३१ डिसेंबरपर्यंत इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्डशी लिंक करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – राज्यशासनाने संच मान्यतेसाठी इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची माहिती सरल प्रणालीवर भरणे शाळांना बंधनकारक केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत इयत्ता १२ वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्डशी लिंक करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात दिली.

सरल प्रणालीवर विद्यार्थ्यांची नावे येण्यासाठी प्रत्येक तालुक्यात २ यंत्रे देण्यात आली आहेत. केंद्रशासनाच्या आय्.टी.आय. संस्थेला याची ठेकेदारी देण्यात आली आहे. राज्यातील एकूण ५ लाख १३ सहस्र १६३ विद्यार्थ्यांता आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांची नावे २ वेळा घेण्यात येतात. आधारकार्डशी लिंक केल्यामुळे विद्यार्थ्यांची २ वेळा नावे येणार नाहीत.