आम्ही क्लब चालवतो, डान्स बार नव्हे : सतावणूक बंद करा ! – कळंगुट (गोवा) येथील क्लबचे चालक
कळंगुट – आम्ही क्लब चालवतो, डान्स बार नव्हे. कायद्याच्या दृष्टीने आम्ही व्यवसाय करत आहोत; मात्र आमची विनाकारण सतावणूक केली जात आहे. कळंगुट येथे ‘महिला नाच करते आणि लोक तिच्यावर पैसे फेकतात’, असे डान्स बार अस्तित्वात नाहीत. कळंगुट येथे डान्स बारच अस्तित्वात नाहीत, असा दावा कळंगुट येथील क्लबच्या चालकांनी एका पत्रकार परिषदेत केला.
(सौजन्य : Goa 365 TV)
कळंगुट येथील अवैध ‘डान्स बार्स’च्या विरोधात स्थानिक आमदार, पंचायत आणि नागरिक यांनी आंदोलन छेडले आहे आणि यामुळे स्वेच्छेने अनेकांनी डान्स बार बंद केले आहेत. अनेक अवैध डान्स बारना पंचायतीने नोटिसा पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कळंगुट येथील क्लबच्या चालकांनी हे आवाहन केले आहे.
(सौजन्य : Herald TV)
ते पुढे म्हणाले, ‘‘आम्हाला व्यवसाय करण्यासाठी सरकारचे संरक्षण पाहिजे. ‘डान्स’ हे एक मनोरंजनाचे साधन आहे, असे सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले आहे. कळंगुट पंचायतीने आम्हाला अनधिकृत बांधकामाला अनुसरून नोटिसा दिलेल्या आहेत, तर त्या क्लबमधील कोणत्याही स्वरूपाच्या अनधिकृत कृत्यावरून नाही. स्थानिकांनी आमच्या एका क्लब परिसरात अवैधरित्या प्रवेश करून आमच्या कर्मचार्याला मारहाण केली आणि आमच्या संपत्तीची नासधूस केली. कायदा कुणीही हातात घेऊ शकत नाही.’’ (राज्यात अवैध व्यवहार फोफावत असल्याने त्याविरोधात जनता, व्यावसायिक, प्रशासन आणि सरकार यांनी राज्यहितासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक)