भोसरी (पुणे) येथे ‘कामधेनू महोत्सवा’स उत्साही वातावरणात प्रारंभ !
|
भोसरी (पुणे) – भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘जनमित्र सेवा संघ’ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्या वतीने आयोजित ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’स उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. या वेळी शोभायात्रा काढण्यात आली, तसेच कामधेनू यज्ञही करण्यात आला. या शोभायात्रेसाठी श्री श्री प.पू. १००८ यती अनिरुद्धानंदतीर्थजी महाराज यांची विशेष उपस्थिती होती, तसेच यज्ञही महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. परम महासंगणकाचे जनक पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी यज्ञस्थळी भेट दिली.
काळूबाई मंदिर ते पांजरपोळपर्यंत शोभायात्रा !
प्रारंभी काळूबाई मंदिर ते पांजरपोळपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत प्रारंभी श्री श्री प.पू. यती अनिरुद्धानंदतीर्थजी महाराज यांच्या हस्ते देवीला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यात्रेच्या अगोदर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, तसेच अन्य देवतांचा जयघोष करण्यात आला. शोभायात्रेत गोप्रेमी महिलांनी डोक्यावर कलश घेतला होता, तसेच विविध गोप्रेमींनी गायींच्या संदर्भात प्रबोधन करणारे फलक धरले होते. शोभायात्रेत विविध गोप्रेमी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या ‘कामधेनू महोत्सवा’स अधिकाधिक नागरिकांनी भेट देऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या परिषदेस केंद्रीय गोसेवा आयोगाचे श्री. विनोदभाई कथेरिया, पांजरपोळचे अध्यक्ष श्री. पित्ती, व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. ओमप्रकाश रांका, तसेच आमदार श्री. महेश लांडगे आणि आमदार श्री. लक्ष्मण जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले.
२५ डिसेंबरपर्यंत चालणार कामधेनू यज्ञ
यज्ञाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रायश्चित्त कर्म, दशविधीस्नान प्रयोग, गोरक्षा आणि विश्वकल्याणासाठी संकल्प, वैदिक आचार्य यांच्याकडून गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्य ब्राह्मणवर्णन, तसेच यज्ञशोभयात्रा झाली. यानंतर पुढील सत्रात यज्ञवास्तूमंडल पूजन, योगिनीपूजन, क्षेत्रपालपूजन, प्रधानदेवतापूजन (गोमाता-विष्णुपंचायतपूजन), नवग्रहदेवतामंडल पूजन, अरणीमंथन, यज्ञमंडपपूजन, नवग्रह हवन आणि महाआरती करण्यात आले. कामधेनू यज्ञ २५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’चाही कक्ष !
परिषदेत उभारण्यात आलेल्या कक्षांच्या ठिकाणी दैनिक ‘सनातन प्रभात’चाही कक्ष उभारण्यात आला आहे. त्यात ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून गोरक्षणाच्या संदर्भात होत असलेले कार्य, तसेच ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून होत असलेले राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य यांविषयी माहिती देणारे फलक लावले आहेत.
क्षणचित्रे
१. ‘शोभायात्रा पांजरपोळ येथे आल्यावर अनेक गोमाता उत्कंठेने शोभायात्रेकडे पहात होत्या, तसेच काही गायी हंबरत होत्या’, असे उपस्थितांनी सांगितले.
२. या वेळी गोप्रेमींनी हातात ‘गावो विश्वस्य मातर: अर्थात् ‘गाय संपूर्ण विश्व की माता है’, ‘माता बनकर दूध पिलाय, वैद्य बनकर रोग मिटाए, चलता-फिरता है औषधालय’, असे प्रबोधनपर लिखाण असलेले फलक धरले होते.
३. परिषदेत गोप्रेमी संस्था-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी आहेत.
४. परिषदेच्या ठिकाणी विविध गोरक्षण करणार्या संघटना, संस्था यांचे माहिती देणारे कक्ष उभारण्यात आले आहेत.