स्वमग्न मुलांवरील उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र चालू करणार ! – डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्यमंत्री
विधानसभा लक्षवेधी…
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – स्वमग्नता (ऑटिझम) आणि गतीमंदता या मेंदूविकारांनी त्रस्त मुलांवरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र चालू करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली. याविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या वेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य राजेश टोपे आदींनी सहभाग घेतला.
त्यावर मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, आरोग्य विभागाच्या वतीने शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची पडताळणी करून त्यांच्यात आढळणारे जन्मतः असलेले व्यंग, विकास विलंब आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार यांचे वेळेत निदान होऊन योग्य ते उपचार करण्यासाठी ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम’ चालू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात पथके नियुक्त केली असून त्यांच्या वतीने स्वमग्नता आणि गतीमंदता या मेंदूविकारांविषयी विद्यार्थी अन् अंगणवाडीतील ० ते ६ वर्षे वयांच्या बालकांची पडताळणी करण्यात आली आहे. या आजारांचा ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने’त समावेशाचा विचार करण्यात येईल.