कोरोना महामारीनंतरच्या स्वास्थ्य लाभासाठी पंचगव्य !
पांजरपोळ (पुणे) येथे चालू असलेल्या ‘कामधेनू महोत्सव अर्थात् विश्व गो परिषद २०२२’च्या निमित्ताने…
१. लोकांचे बिघडलेले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ठीक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य करणे आवश्यक !
‘यत् पिण्डे तत् ब्रह्माण्डे’ (जे पिंडात आहे, तेच सर्व ब्रह्मांडात आहे.) हा प्रकृतीचा नियम आहे. पिंड म्हणजे आपले शरीर, तर ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण सृष्टी. ‘आपण जी स्थिती चराचरात पहातो किंवा अनुभवतो, त्या वेळी तीच स्थिती आपल्या शरिरातही असते’, असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. गेल्या २-३ वर्षांमध्ये पर्यावरणात होणारे परिवर्तन आणि कोरोना महामारीचे तांडव यांचा मनुष्याचे शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य यांवर परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. लहान मुले आणि मोठी माणसे यांच्यात मोठ्या प्रमाणावर मानसिक नैराश्य दिसून येत आहे. मन स्वास्थ्य चांगले राहिले, तरच शरीर स्वास्थ्य चांगले राहू शकते. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या लाभासाठी एकाच वेळी मोठ्या स्तरावर कार्य करण्याची आवश्यकता आहे.
वैयक्तिक पातळीवर मानसिक नैराश्येची कारणे निरनिराळी असू शकतात. काही लोकांमधील नैराश्य थोडे फार उपचार आणि समुपदेशन (सल्ला) यांनी बरे होऊ शकते; परंतु ज्यांच्या कुटुंबातील नातेवाइकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, त्यांचे मनःस्वास्थ्यच नाही, तर त्यांची आर्थिक स्थितीही खालावली आहे. ते सुरळीत करण्यासाठी काही काळ जावा लागेल. त्यासाठी मानसिक आरोग्य राखणे अत्यंत आवश्यक आहे.
२. शरीर स्वास्थ्यासाठी ‘गोघृत’ बनवण्याचा विधी
‘गोघृत’च्या विशेष प्रभावाने अनेक मानसिक रुग्ण बरे होत असल्याचा अनुभव भारतातील वैद्यांनी घेतला आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेले ‘गोघृत’ वापरले पाहिजे. सध्याच्या घडीला बाजारात ‘गोघृत’ नावाचा पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याची विश्वासार्हता पारखणे आवश्यक आहे. योग्य परिणाम न जाणवल्यास आपण गोघृतालाच दोष देऊ. असे झाल्यास आपण गायीवर अन्याय केल्यासारखे होईल.
भारतीय गोवंशातील स्वस्थ गायीपासून मिळालेले मलाईयुक्त दूध उकळून कोमट होऊ द्या. त्यानंतर दह्यासाठी त्याचे चिनी मातीच्या किंवा मातीच्या भांड्यात विरजण लावा. ४-६ घंट्यात दही सिद्ध होईल. नंतर त्यात दुधाहून ४ पट पाणी घाला आणि चांगले घुसळल्यावर लोणी वर येईल. या लोण्याला वेगळे काढून गरम करा. त्यातील पाण्याचा अंश निघून जाईल आणि घट्ट असा पदार्थ खाली बसेल. नंतर त्याला हलके लाल होईपर्यंत गरम करा. शेवटी उकळण्याचा जोरात आवाज येईल. हा आवाज हळूहळू शांत होईल. कधी कधी त्याला उकळीही येऊ शकते. त्यामुळे मोठ्या आकाराचे भांडे घेणे योग्य राहील. लोणी तापवण्यासाठी ॲल्युमिनियमचे भांडे न वापरता पितळ, लोखंड किंवा स्टील यांचे भांडे वापरावे, तसेच नॉन-स्टिक (तळाला पदार्थ न चिकटणारे) किंवा अन्य रंगाचे भांडेही वापरू नये. ‘गोघृत’ सिद्ध होते, तेव्हा त्याचे तापमान १२५ डिग्रीच्या वर जाण्याची शक्यता असल्याने भांड्याचा अंश गोघृतामध्ये मिसळू शकतो आणि त्याचा आपल्या शरिरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शेवटच्या स्थितीत लवंगचा तुकडाही टाकता येऊ शकतो. त्यामुळे गोघृताला चव येते. हे खाण्यासाठी ठिक आहे; परंतु नाकात टाकण्यासाठी साधे गोघृत चांगले आहे.
