कातडी आणि अस्थी यांमध्ये असलेल्या पापांचा विनाश होतो. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसारही शरीर स्वास्थ्य राखणे अन् रोगनिवारण करणे यांसाठी गायीचे दूध, दही, ताक, लोणी, तूप, मूत्र आणि शेण अत्यंत उपयुक्त आहेत.
गायीच्या शरीरात सर्व देवतांचा वास असतो; म्हणून गाय सर्व देवमयी आहे. प्राचीन काळापासूनच भारतीय संस्कृतीमध्ये गायीवर श्रद्धा ठेवण्यात आली आहे. भगवान श्रीरामाने युवावस्थेत प्रवेश करतांना आपल्या जीवनाचे ध्येय ‘गोब्राह्मणहितार्थाय देशस्याय सुखाय च ।’ (‘वाल्मीकि रामायण’, बालकाण्ड, सर्ग २५, श्लोक ५) म्हणजे ‘गाय आणि ब्राह्मण यांचे हित अन् या देशाचे सुख यांसाठी’ या पवित्र संकल्पाच्या पूर्तीसाठीच घोषित केले होते. गायीच्या प्रतीची भारतीय भावना किती श्रद्धावान आणि कृतज्ञता यांनी ओतप्रोत भरली होती, हे या पुढील श्लोकावरून लक्षात येते.
गावो ममाग्रतो नित्यं गाव: पृष्ठत एव च ।
गावो मे सर्वतश्चैव गवां मध्ये वसाम्यहम् ।।
– महाभारत, पर्व १३, अध्याय ११०, श्लोक ३
अर्थ : गायी नेहमी माझ्या समोर असाव्यात, पाठीमागे असाव्यात. माझ्या सभोवती गायी असाव्यात. मी गायीमध्ये वास करतो.
२. भारताबाहेर गोमातेचे महत्त्व
पुराणात पावलोपावली गोमातेचामहिमा गायला गेला आहे. भारतीय संस्कृतीच नाही, तर संपूर्ण जगात गोमातेचा मोठा सन्मान केला जात होता. जसे आपण गोमातेची पूजा करतो, त्याच प्रकारे पारशी लोक बैलाची पूजा करतात. मिस्र म्हणजे इजिप्त देशातील प्राचीन नाण्यांवर बैलांचा छाप काढलेला असायचा. ख्रिस्ताच्या कितीतरी वर्षांपूर्वी बनलेल्या पिरॅमिडमध्ये बैलांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत.
३. गोमातेपासून मिळणारे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांमध्ये विविध रोग दूर करण्याची क्षमता असणे
भारतीय संस्कृती यज्ञप्रधान आहे. वेद, रामायण, महाभारत इत्यादी धार्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथ यांमध्ये यज्ञाला सर्वाेच्च स्थान देण्यात आले आहे. यज्ञ केल्यामुळे पृथ्वी, जल, वायु, तेज आणि आकाश या पंचमहाभूतांची शुद्धी होते. मानवी शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे; म्हणून शरिराला सुरक्षित ठेवण्यासाठीही पंचमहाभूते शुद्ध रूपांमध्ये असणे केवळ आवश्यकच नाही, तर अनिवार्य आहे. यज्ञ केल्यामुळे जे परमाणु निर्माण होतात, ते काळ्या ढगांना आपल्याकडे आकर्षून घेतात, त्यामुळे यज्ञानंतर पाऊस पडतो. यज्ञात हवनासाठी गायीच्या शेणाच्या गोवर्यांचा उपयोग केला जातो. या गोवर्यांमधून एक प्रकारचे तेज बाहेर पडते, ज्यामुळे लक्षावधी विषारी कीटक तत्क्षणीच नष्ट होऊन जातात. गोमातेच्या सुक्या गोवर्या जाळण्यामुळे माशा, डास इत्यादी मृत पावतात. गायीचे दूध, दही, तूप इत्यादीमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात, जे इतर कोणत्याही दुधामध्ये मिळत नाहीत. गोमूत्रात कितीतरी लहान आणि मोठ्या रोगांना दूर करण्याची शक्ती आहे. हे योग्य प्रकारे ग्रहण केल्यानंतर सर्व प्रकारचे उदररोग, नेत्ररोग, कर्णरोग इत्यादींना नष्ट केले जाऊ शकते. काही संसर्गजन्य रोग, तर गायीला स्पर्श करून आलेली हवा रोग्याच्या शरिराला लागल्यामुळेच नष्ट होऊन जातात. गोमातेच्या संपर्कात राहिल्यावर देवीसारखे (स्मॉल पॉक्स) रोग होत नाहीत.
