तमिळनाडू येथील कार्तिकस्वामी मंदिराच्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाचा निवाडा !
विश्वातील हिंदु मंदिरांच्या उभारणीसाठी सरकारकडून निधी दिला जात असतांना देशातील मंदिरांचे सरकारीकरण होणे अनाकलनीय !
१. कार्तिकस्वामी मंदिरातील स्कंदषष्ठी उत्सवाच्या काळात धार्मिक कार्यक्रम आणि पूजा करण्यासाठी मंदिरात राहू देण्याची भक्ताची विनंती फेटाळण्यात येणे
‘आर्.सिधरंगथन् या भक्ताने मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका प्रविष्ट केली. या याचिकेची सुनावणी मदुराई खंडपिठाच्या द्विसदस्यांच्या पिठासमोर झाली. या याचिकेत त्याने थुथूकुडीचे जिल्हाधिकारी आणि चेन्नई येथील ‘हिंदु धार्मिक अन् धर्मादाय देणगी विभागा’चे (एच्.आर्. अँड सी.ई.) आयुक्त यांना प्रतिवादी केले. त्याने तिरुचेंदुर, जिल्हा थुथूकुडी, तमिळनाडू येथील सुब्रह्मण्यम् (कार्तिकस्वामी) मंदिरात ‘स्कंदषष्ठी उत्सवाच्या काळात धार्मिक कार्यक्रम आणि पूजा करण्यासाठी त्याला ६ दिवस राहू द्यावे’, अशी विनंती थुथूकुडीचे जिल्हाधिकारी आणि हिंदु धार्मिक अन् धर्मादाय देणगी विभागाचे आयुक्त यांना केली होती; परंतु त्याचा विनंती अर्ज फेटाळला गेला.
२. कार्तिकस्वामी मंदिराचे बांधकाम ३ संत महात्म्यांनी केलेले असणे
कार्तिकस्वामींचे येथे वास्तव्य असल्याने हे मंदिर पवित्र समजले जाते. कार्तिकस्वामी मंदिर (लॉर्ड मुरुगन स्वामी) बंगालच्या उपसागराजवळ आणि कन्याकुमारी शहरापासून ७० किलोमीटर अंतरावर थिरूथन्नी पर्वतावर आहे.
श्री देसिकामूर्ती स्वामी तिरूवदूथूराई मठ यांनी ते बांधलेले आहे. काहींच्या मते हे मंदिर ३ ऋषींनी किंवा संतांनी बांधले आहे. कार्तिकस्वामींचे येथे वास्तव्य असल्याने हे मंदिर पवित्र समजले जाते. हे बांधकाम करण्यासाठी त्यांना ७२ वर्षे लागली. कार्तिकस्वामींची भारतभरात ६ मंदिरे आहेत. त्यातील हे दुसरे मंदिर आहे. तमिळनाडूतील हे चौथे ‘आय.एस्.ओ.’(आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना) मानांकित मंदिर आहे. त्याला ३६५ पायर्या आहेत. याचा संबंध काही भक्त इंग्रजी दिनदर्शिकेशी जोडतात.
३. मदुराई न्यायालयाने कार्तिकस्वामी मंदिरांची केलेली स्तुती !
न्यायालयाने भक्ताची रिट याचिका खारीज (निकाली) केली, तरी न्यायमूर्तींनी त्यांच्या निकालपत्रात कार्तिकस्वामी मंदिरांची तोंडभरून स्तुती केली. त्यांनी या मंदिराविषयी म्हटले, ‘‘ही मंदिरे केवळ पूजा आणि प्रार्थना करण्याचे स्थान नसून ती मूर्ती शिल्पकला, रंग-चित्रकला, मूर्तीकला, भित्तीचित्रकला आणि संगीतकला यांचा वारसा जपणारी अन् या कलेला प्रोत्साहित करणारी ठिकाणे आहेत. तमिळनाडू राज्यात पुरातन, भव्य आणि भक्तांना उल्हासित करणारी मंदिरे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यातून हिंदु संस्कृती आणि हिंदु शासनकर्ते यांची भव्यता दिसून येते. या मंदिरांवर अनेकदा म्लेंच्छ आणि ख्रिस्ती शासक यांचे आक्रमणे झाली, तरीही ही मंदिरे समर्थपणे टिकून राहिली.’’
