राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे निलंबन !
विधानसभेच्या अध्यक्षांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण
नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – विधानसभेच्या अध्यक्षांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत विधीमंडळाच्या सभागृहात उपस्थित रहाता येणार नाही. या कालावधीत नागूपर आणि मुंबई विधीमंडळाच्या परिसरत त्यांना प्रवेश करता येणार नाही. संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. हा ठराव बहुमताने सभागृहात संमत करण्यात आला.
संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा ठराव माडंला होता. https://t.co/8iBD7mf8V4 #jayantpatil #NCP #nagpur
— ABP माझा (@abpmajhatv) December 22, 2022
१. सभागृहाचे कामकाज चालू असतांना जयंत पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांना ‘निर्लज्ज’ म्हटले. ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’, असे सभापतींविषयी अवमानकारक उद्गार जयंत पाटील यांनी काढले. याला विरोधकांनी आक्षेप घेत जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
२. या वेळी निर्माण झालेल्या गोंधळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतरही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी कारवाईची मागणी लावून धरली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पुन्हा ३ असे एकूण ४ वेळा १ घंटा २५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
३. दिशा सालियन हत्येची गृहमंत्र्यांनी एस्.आय.टी. चौकशी घोषित केल्यानंतर विरोधकांनी पूजा चव्हाण हिच्या हत्येविषयी चौकशीसाठी अध्यक्षांच्या आसनापुढील जागेत येऊन घोषणाबाजी केली. या वेळी अध्यक्षांनी कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांच्या वतीने भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी देण्याची विनंती केली; मात्र अध्यक्षांनी मागणी नाकारल्यावर जयंत पाटील यांनी अध्यक्षांविषयी अवमानकारक उद्गार काढले.
जयंत पाटील यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आणि अशोभनीय ! – चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाजमंत्री
जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह आणि अशोभनीय आहे. यामुळे अध्यक्षांचे पर्यायाने सभागृहाच्या सर्वाेच्च पदाचा अवमान झाला आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास सभागृहात चुकीचा पायंडा निर्माण होर्सल. सभागृहाच्या आचरण आणि नितीमूल्य समिती गठीत करून याची चौकशी करावी, अशी मागणी केली. अध्यक्षांनी ही मागणी मान्य केली. जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाच्या कार्यवाहीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.