३. गोघृताचे काही औषधीय उपयोग
अ. कोमट गोघृताचे २ थेंब नाकाच्या दोन्ही छिद्रांच्या पडद्यावर टाकून १० मिनिट पडून रहा. तोंडात तूप आल्यास त्याला थुकावे. आपण हा प्रयोग आठवड्यातून ५ दिवस आपल्या घरीही करू शकतो. रुग्णांनी ही प्रक्रिया आयुर्वेदाच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास याचा अधिक लाभ मिळू शकतो.
आ. वैद्य तुम्हाला काही औषधीय उदाहरणार्थ अष्टमंगल घृत, ब्राह्मी घृत, सारस्वत घृत आदींचा वापर करण्यासाठी सांगू शकतात. नाभीपूरण (नाभीत घृत टाकणे) आणि पादाभ्यंग (तळव्यांचे मालिश करणे) यांमुळेही विशेष लाभ होतो. आपल्या पायांच्या तळव्यांमध्ये मेंदूपासून सर्व अवयवांचा संबंध असतो. ‘गोघृत’ कोमट करून त्याने वर्षभर रात्री झोपतांना १५ मिनिटे तळव्यांना मालीश करावे. त्यासाठी कांश्याच्या भांड्याचा (वाटीचा) उपयोग केल्यास अधिक लाभ मिळतो. नेत्रज्योत वाढवण्यासाठीही हे प्रभावी आहे.
इ. ऋतुच्या संधीकाळात अनेकांना परत परत ताप येतो, जो लवकर बरा होत नाही किंवा आजार बरा झाल्यानंतरही अनेक दिवस दुर्बलता टिकून रहाते. अशा लोकांना ‘कामधेनू गोमूत्र अर्क’ ५ ते १० मि.ली. (१-२ चमचे) एक पेला पाण्यात टाकून सकाळी उपाशी पोटी पिण्यास देणे लाभदायक ठरू शकते.
ई. भूक चांगली लागेल आणि शरिरात कुठेही सूज नसेल, तेव्हा ‘नारायण तेल’ किंवा ‘बला तेल’ कोमट करून त्याने अभ्यंग करावे. स्नेहाचे अभ्यंग केल्याने शरिराला बळ मिळते आणि ते ‘टॉनिक’चे (बलवर्धक) काम करते. एक आठवडा कामधेनू गोमूत्र अर्काचे सेवन केल्यानंतर आवश्यकता असल्यास चांगले गुणवत्ता असलेल्या गोघृताचे २ चमचे सकाळ-संध्याकाळ भोजनाच्या एक घंट्यापूर्वी कोमट पाण्यासमवेत सेवन करू शकतो. यासाठी आपल्या जवळच्या आयुर्वेद वैद्यांचा सल्ला घेतल्यास ते तुम्हाला तुमच्या शरिराची स्थिती, पचनशक्ती, वर्तमान ऋतू आदींचा अभ्यास करून काही औषधी देऊ शकतात. ज्यांचा विशेष लाभ होईल. ७ दिवस ‘पंचगव्य घृता’चे २ थेंब नस्य करणेही लाभदायक होईल. पंचगव्य घृत एक चमचा २१ दिवसांपर्यंत सेवन केल्यानेही व्याधी दूर होऊन प्रतिकार शक्ती वाढवण्यास साहाय्य होईल.
४. मानवकल्याणासाठी देशी गोवंश पालनासाठी सहकार्य करा !
घरातील वातावरणाच्या शुद्धीसाठी देशी गायीच्या गोवर्या जाळून त्यावर कडूनिंबाची पाने टाकल्यास त्याच्या धुराने वातावरणाची शुद्धी होते. हे संध्याकाळी केल्याने विशेष लाभ होतो. संध्याकाळी जिवाणू-विषाणू एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी स्थानांतरित होत असतात. ज्या ठिकाणी शेणाच्या गोवर्यांचा गंध असेल, तेथे विषाणू रहात नाहीत. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी गोवंश अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे देशी गोवंश पालनामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी व्हा आणि यथासंभव सहकार्य करा.’
– वैद्या नंदिनी भोजराज, एम्.डी. (आयुर्वेद), विश्वस्त, गो विज्ञान अनुसंधान केंद्र, नागपूर
(साभार : मासिक ‘गोसंपदा’, ऑक्टोबर २०२२)