३ मासांत कोरोना साहाय्य निधीची रक्कम २ सहस्र ५०० रुपये करणार ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री
नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – कोरोना साहाय्य निधीची रक्कम २ सहस्र ५०० रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी संबंधित सर्व विभागांची मान्यता प्राप्त झाली आहे. येत्या ३ मासांत ही रक्कम २ सहस्र ५०० रुपये करण्यात येईल, असे आश्वासन महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिले.
कोरोनाच्या काळात कर्ता पुरुषाचा मृत्यू झाला असल्यास त्या कुटुंबियांना, तसेच ज्या बालकांच्या पाल्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना ‘मिशन वात्स्यल्य’ अंतर्गत १ सहस्र १०० रुपये इतका साहाय्य निधी दिला जातो. या रकमेत वाढ करण्याची मागणी आमदार कुणाल पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. या वेळी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश आदी राज्यांमध्ये शासनाकडून कोरोनामध्ये देण्यात येणार्या साहाय्याचा निधी अधिक असल्याची माहिती सभागृहात देऊन निधी वाढवण्याची मागणी केली होती.