चि. श्रीरंग सुदेश दळवी याच्या अंडकोषाला बसलेला पीळ सोडवण्यासाठीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याने आणि त्याच्या आईने अनुभवलेली गुरुकृपा !
चि. श्रीरंग सुदेश दळवी (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) याच्या अंडकोषाला बसलेला पीळ सोडवण्यासाठीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याने आणि त्याच्या आईने अनुभवलेली गुरुकृपा !
‘आजारपणात कठीण प्रसंगाला तोंड कसे द्यायचे, हे या लेखावरून सर्वांना शिकायला मिळेल. त्याचा आपत्काळात सर्वांनाच लाभ होईल. याबद्दल दळवी कुटुंबातील सर्वांचेच अभिनंदन ! ‘त्यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पर्वरी (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक चि. श्रीरंग सुदेश दळवी याच्यावर नोव्हेंबर २०१९मध्ये पणजी येथील रुग्णालयात एक अत्यंत नाजूक आणि महत्त्वाची शस्त्रक्रिया पार पडली. आजाराचे निदान वेळेत होणे, आधुनिक वैद्य वेळेत उपलब्ध होणे, औषधोपचारांसह योग्य आध्यात्मिक उपायसुद्धा वेळेत मिळणे, या सर्व गोष्टींमुळे श्रीरंग मोठ्या संकटातून लवकर बाहेर पडू शकला. या आजारपणात त्याच्याकडून त्याच्या आईला शिकायला मिळालेली सूत्रे, श्रीरंग आणि त्याच्या आईला आलेल्या अनुभूती, तसेच त्यांनी विविध प्रसंगांत अनुभवलेली गुरुकृपा येथे देत आहोत.
पूर्वार्ध
१. श्रीरंगला बालसंस्कारवर्गातून घरी आल्यावर थकवा आल्यासारखे वाटून पोट दुखू लागणे, आयुर्वेदाचे औषध दिल्यानंतर थोडा वेळ बरे वाटणे; मात्र काही वेळाने त्रास परत वाढणे
‘श्रीरंग दिवाळीच्या सुटीत एका आध्यात्मिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या बालसंस्कारवर्गाला जात होता. तेथे मुलांकडून सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत गायत्री मंत्राचे पठण, महामृत्युंजय मंत्राचे पठण, दुर्गानाममाला म्हणणे, सूर्यनमस्कार घालणे, योगासने करणे, तसेच खेळसुद्धा घेण्यात येत असत. अशा प्रकारच्या दिवसभराच्या शिबिरासाठी मी त्याला प्रथमच पाठवले होते. आरंभीचे चार दिवस श्रीरंगला कोणताच त्रास झाला नाही. पाचव्या दिवशी म्हणजे ५.११.२०१९ या दिवशी सायंकाळी तो शिबिराहून घरी आला. तेव्हा तो पुष्कळ थकल्यासारखा दिसत होता. त्याचा तोंडवळा काळवंडला होता. आम्ही त्याला विचारले असता त्याने केवळ ‘‘थकल्यासारखे वाटत आहे’’, एवढेच सांगितले. त्या दिवशी रात्री १० वाजता अचानकपणे त्याचे पोट दुखू लागले. ‘दिवसभर शौचास झाले नसल्याने ‘गॅस’मुळे (पोटातील वायुमुळे) पोट दुखत असेल’, असे मला वाटले. मी त्याला ओवा खायला देऊन वर गरम पाणी प्यायला दिले. या उपचाराने त्याला १५ मिनिटे आराम मिळाला; परंतु नंतर पुन्हा त्याचे पोट दुखू लागले.