४. गोमाता ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणे
धर्म आणि संस्कृती यांचे प्रतीक असण्यासह गाय भारताच्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचाही कणा आहे. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये गोपालन आणि गोरक्षण करणे यांना पुष्कळ महत्त्व दिले आहे. ज्या भूमीत शेती होत नसेल, तिला गायरान बनवण्याची सूचना अर्थशास्त्राचीच आहे. गोमाता धर्म आणि अर्थ यांची प्रबळ पोषक आहे. धर्मापासून मोक्षाची प्राप्ती होते आणि अर्थापासून कामनांची (इच्छांची) पूर्तता होते. त्यामुळे भारतीय जीवनात प्राचीन काळापासूनच गोमातेचे एवढे उच्च महत्त्व आहे. गायीच्या अमृततुल्य दुधाव्यतिरिक्त भूमीचा कस टिकवण्यासाठी उत्तम खतही आपल्याला गायीच्या शेणखतापासून प्राप्त होते. याचा अभाव असल्यामुळे आपल्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे संकट कोणत्याही प्रकारे दूर करता येत नाही. आपल्या देशात लक्षावधी एकर भूमी अशी आहे, जेथे ‘ट्रॅक्टर’चा उपयोगही करता येत नाही.
५. गोमातेतील सूक्ष्मातिसूक्ष्म तत्त्व स्थुलातून दिसत नसल्याने आधुनिक वैज्ञानिकांना तिचे महत्त्व न समजणे
आज गोमातेला व्यावहारिक उपयुक्ततेच्या दृष्टीने भौतिक वजनकाट्यावर तोलले जाते. आपण लक्षात ठेवले पाहिजे की, आजच्या भौतिक विज्ञानाला गोमातेची सूक्ष्मातिसूक्ष्म परमोत्कृष्ट उपयुक्तता समजू शकत नाही; पण पूर्वीच्या भारतीय शास्त्रज्ञांनी (ऋषिमुनींनी) आपल्या दिव्य दृष्टीने गोमातेची प्रत्यक्ष उपयुक्तता समजून घेतली होती. गोमातेची धार्मिक महानता तिच्या ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म रूपातील तत्त्वांच्या प्रखरतेमुळे आहे, त्यांचा शोध आणि माहिती यांसाठी आधुनिक वैज्ञानिकांची भौतिक यंत्रे सदैव स्थूलच रहातील. त्यामुळेच २१ व्या शतकातील अग्रेसर वैज्ञानिकही गोमातेच्या रोमारोमांत देवीदेवतांचा वास असण्याचे रहस्य आणि प्रातः गोदर्शन, गोपूजन, गोसेवा इत्यादीचे वास्तविक सत्य समजून घेण्यात अयशस्वी झाले आहेत. गोमातेचे धार्मिक महत्त्व भावजगताशी संबंध ठेवते आणि ते शास्त्रप्रमाणातून शुद्ध भारतीय संस्कृतीच्या दृष्टीकोनातूनच समजून घेता येऊ शकते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे गोमातेला भारतीय संस्कृतीचा मूलाधार म्हटले गेले आहे.’
(साभार : मासिक ‘कल्याण’, ऑगस्ट २०२२)
गायीची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी करायचे उपाय !१. प्रतिदिन हिरवेगार ताजे गवत गायीला पोटभर खायला द्यावे. २. गायीचे दूध काढून तिलाच प्यायला देणे. ३. फुल कोबी (फ्लॉवर) आणि पान कोबी यांची पाने गायीला खाऊ घालावीत. ४. पपईची कच्ची फळे आणि तिची पाने कुटून गुळात मिसळून गायीला खाऊ घालणे. ५. सदाफुली, मोहाची फुले, गवत आणि गूळ पाण्यात एकत्र उकळून गायीला खाण्यास देऊ शकतो. ६. जवसाची भरड आणि शिजवलेला वाटाणा एकत्र करून गायीला खाऊ घालणे. ७. गवाराच्या शेंगा पुष्कळ शिजवून किंवा रात्रभर पाण्यात भिजवून गायीला खायला देऊ शकतो. ८. गूळ आणि पाचक पेय (कांजी) एकत्र करून गायीला खाऊ घालणे. (कांजी म्हणजे ताकात मोहरी बारीक वाटून पाण्यात मिसळून त्यात मीठ, जिरे, सुंठ इत्यादी पदार्थ मातीच्या माठात रात्रभर भिजत ठेवतात. ते फुगल्यावर त्यात गूळ घालून गायीला खाण्यास देणे.) ९. तूप, मैदा आणि गूळ एकत्र शिजवून गायीला खाऊ घातल्यामुळे गाय पुष्कळ प्रमाणात दूध देते. १०. बिया असलेली केळी तांदुळासह शिजवून गायीला खाऊ घालणे. ११. पळस आणि सावरी यांची फुले गायीला खाऊ घालणे.’ (साभार : मासिक ‘कल्याण’, ऑगस्ट २०२२) |