मीरा-भाईंदर महापालिकेकडून वर्षानुवर्षे रखडलेल्या ‘तसलमात’च्या ६९ लाख रुपयांची वसुली !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चा दणका !
(महानगरपालिकेकडून अधिकारी किंवा कर्मचारी यांनी खर्चासाठी आगाऊ घेतलेल्या रकमेला ‘तसलमात’ असे म्हणतात.)
भाईंदर – मागील २८ वर्षांपासून मीरा-भाईंदर महानगरपालिकेची ‘तसलमात’ची १ कोटी २६ लाख १ सहस्र २७६ रुपयांची वसुली झाली नव्हती. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहितीवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. जनतेच्या करातून जमा झालेल्या या लाखो रुपयांची तातडीने वसुली न केल्यास जनआंदोलन उभारण्याची चेतावणी सुराज्य अभियानाकडून देण्यात आली होती. यामुळेच वर्षानुवर्षे रखडलेल्या ‘तसलमात’च्या रकमेतील ६९ लाख ७० सहस्र ७१० रुपयांची वसुली महानगरपालिका प्रशासनाने वर्षभरात केली. हे अभियानाचे एकप्रकारे यश असल्याचे उद्गार हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे समन्वयक डॉ. उदय धुरी यांनी काढले. ‘सुराज्य अभियान’च्या वतीने सहकार ज्योत सोसायटी, भाईंदर (प.) येथील श्री गजानन रघुनाथ ठाकूर सभागृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘सुराज्य अभियाना’चे श्री. अभिषेक मुरुकटे हेही उपस्थित होते.
डॉ. धुरी या वेळी म्हणाले की,
१. ‘तसलमात रकमेचा विनियोग कसा केला ?’, याचा तपशील आणि पुरावे देणे कायद्याने बंधनकारक आहे. याविषयीची देयके आणि उरलेली रक्कम वेळच्या वेळी जमा करणेही बंधनकारक आहे. आधीच्या ‘तसलमात’चा हिशेब दिल्याविना नवीन रक्कम घेता येत नाही’, असा कायदा आहे. हा कायदा धाब्यावर बसवून मीरा-भाईंदर महानगरपालिकेने पैसे दिले आणि अनेक वर्षे याची वसुलीही केली नाही.
२. महानगरपालिका प्रशासनाकडून सुराज्य अभियानाला कळवण्यात आलेल्या माहितीनुसार वर्ष १९९३ पासून प्रलंबित असलेल्या ‘तसलमात’च्या वसुलीत अजूनही ५६ लाख ३० सहस्र ५६६ रुपयांची रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये अद्यापही १७ लाख १ सहस्र ४९९ रुपयांची थकबाकी येण्यात काही अडचणी आहेत, असे समजले. या दृष्टीने ही वसुली पूर्ण करण्यात महानगरपालिकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
उर्वरित ५६ लाख रुपयांची वसुली ८ टक्के व्याजाने करावी !
वर्ष १९९३ पासून असलेली लाखो रुपयांची थकबाकी हा प्रशासकीय अधिकार्यांच्या भोंगळ कारभाराचा परिणाम आहे. जनतेच्या कष्टाचा पैसा अशा प्रकारे अवैधरित्या वापरणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षे जनतेच्या या लाखो रुपयांच्या वसुलीकडे दुर्लक्ष करणारे प्रशासकीय अधिकारीही तितकेच दोषी आहेत. ‘ही वसुली न करण्यामागे संबंधित अधिकार्यांचे काही हितसंबंध आहेत का ?’, याचीही सरकारने चौकशी करावी, तसेच अद्यापही वसूल न झालेल्या तसलमात च्या ५६ लाख ३० सहस्र ५६६ रुपयांची वसुली ८ टक्के व्याजाने आणि समयमर्यादेत पूर्ण करावी. अन्यथा ज्या अधिकार्यांनी ‘तसलमात’च्या वसुलीकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या वेतनातून हे पैसे वसूल करावेत. ज्यांनी ‘तसलमात’ची रक्कम बुडवली, त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत, या आमच्या मागण्या आहेत.
शहराच्या विकासासाठी असलेला पैसा प्रशासनाने तातडीने वसूल केला नाही, तर या विरोधात न्यायालयात जाऊन आम्ही कायदेशीर कारवाई करू’, असे ‘सुराज्य अभियान’चे श्री. अभिषेक मुरुकटे म्हणाले.
क्षणचित्र : जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या वरील विषयावरील पत्रकार परिषदेपासून आतापर्यंत या विषयाला मीरा-भाईंदर रोड येथील पत्रकारांनी दिलेल्या प्रसिद्धीविषयी समितीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
संपादकीय भूमिकासमाजकर्तव्य पार पाडण्यासाठी प्रयत्नरत असणार्या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन ! |