२. आयुर्वेदीय औषध आणि नामजपादी उपाय यांमुळे श्रीरंगला दिवसभर बरे वाटणे, रात्री पुन्हा पोटात दुखू लागल्यावर त्याने आईचा विचार करून आधुनिक वैद्यांकडे जाण्याचे टाळून रात्रभर वेदना सहन करणे
मी त्याला पोटदुखीवरचे आयुर्वेदाचे औषध दिले, तसेच पू. बाबांना (पू. रमेश गडकरी यांना) भ्रमणभाषवरून संपर्क करून नामजपादी उपाय विचारले. त्यांनी सांगितल्यानुसार नामजप आणि मुद्रा केल्यावर पहाटे ३.३० वाजता त्याला झोप लागली. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याची पोटदुखी पूर्ण बरी झाली होती. त्या दिवशी आम्ही त्याला विश्रांती घेण्याच्या दृष्टीने शिबिराला पाठवले नाही. दिवसभर त्याला कुठलाही त्रास झाला नाही. ६.११.२०१९ ला रात्री ९.३० वाजता त्याला मांडीत आणि जांघेत दुखू लागले. मला वाटले ‘अति थकल्यामुळे किंवा अशक्तपणामुळे दुखत असावे.’ मी त्याला विचारले, ‘‘वैद्यांकडे जाऊया का ?’’; पण तो म्हणाला, ‘‘जास्त दुखत नाही. झोपल्यावर बरे वाटेल.’’ रात्री त्याचा त्रास वाढला; परंतु त्याने मला उठवून त्याविषयी सांगितले नाही. नंतर जेव्हा मी त्याला असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘पुष्कळ रात्र झाली होती; बाबासुद्धा घरी आले नव्हते. (श्रीरंगचे बाबा रात्री १ ते १.३० वाजता कामावरून घरी येतात.) मग तू मला वैद्यांकडे कसे नेले असतेस ? म्हणून मी देवाला प्रार्थना करून पू. आजोबांनी सांगितलेला नामजप करत झोपलो.’’ त्याचे बोलणे ऐकून मला त्याच्यातील ‘इतरांचा विचार करण्याची वृत्ती’ हा गुण दिसून आला.
३. श्रीरंगचा मांडीपासून बेंबीपर्यंतचा भाग दुखणे आणि त्याच्या अंडकोषाला सूज आल्याचे लक्षात येणे
‘मला त्रास होऊ नये आणि त्याच्या बाबांना कामावरून आल्यावर पुन्हा रात्री धावपळ करायला लागू नये’; म्हणून श्रीरंगने रात्री आम्हाला काही सांगितलेच नाही. दुसर्या दिवशी सकाळी (७.११.२०१९ या दिवशी) मी नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत होते. तेव्हा श्रीरंग उठून लंगडत जवळ आला. त्याला पाहून मी वैद्यांकडे घेऊन जाण्यासाठी त्याला सिद्धता (तयारी) करण्यास सांगितले. एरव्ही त्याला उठल्यानंतर पुष्कळ भूक लागते; पण त्या दिवशी त्याने भूक नसल्याने थोडासा चहा आणि २ बिस्किटे खाल्ली. नंतर त्याचे बाबा त्याला स्नान घालत असतांना त्यांच्या लक्षात आले की, ‘त्याचा बेंबीपासून मांडीपर्यंतचा भाग पुष्कळ दुखत आहे आणि त्याच्या अंडकोषाला (Testis ला) सूज आली आहे. ते डाव्या बाजूने लालसर झाले आहे.’
४. ओळखीच्या वैद्यांना संपर्क केल्यावर त्यांनी आधुनिक वैद्यांचा तात्काळ सल्ला घेण्यास सांगणे
मी लगेच माझ्या पाळणाघरात येणार्या एका मुलीच्या आईला भ्रमणभाषवरून संपर्क केला. त्या आयुर्वेदिक वैद्या आहेत. त्या त्वरित घरी आल्या. त्यांनी पहाताक्षणीच मला सांगितले, ‘‘तुम्ही त्वरित एखाद्या शल्यचिकित्सकाचा (सर्जनचा) सल्ला घ्या. कुणी आधुनिक वैद्य तुमच्या ओळखीचे असतील, तर त्यांना संपर्क करून त्यांच्यामार्फत ताबडतोब उपचार मिळतील असे बघा.’’ क्षणभर मला सुचेनासे झाले. त्याच वेळी देवाने सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) अमृता देशमाने यांना संपर्क करून श्रीरंगला होणार्या त्रासाविषयी सांगण्यास सुचवले. त्याप्रमाणे मी त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी मला श्रीरंगच्या सूज आलेल्या भागाचे छायाचित्र काढून पाठवण्यास सांगितले. मी तसे छायाचित्र पाठवले. ते पाहून त्यांनी लगेचच बालशल्यचिकित्सक (पेडियाट्रिक सर्जन) आधुनिक वैद्य विशाल सावंत यांच्याशी संपर्क साधून श्रीरंगची स्थिती सांगितली. त्या वेळी आधुनिक वैद्य सावंत जुन्या गोव्यातील रुग्णालयातून पणजी येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. आम्ही पर्वरी येथे रहात असल्याने त्यांनी आधुनिक वैद्या अमृता यांच्याकडे ‘तात्काळ श्रीरंगला घेऊन पणजी येथील ‘हेल्थ वे’ रुग्णालयात येण्यास सांगा’, असा निरोप आमच्यासाठी दिला. त्याप्रमाणे आधुनिक वैद्या (सौ.) अमृता यांनी आम्हाला तातडीने निघण्यास सांगितले.
