जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याची विधानसभेत लोकप्रतिनिधींनी मांडली समस्या !
रोजगार हमी योजनेतून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची मंत्र्यांची घोषणा !
नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – सर्व शिक्षण अभियानातून मागील १० वर्षे शाळांच्या वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळालेला नाही, अशी अडचण आमदार प्रकाश सोवनी यांनी उपस्थित केली. धुळे येथील आमदार कुणाल पाटील यांनीही धुळे जिल्ह्यातील २६ शाळांमधील ६१ वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून अवधान गावात एक शाळा दीड वर्षे झाडाखाली भरवली जात असल्याचे सांगितले. माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही समग्र शिक्षण योजनेतून शाळांसाठी मिळणारा निधीही अपुरा असल्याची खंत व्यक्त केली.
या वेळी ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत, ‘शाळांमध्ये गळती होत आहे’, असे काही प्रमाणात असल्याची वस्तूस्थिती आहे; मात्र सध्या निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन. या योजनेतून निधी उपलब्ध झाल्यास राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न सुटेल.