दिशा सालियान प्रकरणाची एस्.आय.टी. चौकशी करण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्यांचा गोंधळ !
विधान परिषदेतून…
विधान परिषदेचे कामकाज २ वेळा स्थगित !
नागपूर,२२ डिसेंबर (वार्ता.) – बहुचर्चित अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील दिशा सालियान हत्या प्रकरणाची विशेष अन्वेषण यंत्रणेद्वारे (एस्.आय.टी.) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’द्वारे केली; मात्र ‘अचानक मांडलेल्या या सूत्रावर चर्चा करता येणार नाही’, असे सांगून सभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे सत्ताधार्यांनी ‘या प्रकरणी चर्चा झालीच पाहिजे’, अशी मागणी करत सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींनी प्रथम १ घंटा आणि नंतर ३० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले. आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे सूत्र शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत उपस्थित केले आहे. त्यामुळे दिशा सालियान हत्या प्रकरणाची एस्.आय.टी.द्वारे चौकशी करण्यात यावी.