५. आधुनिक वैद्या (सौ.) अमृता देशमाने यांनी आम्हाला तातडीने ‘हेल्थ वे’ रुग्णालयात जाण्यास सांगून ‘आजाराचे गांभीर्य कळावे’, यासाठी धोक्याची जाणीव करून देणे
मी घरात पाळणाघर चालवत असल्याने आणि त्याची वेळ सकाळी ९ वाजताची असल्याने हळूहळू मुले येण्यास आरंभ झाला होता. दोन मुले आधीच आली होती. आमची कन्या देवश्री सुटीतील जादा वर्गासाठी शाळेत गेली होती. पाळणाघरातील मुलांसह थांबण्यासाठी देवश्रीला शाळेतून घरी आणेपर्यंत आम्हाला घरातून निघता येत नव्हते. या कालावधीत श्रीरंग शांत पडून होता. त्यामुळे मला ‘त्याची शारीरिक स्थिती किती गंभीर आहे ?’, हे कळत नव्हते. मी रुग्णालयात जाण्याची सिद्धता करत होते, इतक्यात आधुनिक वैद्या (सौ.) अमृता यांचा मला पुन्हा भ्रमणभाष आला. त्या म्हणाल्या, ‘‘आधुनिक वैद्य सावंत १० मिनिटांत रुग्णालयात पोचतील. तुम्ही लगेच निघा.’’ मला गांभीर्य कळावे; म्हणून त्यांनी ‘उशीर झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो’ याची जाणीव करून दिली. मी थोडी घाबरले; पण यजमानांना ताण येऊ नये; म्हणून त्यांना काहीही न सांगता केवळ ‘लवकरात लवकर जाऊया’, एवढेच सांगितले.
६. श्रीकृष्णाला प्रार्थना करतांना दुचाकीचे चित्र दिसणे आणि तेव्हा ‘वाहतूक कोंडीमुळे चारचाकी वाहनाऐवजी दुचाकीने गेलो, तर विना अडथळा तातडीने पोचता येईल’, हे श्रीकृष्णाने सुचवणे
घरातून निघतांना मी श्रीकृष्णाच्या प्रतिमेपुढे डोळे मिटून नमस्कार करत असतांना मला डोळ्यांसमोर माझी दुचाकी दिसू लागली. त्या वेळी वाटले, ‘आपल्याला हे का दिसत आहे ? देवाला काहीतरी सुचवायचे आहे.’ घड्याळात पाहिले, तर सकाळचे ९.३० वाजले होते. या वेळेत पणजीच्या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. मी यजमानांना सांगितले, ‘‘आपण माझ्या दुचाकीने श्रीरंगला रुग्णालयात नेऊ.’’ ते म्हणाले, ‘‘ते कसं शक्य आहे ? त्याला बसता येणार नाही आणि तिथे गेल्यावर आधुनिक वैद्यसुद्धा आपल्याला ओरडतील.’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘लवकर नाही पोचलो, तर आणखी ओरडतील.’’ शेवटी आम्ही दुचाकीनेच त्याला रुग्णालयात नेले. प्रत्यक्षात मार्गात वाहतूक कोंडीमुळे चारचाकी वाहनांची रांग लागली होती. दुचाकी वाहनाने गेल्यामुळे आम्ही लवकर पोचू शकलो. आधुनिक वैद्यही नंतर म्हणाले, ‘‘तुम्ही दुचाकीने आलात ते योग्य केलेत.’’ देवानेच योग्य वेळी योग्य विचार सुचवला.
(क्रमश:)
– सौ. रसिका सुदेश दळवी (चि. श्रीरंगची आई), पर्वरी, गोवा. (नोव्हेंबर २०१९)
उत्तरार्ध वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/638617.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |