संसदेत खासदारांना मुखपट्टी (मास्क) बंधनकारक !
नवी देहली – चीनसह जगातील काही देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पहाता भारतातही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. संसदेच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्येही मुखपट्टी (मास्क) घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी खासदारांना मुखपट्टी देण्यात आली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना अधिवेशनाच्या कामकाजाच्या वेळी मुखपट्टी घालण्याचे आवाहन केले. त्यामुळे २२ डिसेंबर या दिवशी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मोठ्या संख्येने खासदार मुखपट्टी घालून बसले होते.
संसद में दिखा कोरोना का असर, मास्क पहले नजर आए दोनों सभापति, आज से सांसदों को भी करना होगा नियमों का पालनhttps://t.co/bzjhogWbfz
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) December 22, 2022
जगभरात कोरोनाचे ५ लाख ३७ सहस्र रुग्ण !
कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर लक्ष ठेवणार्या ‘वर्ल्डोमीटर’ या संस्थेनुसार जगभरात ५ लाख ३७ सहस्र रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी कोरोनामुळे १ सहस्र ३९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ घंट्यांत जपानमध्ये सर्वाधिक म्हणजे २ लाख ६ सहस्र रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी २९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही ५० सहस्रांहून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत, तर ३२३ जणांचा मृत्यू झाला. दक्षिण कोरियामध्ये ८८ सहस्र १७२, फ्रान्समध्ये ५४ सहस्र ६१३ आणि ब्राझिलमध्ये ४४ सहस्र ४१५ रुग्ण आढळले आहेत. ब्राझिलमध्ये १९७ लोकांचा मृत्यू झाला आहे.