४. कार्तिकस्वामी मंदिरात साजरा होणारा स्कंदषष्ठी उत्सव
हा उत्सव वर्षातून एकदा ६ दिवस ‘सूरसंहार उत्सव’ या नावाने साजरा केला जातो. कार्तिकस्वामींनी (देवांनी) राक्षसांशी ६ दिवस लढाई करून युद्ध जिंकले होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा होतो. हा उत्सव इंग्रजी दिनदर्शिकेनुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासात येतो अन् कार्तिक पौर्णिमा या दिवशीही साजरा होतो. हा उत्सव कार्तिक मासातील कार्तिक शुक्ल प्रतिपदा ते षष्ठी, म्हणजेच २५ ते ३० ऑक्टोबर २०२२ या दिवसांमध्ये साजरा झाला. या उत्सवात धार्मिक उपक्रम साजरे होतात. या मंदिरात प्रार्थना किंवा स्तोत्रे म्हणण्यासाठी, तसेच लोककला किंवा लोकविद्या, नृत्य, नाटके, सार्वजनिक वैदिक चर्चा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हिंदु मंदिराने मनुष्याला आचार-विचार दिले. त्यांच्यातील जन्मजात कलागुणांना वाव दिला. या ६ दिवसांत सहस्रो भक्त दर्शनासाठी येतात. प्रशासन किंवा न्यायालय यांच्या मते ‘एखाद्या धार्मिक कार्यक्रमावर बंधने आणल्याने अन्य उपक्रमांवर परिणाम होत नाही. भक्तांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांना मुख्य गाभार्यात प्रवेश नाकारला. भक्त त्यांच्या श्रद्धेप्रमाणे ६ दिवस उपवास करतात. होम-हवन केल्याने मंदिरातील वास्तुशिल्पाला धोका पोचतो’, असे प्रशासनाचे मत आहे.
५. ‘भक्ताला धार्मिक स्वातंत्र्य असले, तरी मंदिराच्या सुव्यवस्थेसाठी नियम घालून देणे आवश्यक असते’, असे उच्च न्यायालयाने सांगणे
याचिकाकर्त्या भक्ताच्या मते ‘घटनेच्या कलम २५ आणि २६ नुसार त्याला कार्तिकस्वामींची भक्ती करण्याचा अन् त्या काळात प्रथेनुसार आध्यात्मिक कार्यक्रम करण्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रशासन त्यावर बंधने घालू शकत नाही.’ यासाठी ही जनहित याचिका करण्यात आली होती. ‘प्रशासन हे अधिकार स्वीकारते; मात्र सुरक्षितता आणि मंदिराचे पावित्र्य राखणे यांसाठी त्यावर बंधने घालण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. तमिळनाडू सरकारने ‘तमिळनाडू टेंपल एंट्री ऑथोरायझेशन ॲक्ट, १९४७’च्या कलम ४ नुसार तशा प्रकारची नियमावली कार्यवाहीत आणली आहे. तरीही अशी बंधने केवळ हिंदु धर्मीय आणि हिंदु मंदिरे यांवर घालता येणार नाहीत, असे कलम ४ स्पष्टपणे म्हणते.
कलम ५ प्रमाणे मंदिराचे पावित्र्य आणि स्वच्छता भंग करणारे तंबाखू अन् सिगारेट यांच्या सेवनावर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. कलम ६ म्हणते की, मंदिरातील पूजा, धार्मिक कार्यक्रम बाधित होतील, असे कृत्य करता येणार नाही. ज्या प्रथा-परंपरा मंदिरापूर्वी नव्हत्या, त्यांच्यासाठी अट्टाहास धरता येणार नाही. हे सर्व नियम भक्त आणि प्रशासन यांच्या बाजूने सम प्रमाणात आहेत; मात्र त्यात तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. ज्याला भक्त आपला अधिकार म्हणतात, त्यावर योग्य प्रकारे कार्यक्रम होण्यासाठी काही नियम लागू करणे, हे प्रशासनाचे काम आहे’, असे प्रतिपादन न्यायालयात केले होते.
यासाठी न्यायालयाने वर्ष १९५२ चा ‘नरहरि शास्त्री विरुद्ध बद्रीनाथ मंदिर समिती’, या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा संदर्भ दिला. न्यायालयानुसार ‘एच्.आर्. अँड सी.ई. ॲक्ट’ (हिंदु धार्मिक अन् धर्मादाय देणगी कायदा) कलम २३ चा उल्लेख करण्यात आला. त्यानुसार आयुक्तांना अशा प्रकारची बंधने घालण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.
६. कार्तिकस्वामी मंदिराच्या नूतनीकरणासाठी शासनाने ३०० कोटी रुपयांची ‘बृहत् योजना’ घोषित करणे
‘मंदिराच्या नूतनीकरणासाठी घोषित केलेल्या भव्य योजनेचे उद्घाटन २६.९.२०२२ या दिवशी करण्यात आले. त्यामुळे भक्तांची गर्दी नियंत्रणात ठेवून ठराविक कालावधीत मंदिराचे भव्यदिव्य नूतनीकरण करण्यासाठी ही बंधने घालण्यात आली आहेत. विकासकामांसाठी कामगार मोठ्या संख्येने मंदिरात येतात आणि त्यासाठीही जागेची कमतरता पडते. हे कारण लक्षात घेऊन अशी बंधने घालण्यात आली’, असे स्पष्टीकरण सरकारने दिले. मा. उच्च न्यायालयाच्या मते ‘प्रशासनाने दिलेले स्पष्टीकरण सयुक्तिक आहे. सरकारने मंदिर पुनर्निर्माणासाठी ३०० कोटी रुपये घोषित केले. त्यांचा विवेकपूर्ण व्यय व्हावा’, अशी इच्छाही न्यायालयाने व्यक्त केली.
७. भारतभरातील मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे लढा देणे आवश्यक !
हिंदु धर्मियांच्या दुर्दैवाने प्राचीन हिंदु राजवटीचे महान कार्य, हिंदु मंदिरातील सांस्कृतिक भव्य-दिव्यता, पावित्र्य आणि चैतन्य या गोष्टी धर्मशिक्षणाद्वारे देण्यात आल्या नाहीत. या गोष्टी उच्चशिक्षित न्यायमूर्तींना समजतात; पण शासनकर्त्यांना समजल्या नाहीत. गेली काही वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील अनेक पुरातन मंदिरे आणि त्यांचा विकास यांसाठी झटत आहेत. मोदी सरकारने केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील काही देशातील मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी मुक्त हस्ते पैसा दिला. यासंदर्भातील भारताचे परराष्ट्र्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे प्रतिपादन वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. केवळ हिंदूचीच धार्मिक स्थळे, म्हणजे मंदिरे ब्रिटीश काळात आणि स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतरही अधिग्रहित केली जातात. त्यांतील पैसा हा अन्य पंथियांच्या विकासासाठी किंवा शासकीय कामासाठी, म्हणजेच अधार्मिक कृतींसाठी व्यय होतो. याविषयी दुर्दैवाने सर्वपक्षीय शासनकर्त्यांप्रमाणेच निद्रिस्त हिंदूंनाही खेद वाटत नाही. भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामींसारखे काही लोकप्रतिनिधी मंदिर अधिग्रहणाच्या विरुद्ध समर्थपणे लढतात. भारतभरातील सर्व मंदिरे शासनाच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी हिंदु बांधवांनी एकत्रितपणे संघटित होऊन लोकशाही मार्गाने लढा द्यावा.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१६.१२.२०२२)